दि. २२ सप्टेंबरपासून नवरात्र आरंभ झाला आहे. नवरात्र म्हणजे शक्तीच्या जागराचा महोत्सव. अश्विन पक्षातील नवरात्रात घरोघरी कुलधर्म आणि कुलाचार म्हणून घटस्थापना, नंदादीप प्रज्वलन आणि अनेक प्रकारे जगन्मातेची आराधना केली जाते. खूपजण आपल्या घरी संस्कृत भाषेतील ‘श्री दुर्गा सप्तशती’चे पठण या दरम्यान करतात, ज्यांना संस्कृत येत नाही ते आचार्यमुखेन करतात. अनेक सामान्य साधक हीच उपासना प्राकृत भाषेतसुद्धा करतात. ‘श्री दुर्गा सप्तशती’ ग्रंथ पठण करताना पूर्वकर्म म्हणून देवीचे कवच, अर्गला आणि किलक अशी तीन स्तोत्रे पठण करण्याचा प्रघात आहे. ‘श्री दुर्गा सप्तशती’ पाठ झाल्यावर ‘देव्यापराधक्षमापन स्तोत्र’ म्हणण्याचीही परंपरा आहे. यांपैकी कवच स्तोत्र रचयिता ऋषि ब्रह्मदेव आहेत, अर्गला स्तोत्राची रचना विष्णुऋषींनी केली आणि किलक स्तोत्राची रचना महादेवाने केली आहे. आज आपण कवच स्तोत्राची महती जाणून घेऊया.कवच : साधना आणि आधुनिक जीवनातील आत्मसंरक्षणाची गुरुकिल्ली. अत्यंत तणावपूर्ण जीवनशैली हेच आधुनिक काळाचे वैशिष्ट्य झाले आहे. आपण रोजच जणू एका रणांगणात उतरत असतो. कुणासाठी हे रणांगण नोकरीचे आहे, कुणासाठी व्यवसायाचे, कुणासाठी स्पर्धा-परीक्षांचे, तर कुणासाठी कौटुंबिक संघर्षांचे. या रणांगणात शस्त्रे भौतिक नसली तरी शंका, चिंता, ताण, असुरक्षितता ही शत्रूसमान अस्त्रे सतत मारा करीत असतात. अशा वेळी मनुष्याला केवळ बाह्य यशाची शस्त्रे पुरेशी ठरत नाहीत; तर त्याला अदृश्य, मानसिक व आध्यात्मिक कवचाचीही आवश्यकता असते. भारतीय अध्यात्मपरंपरेत यालाच ‘कवच’ म्हटले आहे.
कवचाचे प्राचीन तत्त्वज्ञानभारतीय धर्मशास्त्रात कवचाचा अर्थ स्पष्ट केला आहे. ज्यामुळे आत्मसंरक्षण घडते, ते कवच. योद्ध्याने युद्धात प्रवेश करण्यापूर्वी जसे लोखंडी कवच धारण करणे आवश्यक असते, तसेच साधकानेही साधनसमरात अर्थात आध्यात्मिक किंवा प्रापंचिक युद्धभूमीवर प्रवेश करण्यापूर्वी, मंत्रकवच धारण करणे आवश्यक आहे. ‘देवीमहात्म्य’ व इतर पुराणग्रंथांत कवचपाठाला अनिवार्य महत्त्व दिलेले आहे.
कवचपाठात शरीराच्या प्रत्येक भागासाठी व प्रत्येक दिशेसाठी देवीचे वेगळ्या रुपाचे आवाहन केले जाते. ‘प्राच्यां रक्षतु मार्ताण्डी’ - पूर्व दिशेला मार्तांडिनी देवी रक्षण करो; ‘शिरो मे धोतिनी रक्षेत्’ - शिराचे रक्षण धोतिनी देवी करो, याप्रकारे शरीर व चित्ताच्या प्रत्येक कोपर्यात दैवी शक्तीचे रक्षण जागृत करण्याचा प्रयत्न होतो. किंबहुना, या कवचपठणातून साधकाला शक्तीचे स्वदेहातील सर्वव्यापी स्वरूप उलगडते. त्याचप्रमाणे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने, ती समस्त जगताला व्यापून आहे याचीसुद्धा त्याला जाणीव होते.
कवचाचा पाठ केवळ वाचण्यासाठी नाही. साधकाने उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेले प्रत्येक स्मरण मनाच्या एकाग्रतेसह असावे लागते. डोळ्यांचे रक्षण सांगताना प्रकाशशक्तीचा अनुभव घ्यावा, खड्गधारिणीचे नाव घेताना, युद्धसज्ज मूर्तीची प्रतिमा डोळ्यांसमोर आणावी. हीच कल्पना हळूहळू अंतःकरणात अनुभूतीत रूपांतरित होते. म्हणूनच या स्तोत्राची रचना अनुष्टुप छंदात केलेली आहे.
हा छंद अनुष्टोभन करतो, म्हणून याचे नाव ‘अनुष्टुप’ आहे. अर्थात जो संसारातील सर्व दुःखांना थोपवून धरतो, तो अनुष्टुप. हा छंद आल्हाददायक आहे. मुखातून निघणारी सामान्य वाणीसुद्धा अनुष्टुप छंदरूप असते. या छंदाची मुख्य प्रवृत्ती किंवा रचना, ही अनुकरण प्रवण करणारी आहे. वाणी ही अनुकरणाने प्रशिक्षित केली जाऊ शकते. यामध्ये मनाची मध्यस्थी आवश्यक असते. ‘पाणिनीय शिक्षा’ असे सांगते की, आत्मा बुद्धीला कार्यप्रवण करतो. बुद्धी अर्थांचे एकत्रीकरण करून, मनाला व्यक्त करण्याच्या दृष्टीने कार्यरत करते. मन जठराग्नीला ताडन करून प्रदीप्त करते, जठराग्नी वायूला प्रेरित करतो. वायू छाती, कंठ, तालु यांच्यामार्फत मंद स्वर उत्पन्न करतो. ही वैखरी अर्थात वाणी म्हणजेच अनुष्टुप छंदाचे प्रकटीकरण आहे.
शक्तीच्या सर्वव्यापक स्वरूपाची आणि स्वदेहातील अस्तित्वाची ही अनुभूती, साधकाला शारीरिक आरोग्यापलीकडे मानसिक दृढता आणि आत्मिक शांती देते. जेव्हा साधकाच्या हृदयात अदृश्य शांततेचा प्रवाह उमटतो तेव्हा त्याला जाणवते की, कवच खरे तर एक मानसिक संरक्षक भिंत आहे, जी त्याला सर्व नकारात्मकतेपासून दूर ठेवते.
प्राचीन काळात कवच हे साधनेचे अंग होते. आज तेच आधुनिक माणसासाठी मानसिक शस्त्र ठरू शकते. आजचा काळ म्हणजे तणावाचा काळ. नोकरीतील अस्थिरता, सामाजिक स्पर्धा, आर्थिक ओझे, कौटुंबिक कलह आणि याच्यापेक्षा मोठे शत्रू म्हणजे नैराश्य, एकाकीपणा, उद्विग्नता.
याच काळात प्रार्थना, जप, ध्यान, सकारात्मक प्रतिज्ञा हेच खरे कवच ठरते. ज्याप्रमाणे प्राचीन साधकांनी कवचपाठ करून मानसिक स्थैर्य मिळवले, तसेच आजचा माणूस ध्यानधारणेद्वारे, प्राणायामाद्वारे, किंवा मंत्रस्मरणाद्वारे स्वतःभोवती मानसिक कवच उभारू शकतो.
कवचाचे खरे सामर्थ्य हे सातत्याने प्रकट होते. एकदाच केल्याने त्याचा अनुभव अपूर्ण राहतो. जसे शरीराला रोज व्यायामाची गरज असते, तसेच मनालाही रोजच्या कवचसाधनेची आवश्यकता असते. पुन्हा पुन्हा केलेल्या जपातून, पुनःपुन्हा केलेल्या ध्यानातून साधकाचे मन शुद्ध होते. हळूहळू त्याला जाणवते की, बाह्य परिस्थिती बदलत नसली, तरी अंतर्मनातील धैर्य आणि आत्मविश्वास प्रचंड वाढले आहेत.
फलप्राप्ती : धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
ग्रंथ सांगतात की, कवचाच्या अभ्यासाने साधकास चार पुरुषार्थांची प्राप्ती होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आधुनिक जीवनात
याचा अर्थ असा घ्यावा:धर्म : मूल्यांशी निष्ठा व प्रामाणिकपणा.
अर्थ : उपजीविकेत स्थैर्य व समाधान.
काम : इच्छांचे नियमन व संतुलन.
मोक्ष : ताणतणावापासून मुक्ती व आत्मशांती.
म्हणजेच कवच ही केवळ धार्मिक विधीची गोष्ट नाही, तर जीवनातील प्रत्येक पायरीवर मदत करणारे मनोबल आहे.
आज जगभर संकटे वाढत आहेत. औषधे व समुपदेशनाची मदत महत्त्वाची आहेच; पण मानसिक कवचाशिवाय ही लढाई अपूर्ण आहे. आपण रोज थोडा वेळ बाजूला काढून प्रार्थना केली, मंत्रस्मरण केले, स्वतःला सकारात्मक विचारांनी वेढले, तर हेच आपले अदृश्य कवच ठरते.
‘कवच’ ही संकल्पना केवळ धार्मिक नाही, तर अत्यंत व्यवहार्य आहे. प्राचीन साधकांनी ती साधनेत वापरली, आजच्या माणसाने ती मानसिक आरोग्यासाठी वापरावी. रणांगणातील सैनिक कवचाशिवाय उभा राहात नाही; त्याचप्रमाणे आधुनिक जीवनाच्या रणांगणात आपण मानसिक कवचाशिवाय उभे राहिलो, तर आपण आतूनच जखमी होऊ.
कवच म्हणजे आत्मसंरक्षण, कवच म्हणजे मानसिक शक्ती, कवच म्हणजे आत्मविश्वासाचे अदृश्य आवरण. जो कोणी हा धडा स्वीकारतो, त्याला जीवनातील कोणतेही वादळ झेलणे अशय राहात नाही. त्यामुळे नवरात्रीनिमित्ताने आणि सप्तशतीपठण करण्यापूर्वीची पूर्वसाधना म्हणूनच केवळ कवच स्तोत्राचे पठण करू नका, तर संपूर्ण वर्षभर आपण नित्य स्वरुपात कवच, अर्गला आणि किलक या स्तोत्रत्रयीचे पठण करून, आपले जीवन धन्य करू शकता. या स्तोत्रत्रयीचे पठण आपल्याला समस्यामुक्त करेल. आपण अत्यंत सकारात्मक व्हाल. आपल्याला सर्व स्वरूपाचे प्रापंचिक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होईल.
कवच स्तोत्राची महती या भागात सांगितली आहे. पुढील भागांमध्ये अर्गला आणि किलक स्तोत्राचे महत्त्वसुद्धा आवर्जून सांगणार आहे.
सुजीत भोगल