उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साधला पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद, म्हणाले, "शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शक्य ते सर्व करणार..."

24 Sep 2025 17:27:40

मुंबई : राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक गावांना त्याचा फटका बसला आहे. अशातच सोलापूर जिल्हातील सीना नदीला आलेल्या महापूरामुळे परिस्थिती आणखी बिघडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी, वीटगाव, संगोबासह आणखी काही गावांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. दरम्यान अजित पवारांनी अधिकाऱ्याच्या टीमसह पूरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि लवकरच त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. सोबतच त्यांनी बचावकार्य करणाऱ्यांचे देखील कौतुक केले आहे.

करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात त्यांनी नासाडी झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी झालेल्या नुकसानाची माहिती घेतली सोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या देखील समजून घेतल्या. या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शक्य ते सर्व करणार आहे. मी डोळ्यांनी सर्व परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे काळजी करू नका. मी पण एक शेतकरीच आहे".

दरम्यान काही शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली असता, अजित पवारांनी त्यावर बोलणे टाळले. मात्र अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.


Powered By Sangraha 9.0