खलिस्तानी पन्नूनविरोधात एनआयएतर्फे गुन्हा दाखल

24 Sep 2025 17:31:15

नवी दिल्ली,  राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बंदी घालण्यात आलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ (एसएफजे) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नून आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरुद्ध गंभीर आरोपांसह एफआयआर दाखल केला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच गैरकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंधक) कायदा (यूएपीए)तील कठोर कलमे लावण्यात आली आहेत.

एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, पन्नूनने १० ऑगस्ट २०२५ रोजी पाकिस्तानातील लाहोर प्रेस क्लबमध्ये ‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात तो अमेरिकेतील वॉशिंग्टनहून व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून सहभागी झाला आणि पत्रकारांना संबोधित केले. आपल्या भाषणाचा मुख्य विषय भारताच्या पंजाबवरील सार्वभौमत्वाला नाकारणे आणि खालिस्तानच्या विचारसरणीचा प्रचार करणे हा होता.

या वेळी पन्नूनने भारताविरोधात उघडपणे भडकावणारे विधान करत १५ ऑगस्ट २०२५ रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्यापासून रोखणाऱ्या सिख सैनिकांना 11 कोटी रुपयांचे इनाम देण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे त्याने तथाकथित ‘नव्या खालिस्तान’चा नकाशाही अनावरण केला. या नकाशात पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश असल्याचे त्याने सांगितले. इतकेच नव्हे, तर एसएफजेने भारताविरुद्ध लढा देण्यासाठी एक ‘शहीद जत्था’ उभारल्याचा दावा देखील त्याने केला.

एनआयएने आपल्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, अशा प्रकारच्या कृतींमुळे पन्नून भारताची सार्वभौमता, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणत आहे. तसेच तो सिख समाजामध्ये भारताविषयी असंतोष आणि विभाजनवादी भावना निर्माण करण्याच्या कारवायांमध्ये सातत्याने गुंतलेला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशांनंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, या अपराधाचे गांभीर्य, त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिणाम तसेच यामागील व्यापक कटकारस्थान उघड करण्याची आवश्यकता लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडून करणे अत्यावश्यक आहे.



Powered By Sangraha 9.0