कंदिलपुष्पांचा वाटाड्या

24 Sep 2025 22:53:25
कंदिलपुष्पांचा वाटाड्या



ऑर्किड किंवा कंदिलपुष्पासारख्या दुर्लक्षित प्रजातींवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या महत्त्वपूर्ण नोंदी करणाऱ्या मयुरेश प्रशांत कुळकर्णी यांच्याविषयी...

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी एक म्हण आहे. मात्र, या माणसाच्या बाबतीत तसे काही घडलेच नाही. वयाच्या एका टप्प्यावर त्यांची निसर्गाशी गट्टी झाली. या गट्टीने त्यांची ओळख दुर्लक्षित अशा वनस्पतीच्या प्रजातींसोबत करून दिली आणि या दुर्मीळ वनस्पतींच्या नोंदीचा वसा त्यांनी उचलला. कंदिलपुष्प आणि ऑर्किडच्या मागे धावणारा हा माणूस म्हणजे मयुरेश कुळकर्णी!

मयुरेश यांचा जन्म २२ ऑटोबर १९८९ रोजी ठाण्यात झाला. त्यांचे बालपण डोंबिवलीमध्ये गेले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवलीच्या के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातून घेतले. वयाच्या या टप्प्यापर्यंत त्यांचा आणि निसर्गाचा काडीमात्रही संबंध नव्हता. महाविद्यालयीन वयातच ते आपल्या आईसमवेत महाबळेश्वरला सुट्टीकरिता गेले आणि तिथेच त्यांची निसर्गासोबत गाठभेट झाली. त्यावेळी सोबत असणार्या कॅमेर्यामधून त्यांनी, निसर्गात दिसलेल्या अनेक गोष्टींची जवळपास तीन ते चार हजार छायाचित्रे टिपली. घरी आल्यावर त्यामधील चांगल्या छायाचित्रांची विभागणी केली. या छायाचित्रांचे करायचे काय असा प्रश्न समोर असतानाच, वर्तमानपत्रात छायाचित्र पाठवण्याची जाहिरात वाचनात आली. मग त्या वर्तमानपत्राला छायाचित्र पाठवल्यानंतर ती छापूनही आली. मयुरेश यांच्या छायाचित्रांचे सगळीकडे कौतुक झाले. या कौतुकामुळेच निसर्गात फिरून छायाचित्र टिपण्याची उर्मी निर्माण झाली आणि अखेरीस त्यांची निसर्गासोबत गट्टी झाली.

छायाचित्रणाचा छंद लागल्यावर मयुरेश यांनी डोंबिवलीच्या आसपास फिरून, पक्षीनिरीक्षणाला सुरुवात केली. त्याकाळी नव्यानेच आलेल्या ‘डीएसएलआर’ कॅमेर्याचे कौतुक होते. घरातल्या छोट्या कॅमेर्यातून पक्ष्यांचे फोटो टिपता येणार नाहीत, म्हणून ‘डीएसएलआर’ कॅमेरा विकत घेतला. त्यानंतर डोंबिवलीबरोबरच समविचारी पक्षीनिरीक्षकांसोबत पुण्यातील भिगवण, सातारा येथे पक्षीनिरीक्षणाचे दौरे सुरू झाले. मात्र, विकत घेतलेल्या ‘डीएसएलआर’ची लेन्स छोटी असल्याने, पक्ष्यांचे फोटो टिपण्यामध्ये मर्यादा येऊ लागल्या. आता करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला. लेन्स छोटी असल्यामुळे टिपणारी गोष्टदेखील छोटीच हवी म्हणून, मयुरेश यांचा मोर्चा फुलपाखरांकडे वळला. फुलांवर बागडणार्या फुलपाखरांच्या मागे पळण्यास सुरुवात झाली. फुलपाखरांचा वेध घेता घेता, फुलांकडे लक्ष जाऊ लागले. फुलपाखरं ज्या फुलांवर बसतात, ज्याचा मधुरस पितात ती फुलं नेमकी कोणती, असे प्रश्न पडू लागले. तोपर्यंत आसपासच्या परिसरातील सगळेच पक्षी आणि फुलपाखरं पाहून झाल्यामुळे, दुसर्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली. वनस्पतीशास्त्र शिकणारे मित्रवर्य संपर्कात होतेच, मग काय कुळकर्णी यांचा पुढचा मोर्चा वळला वनस्पतींकडे आणि प्रामुख्याने फुलांकडे.

वनस्पतीशास्त्र शिकणार्या मित्रांकडून वनस्पतींची निरनिराळी कुटुंब, कुळ यांची माहिती मिळाली. या शोधातून वनस्पतींमधील अत्यंत दुर्लक्षित आणि दुर्मीळ अशा कंदिलपुष्प वनस्पतीची माहिती मिळाली. आता वेध लागले ते या वनस्पतीला पाहण्याचे. साधारण २०११ सालची ही गोष्ट. त्यावेळी मयुरेश हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होते. कंदिलपुष्पाला पाहण्यासाठी मयुरेश यांनी लागलीच सातार्याची गाडी पकडली आणि दुसर्या दिवशी ते कास पठारावर जाऊन पोहोचले. त्यावेळी कास पठार फारसे प्रसिद्ध नव्हते. स्थानिक गुराख्याला त्यांनी कंदिलपुष्पाविषयी सांगितले. गुराख्यानेदेखील ‘हनुमान बटाटा’ किंवा ‘हनुमानाची गदा’ या कंदिलपुष्पाला असलेल्या स्थानिक नावाला ओळखून, त्यांना ती वनस्पती दाखवली. मयुरेश यांनी पाहिलेले सर्वांत पहिले कंदिलपुष्प म्हणजे सेरोपेजिया जेनी. कासच्या या दौर्यात त्यांनी अनेक वनस्पती पाहिल्या. घरी परतल्यावर सुरुवात झाली या वनस्पतींविषयी जाणून घेण्याची. पुस्तकातून माहिती घेण्यास सुरुवात केल्यावर त्यांचा लक्षात आले की, कंदिलपुष्प किंवा ऑर्किड प्रजातीच्या कित्येक नोंदी या महाराष्ट्रामधून झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आपले लक्ष वनस्पती त्यातही ऑर्किड किंवा कंदिलपुष्पाकडे केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

तोपर्यंत मयुरेश यांचे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्यामुळे नोकरी करणे साहजिकच होते. साधारण दीड वर्षे त्यांनी मुंबईतील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी केली. मात्र, तोपर्यंत निसर्गात रमलेल्या मयुरेश यांचे मन हॉटेलमधल्या चाकोरीबद्ध नोकरीत काही रमत नव्हते. त्यामुळे निर्णय झाला नोकरी सोडून पूर्णवेळ निसर्गामध्ये काम करण्याचा. पुण्यातील एका वाईल्डलाईफ ट्रॅव्हल कंपनीमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि ते पुण्यातच स्थायिक झाले. या कंपनीमध्ये ते वाईल्डलाईफ एसपर्ट म्हणून काम करू लागले. शाळकरी मुलांना निसर्गाचे धडे देऊ लागले. या माध्यमातून भारतभरातील जवळपास सगळीच राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्प फिरून झाले. त्यामुळे निसर्गाचा मोठा आलेख त्यांच्यासमोर उलगडला. पुण्यातील गरवारे महाविद्यालयातील जैवविविधता विभागात त्यांचे मित्रवर्य तयार झाले. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष जंगलात जाऊन शास्त्रीय संशोधनात मदतनीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तांत्रिक माहितीही मिळाली. याच दौर्यांमधून त्यांनी सहकार्यांसोबत बेडकाची एक आणि विंचूच्या सात नव्या प्रजातीही शोधून काढल्या.

वनस्पती आणि फुलांवर आधारित असलेल्या शास्त्रीय निबंध वाचनाला सुरुवात झाली. या वाचनामधून अनेक तज्ज्ञ भेटले. या भेटीगाठीमधून ऑर्किड किंवा कंदिलपुष्पांमधून भरकटलेले लक्ष, पुन्हा या प्रजातींकडे गेले. त्यानंतर सुरू झाले दौरे केवळ ऑर्किड किंवा कंदिलपुष्पांना पाहण्यासाठी. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात आढळणारी सर्व २९ कंदिलपुष्प आणि ऑर्किडच्या १०८ प्रजातींपैकी १०४ प्रजातींची नोंद केली आहे. सह्याद्री आणि विदर्भातील दुर्गम भाग पालथे घालून, त्यांनी या प्रजातींच्या नोंदी केल्या आहेत. आजमितीस वनस्पतीशास्त्रातले संशोधकही ऑर्किड किंवा कंदिलपुष्पाच्या शोधासाठी मयुरेश यांची मदत घेतात. मयुरेश यांच्या या नोंदी सिटीझन सायन्सचे उत्तम उदाहरण आहे. नुकतीच त्यांनी जळगावातून महाराष्ट्रासाठी नव्या असणार्या ऑर्किडच्या प्रजातीची नोंद केली आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0