मुंबई : महा मुंबईमधील मेट्रो सेवा आता पूर्णपणे सुरू झाल्या आहेत. मेट्रो लाईन ९ वर बुधवारी, २४ सप्टेंबरला झालेल्या ट्रायल रन नंतर काही अडचणी उद्भवल्या होत्या, मात्र आता सर्व मेट्रो सुरळीत सुरू आहेत. मेट्रो लाईन ९ वरील ट्रायल रन नंतर मेट्रो ट्रेन मॅट्रोमार्गिका ७ कडे वळत होती, तेव्हा दहिसर (पूर्व) येथील पॉईंट सेक्शन जवळ किरकोळ तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गाडी थोड्या वेळासाठी थांबली; परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्थानकांवर सेवा तत्काळ व्यवस्थितपणे चालवण्यात आली आणि त्यासाठी विशेष उपाययोजना देखील करण्यात आली.
शिवाय तांत्रिक सुरक्षा कार्यपथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि अल्पावधीत तांत्रिक अडचण दूर करण्यात आली. आता सेवा पूर्ववत सुरू असून महा मुंबई मेट्रो नेहमीप्रमाणे सुरक्षित, विश्वासार्ह व अखंड प्रवासासाठी वचनबद्ध आहे. 'महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड'च्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली.
सेवा अखंडित राखण्यासाठी उपाययोजना
आरे - ओव्हारीपाडा या दरम्यान लूप ऑपरेशन सुरू करण्यात आले. एकाच ट्रॅकवर दोन्ही दिशेने मेट्रो सेवा चालवली गेली. मात्र दोन सेवादरम्यान काहीसा विलंब झाला.
शॉर्ट लूप सेवा : गुंदवली - आरे (दोन्ही दिशेने ) या दरम्यान शॉर्ट लूप सेवा सुरू ठेवण्यात आली.
विशेष म्हणजे अंधेरी पश्चिम - दहिसर पश्चिम दरम्यानच्या सर्व स्टेशनसह लाईन २A वरील सेवा पूर्ण क्षमतेने सुरू.