ओईसीडीचा विश्वास - २०२५ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ६.७ टक्के वेगाने धावणार

24 Sep 2025 17:25:16

नवी दिल्ली,
  आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (ओईसीडी) भारताच्या आर्थिक वाढीबाबतचा आपला अंदाज सुधारला आहे. संस्थेने २०२५ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ४० बेसिस पॉईंट्सने वाढवून ६.३ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांवर नेला आहे. यामागे देशांतर्गत मागणीची मजबूत स्थिती आणि जीएसटी सुधारणा हे प्रमुख घटक असल्याचे संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ओईसीडीने पुढे स्पष्ट केले की, भारतात जास्तीच्या आयात शुल्कामुळे निर्यात क्षेत्रावर दबाव येऊ शकतो. तथापि, वित्तीय आणि चलनविषयक धोरणांमधील शिथिलीकरण तसेच वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांमुळे एकूण आर्थिक क्रियाकलापांना आधार मिळणार आहे. २०२६ मध्ये भारताची वाढ ६.२ टक्के राहील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

अलीकडेच एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जीडीपी 7.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, जो पाच तिमाहीतील सर्वाधिक होता. यासोबतच, ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी जीएसटी परिषदेने दोन करस्लॅब रचना (५ टक्के आणि १८ टक्के) मंजूर केली आहे. यामुळे अनेक घरगुती वस्तूंवरील करदर कमी झाले आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमाफी जाहीर केली होती.

महागाईच्या बाबतीत, अन्नधान्याच्या किमतींमध्ये झालेल्या घटीन मोठा दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत पुरवठा मजबूत राहिल्याने आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे अन्नधान्य महागाईत तीव्र घट झाली असल्याचें ओईसीडीने सांगितले आहे. देशांतर्गत मागणीची ठाम स्थिती आणि सार्वजनिक गुंतवणुकीचा जोर यामुळे भारताला निर्यातीतील कमकुवतपणाचा फटका आंशिकपणे कमी जाणवतो आहे, असे ओईसीडीने म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0