
‘जीएसटी’ कपातीनंतर भारतीय बाजारात ग्राहकांचा आत्मविश्वासही वाढीस लागलेला दिसतो. लहान गाड्यांच्या विक्रीपासून ते ई-कॉमर्सच्या सेलपर्यंत सर्वच क्षेत्रांत नोंदवण्यात आलेली लक्षणीय वाढ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नागिरक देवो भव:’ या संदेशाचेच फलित. पण, विरोधकांनी जीएसटी बदलांमुळे बाजारपेठेतील वाढत्या मागणीपेक्षा, रुपयाची पडझड, शेअर बाजारातील चढउतारांवरुनच भयगंडनिर्मितीचा चालवलेला प्रयत्न आता भारतीयांना भुलवणार नाही, हे निश्चित!भारताची अर्थव्यवस्था ही शासकीय आकडेवारीचे घोडे किंवा अर्थतज्ज्ञांच्या अहवालानुसार चालत नाही. तिचे प्रतिबिंब उमटते ते ग्राहकांच्या वाढलेल्या क्रयशक्तीतून, उद्योगांच्या उत्पादन व विक्रीत आणि व्यापार्यांच्या वाढलेल्या आत्मविश्वासातून! भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीने चांगलाच वेग पकडला असून, ‘जीएसटी’मध्ये झालेल्या बदलांनी ग्राहकांच्या खरेदीक्षमतेला अपेक्षेनुसार चालना दिली. त्याचे प्रत्यक्ष परिणाम बाजारात अवघ्या दोन ते तीन दिवसांत दिसू लागले आहेत. प्रत्यक्ष दिवाळीच्या आधीच देशभरात वेगळीच आर्थिक दिवाळी सुरू झाली आहे. ही नक्कीच सकारात्मक बाब.
सर्वांत मोठा सुखद धक्का बसला आहे तो वाहन उद्योगाला. भारताचा वाहन उद्योग हा एकप्रकारे ग्राहकांच्या उत्साहाचे प्रतिबिंबच असते. या उद्योगाची आकडेवारी सांगते की, भारतीय ग्राहकांनी मोठ्या जोमाने पुन्हा खरेदीस सुरुवात केली. ‘मारुती सुझुकी’ने एका दिवसात तब्बल ३० हजार गाड्या वितरीत केल्या. याशिवाय, ८० हजार नवीन चौकशी नोंदवल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर बुकिंगमध्ये ५० टक्क्यांची भर पडली. हे आकडे मोदी सरकारवरील भारतीयांचा विश्वास दाखवणारा ठसठशीत पुरावा आहे. त्याचबरोबर, ‘ह्युंदाई’ने ११ हजार गाड्यांचे ‘डिलर बिलिंग’ केले आहे. हा गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च आकडा. ‘टाटा मोटर्स’नेही दहा हजार गाड्या वितरीत केल्या असून, २५ हजार नव्या चौकशा नोंदवल्या गेल्या आहेत. ‘जीएसटी’ करसवलतीनंतर ग्राहकांनी मोठ्या जोमाने खरेदीला प्रारंभ केला. गेल्या काही वर्षांत महागाई आणि व्याजदरांच्या ओझ्यामुळे ग्राहक गाडी खरेदीस कचरत होते. पण, आता त्याच क्षेत्रात जोरदार वाढीचे वारे वाहू लागले आहेत.
केवळ वाहन उद्योगच नव्हे, तर ऑनलाईन बाजारपेठेतही असेच चैतन्याचे वातावरण. ‘अमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांच्या ‘बिग बिलियन डे सेल्स’मध्ये यावर्षी ४० टक्क्यांनी वाढीव उपस्थिती नोंदवली आहे. लाखो ग्राहकांनी एकाचवेळी ऑर्डर्स दिल्या असून, मोबाईल्स, इलेट्रॉनिस, कपडे, घरगुती वस्तू या सर्व क्षेत्रांत विक्रीचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील ही भरभराट एक मोठा संदेश देणारी म्हणावी लागेल. भारताची उत्सवी अर्थव्यवस्था आज अधिक प्रबळ होत असून, ग्राहक ऑनलाईन ऑर्डर्स देतो, तेव्हा लॉजिस्टिस कंपन्या, वेअरहाऊसिंग सेवा, पेमेंट गेटवे, डिलिव्हरी एजन्सी या सगळ्यांना प्रत्यक्ष काम मिळते. ही केवळ खरेदी नसून, अर्थव्यवस्थेच्या असंख्य चक्रांना फिरवणारी एक अखंडित ऊर्जा आहे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी घेतलेला ‘जीएसटी’ सवलतींचा निर्णय हे या बदलाचे मूळ कारण. काही विरोधकांनी हा निर्णय निवडणुकीसाठी घेतलेला निर्णय म्हणून याविरोधात टीकादेखील केली. मात्र, बाजारातील घडामोडींनी हे सिद्ध केले की, हा आर्थिक विवेकबुद्धीने घेतलेला निर्णय होता. भारतीय अर्थव्यवस्थेच्या ६.७ टक्के अर्थवाढीचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, ग्राहकांच्या आत्मविश्वासात झालेली वाढ ही खरी क्रांती आहे, असे विशेषत्वाने म्हणावे लागेल.
पण, बाजारातील सकारात्मकतेकडे सोयीस्कर डोळेझाक करीत, रुपयाच्या घसरणीबाबत, भारतीय शेअर बाजारातील तात्पुरत्या चढ-उतारांबाबत विरोधकांनी मोठा गदारोळ माजवला. त्यांना वाटले की, हे आकडे मोदी सरकारला अडचणीत आणणारे ठरतील. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांचा प्रतिसाद वेगळेच चित्र दर्शवणारा ठरला. ग्राहक आता ‘मोदीनॉमिस’वर डोळे झाकून विश्वास ठेवत आहेत. कारण, ‘जीएसटी २.०’ने दिलेल्या सवलतींमुळे ग्राहकांच्या खिशाला थेट दिलासा मिळाला. २०१४च्या निवडणुकीपूर्वी आणि नंतरही नरेंद्र मोदी यांना अर्थशास्त्रातले काय कळते, अशी उपहासात्मक विचारणा विरोधकांनी वारंवार केली. मात्र, आजचे वास्तव वेगळेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करसुधारणा, पायाभूत सुविधांमधील विक्रमी गुंतवणूक, वित्तीय शिस्त आणि कल्याणकारी योजनांचा राखलेला समतोल यांचा प्रभावीपणे उपयोग करत अर्थव्यवस्थेला विक्रमी वेग दिला आहे. याउलट संपुआ सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी आणि मंदीवर नियंत्रण ठेवण्यात मनमोहन सिंग सरकारला अपयश आले होते. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रज्ञ असूनही, ते आर्थिक घसरणीपासून, घोटाळ्यांपासून देशाला वाचवू शकले नव्हते, ही वस्तुस्थिती सर्वकाही स्पष्ट करणारी ठरते.
आज युपीआय व्यवहारांची संख्याही दरमहा १२०० कोटींवर पोहोचली आहे. ‘जीएसटी’ संकलनाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. भारतामध्ये २०२५-२६ या वर्षात ऑटोमोबाईल क्षेत्राची उलाढाल ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा एक अंदाज वर्तवला गेला आहे. या वाढीच्या केंद्रस्थानी ग्राहकांचा आत्मविश्वासच आहे. ‘जीएसटी’ बदलांनंतरची बाजारात उलाढालींना आलेला वेग हा एक निर्णायक संदेश आहे. मात्र, विरोधक अजूनही रुपया, शेअर बाजार, जागतिक बाजारपेठ याबद्दल नकारात्मक चित्र रंगवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, प्रत्यक्ष बाजारातील उलाढाली, ग्राहकांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि उद्योगांची चैतन्यपूर्ण कामगिरी सांगते की, भारताची अर्थव्यवस्था निश्चितच एका वाढीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ‘मोदीनॉमिस’ची दिवाळी आता सुरू झाली आहे, हाच याचा भावार्थ!