मोदींचा स्टार प्रचारक

24 Sep 2025 22:33:19

या गोष्टीचा मला अभिमान आहे की, आज भाजप जे सत्तेत आहे ना ते माझ्यामुळे. मग नेता कसा नसावा? याचे मी उत्तम प्रात्यक्षिक आहे. त्यामुळे असला नेता नको रे बाबा, म्हणत लोक मोदी यांना जिंकून देतात. पण, आहे का काही कदर त्यांना? कमळवाल्यांनी माझे उपकार मानायला हवेत. खोटं वाटत असेल, तर बघा सर्वेक्षण करून. मी असे असे मुद्दे काढतो की, लोकांना ठामपणे वाटते की, ‘अब की बार मोदी सरकार’च यावे, हा करिष्मा माझा आहे. मीच आहे त्यांचा स्टार प्रचारक! आता बिहारमध्ये निवडणूक आहे. मी लगेच ‘व्होटचोरी’ कशी होते, हे सांगण्यासाठी कर्नाटकचा मुद्दा घेतला. कर्नाटकच्या आळंदमध्ये सहा हजार मतदात्यांचे नाव रद्द करण्याची याचिका आली होती, असे मी काही माहिती न घेता म्हणालो. पण, काय करावं? निवडणूक आयोगाने पटकन सांगून टाकले की, आळंदमध्ये ६ हजार, ०१८ मतदात्यांची नाव रद्द व्हावीत, असे ऑनलाईन अर्ज आले. त्यावर आयोगाने चौकशी कारवाई केली. त्यानुसार, केवळ २४ लोकांचे नाव मतदारयादीतून रद्द झाले, तर ५ हजार, ९९४ मतदात्यांचे नाव रद्द झाले नाही, तर कारण ते तिथे राहत नव्हते. आता निवडणूक आयोगाला हे सांगायची गरज होती का? याचा अर्थ ‘व्होटचोरी’ झाली नाही. काय म्हणता, माझ्या आरोपामध्ये तथ्य नाही. कारण, निवडणूक आयोगाने आता तर काय ‘ई-साईन’ फिचर सुरू केले? काय म्हणता हे फिचर निवडणूक आयोगाच्या ४० जुने अॅप्स आणि संकेतस्थळापासून बनवले आहे आणि आता मतदाता नोंदणी आणि मतदाता नाव रद्द करण्यासाठीही आधारसोबत मोबाईल नंबर जोडलेला असणे गरजेचे असणार. हे येशू, हे अल्ला, हे देवा (मी वेळेनुसार देवधर्माची नाव घेतो!) मतदाता सूचीमध्ये आता कुणी काहीच कटकारस्थान करू शकत नाही. आता बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप सत्तेत आले, तर ‘व्होटचोरी’ करून आले असे म्हणू शकत नाही? हे बघा, मी गांधी घराण्याचा तरुण धडाधडीचा हुशार, बुद्धिमान भावी पंतप्रधान आहे. काय म्हणता, महाराष्ट्रातल्या ‘शरद अंकल’नंतर मीच आहे! असू दे असू दे, तर मी काहीही म्हणू शकतो. जसे संविधान बदलणार किंवा सावरकरांविरोधात किंवा संघाविरोधात असेच काहीही मी बोलतच असतो ना? तसेच, मी भाजप आणि मोदींविरोधात बोलत राहणार. पण, मी बोललो तरी फायदा कुणाला होतो? काय म्हणता? मी आहेच मोदींचा स्टार प्रचारक!

प. बंगालची पुतना मावशी

रोम जळत असताना राजा निरो फिडल वाजवत होता, असे म्हटले जाते. प. बंगालमध्येही तसेच. पण, इथे राजाऐवजी स्वयंघोषित महाराणी आहे. महाराणीचे नाव आहे ममता बॅनर्जी! कारण, सतत कोसळणार्या असामान्य पावसामुळे कोलकाता शहर कोलमडून गेले. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, अशावेळी मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांनी सरळ हात वर केले. जनतेला दिलासा देण्याऐवजी त्या म्हणाल्या, "इतका पाऊस मी कधीच पाहिला नव्हता. आमचेही घर जलमग्न आहे. पण, कोलकात्यामध्ये जे पाणी भरले, त्याला जबाबदार उत्तर प्रदेश आणि बिहारच आहे.” मुख्यमंत्री असताना प. बंगाल शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत काय सुधारणा केल्या, यावर चकार शब्द न बोलता, त्या हिमालयातूनच गंगा कशी प्रलय घेऊन वाहते, यावर ज्ञान प्रवाहित करुन मोकळ्या झाल्या.

पूरसदृश्य परिस्थितीने कोलकाता, हावडा, हुगळी, उत्तर व दक्षिण २४ परगणा जिल्हे जलमग्न झाले. पाण्यामुळे रेल्वे, विमान आणि मेट्रोवरसुद्धा परिणाम झाला. कोलकाता विमानतळाने ५७ उड्डाणे रद्द केली, तर हावडा-सियालदह दरम्यानच्या १११ रेल्वे रद्द करण्यात आल्या. मुंबईमध्ये दि. २६ जुलै २००५ रोजी जी भयावह परिस्थिती होती, तीच परिस्थिती आज पश्चिम बंगालच्या शहरांमध्ये. पावसाचे पाणी कोलकाता आणि इतर सर्वच मुख्य शहरांमध्ये भरले. परिसरातील पथदिव्यांमध्ये हे पाणी गेले. शॉकसर्किट झाले आणि विजेच्या धक्क्याने हकनाक दहाजणांचा बळी गेला. पुरात लोक वाहून गेले. घरदारं उद्ध्वस्त झाली. या भयावह परिस्थितीमध्ये शासन, प्रशासन काय करते आहे? विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्यांना वीजपुरवठा करणार्या कंपनीने पैसे द्यावेत. कारण, व्यापार केला, तर जबाबदारीही घ्या, असे आता ममता बॅनर्जी यांचे म्हणणे. पण, याबद्दल ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकार प्रशासनाचे काहीच दायित्व नाही का? ही तीच जनता होती, जिने ममता बॅनर्जींवर भरभरून प्रेम केले आणि सातत्याने विजयी केले. आज ती जनता हवालदिल झाली आहे. पण, अशावेळी ममता गंगा नदीला, केंद्र सरकारला, उत्तर प्रदेश आणि बिहारला दोष देण्यात व्यस्त आहेत. ममता यांची प. बंगालवरची अशी पुतना मावशीसारखी ममता आहे.




Powered By Sangraha 9.0