दुर्दम्य इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षेच्या बळाने हवाई दलात अधिकारी झालेल्या आणि निवृत्तीपश्चात आपल्यासारख्या आणखी नवशक्ती तयार करण्यासाठी प्रयत्नरत असणार्या निवृत्त स्क्वाड्रन लीडर सुप्रिया चित्रे यांच्याविषयी...
सैनिकी प्रशिक्षण घेणार्या मुलींची संख्या आज तशी वाढली असली, तरी भारतामधील सर्व सैनिकी शाळा किंवा अॅकेडमींमधील नियम, प्रशिक्षणाची पद्धत मात्र आजही फक्त मुलांचा विचार करणारी आहे. त्यात मुलींना जमवून घ्यावे लागते. त्यासाठी खास मुलींचा विचार करून, त्यांच्या शारीरिक, मानसिक क्षमता, सामाजिक समस्या समजून घेऊन सैनिकी प्रशिक्षण देणारी एक संस्था स्थापण्याचे यशस्वी ‘उडान’ केले, निवृत्त स्क्वाड्रन लीडर सुप्रिया चित्रे यांनी.
सुप्रिया चित्रे मूळच्या नाशिकच्या. तेथील आर्टिलरी सेंटरच्या अगदी जवळच त्यांचं घर होतं. त्यामुळे सैनिकी गणवेशात येणारी-जाणारी माणसं पाहणं आणि विमान उड्डाण आणि लॅण्डिंग पाहणं, मोजणं त्यांच्यासाठी नेहमीचंच होतं. पाहता पाहता इयत्ता चौथीत असतानाच त्यांनी वैमानिक बनायचे ठरवले आणि विमान उड्डाणाची सर्वांत जास्त संधी हवाई दलात मिळत असल्याने त्यांनी हवाई दलात जाण्याचे ठरवले.
परंतु, त्यावेळी या क्षेत्राची फारशी माहिती नव्हती, इंटरनेटही नव्हते. सुप्रिया यांच्या आईंना थोडी भीती वाटत होती. पण, वडील मात्र लेकीच्या स्वप्नासाठी सैन्यदलातील अधिकार्यांच्या ओळखी काढून सुप्रिया यांना मुंबईला नेऊन त्यांची भेट घडवून देत. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की, "तू एनसीसी कर.” त्याप्रमाणे त्यांनी मानसशास्त्रातील पदवीचा अभ्यास करताना ‘एअर विंग एनसीसी’ केले. त्या तीन वर्षांत त्यांनी विविध कॅम्प्स केले, वेगवेगळ्या अधिकार्यांची भेट झाली, त्यांचे मार्गदर्शन लाभले, हवाई दलाची भरतीप्रक्रिया समजून घेतली. नियमितपणे वर्तमानपत्र वाचणे, त्यात रिक्त पदांची जाहिरात दिसली की अर्ज भरणे हे त्या अगदी न चुकता करत असत. पदवीच्या अंतिम वर्षाला असताना त्या पहिल्याच प्रयत्नात त्या प्रवेशप्रक्रियेतील लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत तिन्ही उत्तीर्ण झाल्या. परंतु, वैद्यकीय चाचणीत त्यांची उंची वैमानिकाला हवी, त्यापेक्षा कमी असल्याचे कळले.
इतकी वर्षे पाहिलेलं स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे अर्थातच काही काळ नैराश्यात गेला. त्यातून सावरण्यात सुप्रिया यांच्या आईवडील आणि मित्रमंडळींचा मोलाचा वाटा होता. त्या काळात त्या मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करत होत्या. त्याचबरोबर त्यांनी ‘युपीएससी’ची तयारी करायला घेतली.
परंतु, सहज म्हणून पुन्हा एकदा सैन्यदलाचा अर्ज भरला आणि यावेळी स्थलसेना आणि हवाईदल अशा दोन्हींच्या लेखी, शारीरिक, मुलाखत आणि वैद्यकीय अशा चारही परीक्षा सुप्रिया उत्तीर्ण झाल्या. त्यांच्याकडे दोन्ही कॉल लेटर्स होती, पण अर्थातच त्यांनी हवाई दल निवडले.
एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्या शिक्षण शाखेत रुजू झाल्या. नवीन आलेल्या तरुणांना सैनिकी प्रशिक्षण देणे, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणे, मानसिकरित्या कणखर बनविणे, तसेच अधिक उच्चपदाच्या परीक्षांची तयारी करून घेणे इत्यादी जबाबदारी त्या सांभाळत असत. त्यांनी चेन्नई, जामनगर आणि पुण्याच्या ‘एनडीए’मध्ये काम केले आहे. तेथे त्या प्रशिक्षकाबरोबरच मानसशास्त्रज्ञ, सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. एका सामान्य नागरिकाला सर्व प्रकारे सक्षम असा अधिकारी बनविणे, हा पूर्ण प्रवास त्यांना खूप आनंद आणि समाधान देत असे.
दहा वर्षे सेवा झाल्यानंतर स्क्वाड्रन लीडर सुप्रिया चित्रे निवृत्त झाल्या, त्या ‘उडान’च्या स्थापनेची महत्त्वाकांक्षा मनी बाळगूनच. त्यांच्या लक्षात आले की, आजही समाजात मुलींनी सैन्यात जाण्याला विरोध केला जात आहे आणि त्या भीतीमागे अज्ञान हेच कारण आहे. त्यामुळे मुलींना, त्यांच्या पालकांना सैन्यदलाबद्दल पुरेशी माहिती करून देणारी, खास मुलींसाठी बनलेली देहरादूनच्या ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालया’(ठखचउ)सारखी एक संस्था त्यांना स्थापन करायची होती.
सुप्रिया यांनी त्यांच्या काही मित्र, सैन्यातील सहकार्यांसह २०१८ साली ‘उडान’ची स्थापना केली. त्यात मुलींना सैन्यात जाण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. छऊअ, अऋउअढ, तसेच भरतीप्रक्रियेतील मोठा अडथळा असलेल्या मुलाखती(डडइ)ची तयारी करून घेतली जाते. त्यात मुलींना काही जोखमीची परिस्थिती सांगून, कोडी घालून विचार करायला प्रवृत्त केलं जातं. समोर असलेल्या साधनांचा सुयोग्य वापर करणे शिकवले जाते.
संस्थेकडून विविध शाळांमध्ये जाऊन कार्यशाळा घेतल्या जातात. तीन, पाच, सात दिवसांची निवासी शिबिरे घेतली जातात. त्यात त्यांना विविध अधिकार्यांशी बोलण्याची संधी मिळते आणि सैन्यदलाचे प्रशिक्षण कसे असते, याचा वास्तविक अनुभव दिला जातो. त्यातून हे क्षेत्र आपल्यासाठी योग्य आहे का, हे त्यांना उमजतं. त्यांच्या सुप्त शक्तींना जागृत केलं जातं. त्यांच्या गुणांची त्यांना जाणीव करून दिली जाते. आता, स्थापनेपासून सात वर्षांनी सैन्यात भरती होणार्या ‘उडान’च्या मुली पाहून सुप्रिया यांचा आनंद गगनात मावत नाही. अशाच आणखी नवशक्ती ‘उडान’च्या माध्यमातून निर्माण होवोत, या निवृत्त स्क्वाड्रन लीडर सुप्रिया चित्रे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!