मुंबई : सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५' या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरूवारी दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, पु,ल, देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.
महागणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या, या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सांगलीच्या विटा तालुक्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळाने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. लातूरचे वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव मंडळ राज्यात दुसरे तर अहिल्यानगरच्या सुवर्णयुग तरुण मंडळाने राज्यात तृतीय क्रमांक मिळवला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत या प्रमुखांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडणार असून, ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.