संगीत ‘गौरी’ची सूरसाधना...

24 Sep 2025 13:30:13

आज घटस्थापना... नवरात्रीची पहिली माळ. देवीच्या, शक्तीच्या जागराचे पुढील ९ दिवस... त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांतील अशाच काही कर्तृत्ववान नवदुर्गांचा सन्मान करणार आहोत. नवदुर्गांमधील आजचे प्रथम पुष्प नाशिकच्या संगीतक्षेत्रातील चार पिढ्यांचा संपन्न वारसा नेटाने पुढे नेणार्‍या गौरी अपस्तंब यांच्या संगीतसाधनेने गुंफलेले...

याकुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता| या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥ या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता| सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥

आज घटस्थापना! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पांढरा रंग परिधान केलेल्या अनेक नवदुर्गा आज आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतील. पांढरा रंग, जो पवित्रतेचे, निर्मळतेचे प्रतीक आहे. या रंगाची आठवण झाली की, मनात देवी सरस्वतीचे तेजोमय रूप उभे राहते, शुभ्र वस्त्रांनी अलंकृत, वीणा हाती धारण केलेली, कमलासनावर विराजमान आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी. अशी ही संगीत आणि विद्येची अधिष्ठात्री आपल्याला गानसरस्वती स्व. लतादीदी मंगेशकर यांची आठवण करून देते. त्यांच्या आशीर्वादाची थाप ज्यांना लाभली आणि ज्यांनी आपल्या घराण्याचा लौकिक पुढे नेला, त्या म्हणजेच नाशिकच्या संगीत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व गौरी ओंकार अपस्तंब!

भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेत नाशिकमधील दसककर घराण्याचा लौकिक सर्वश्रुत आहे. या घराण्याने अनेक पिढ्यांपासून संगीतसाधना करत परंपरेचा ठसा उमटवला आहे. याच घराण्याच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणार्‍या गौरी अपस्तंब आज संगीतविश्वात स्वतःचे स्थान निर्माण करीत आहेत. घराण्याचा वारसा जपत, पणजोबा आणि आजोबा यांनी रचलेल्या मूळ संगीताची परंपरा अबाधित ठेवण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले असून ते समर्थपणे पेलले आहे.

गौरी यांचे शैक्षणिक पार्श्वभूमी तितकीच भक्कम आहे. त्यांनी ‘बी.ए.’ मराठी साहित्य आणि ‘एम.ए.’ संगीत (प्रथम मानांकासह) पूर्ण केले. त्याशिवाय अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ ही पदवी ‘ए-प्लस’ श्रेणीसह प्राप्त केली आहे. त्यांचे संगीत शिक्षण घरातीलच गुरूंकडून झाले. आजोबा ज्येष्ठ संगीतज्ञ पं. प्रभाकर दसककर, काकाआजोबा ज्येष्ठ संगीतज्ञ पं. बाळासाहेब दसककर, काका माधव दसककर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनीवादक पं. सुभाष दसककर यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. तसेच, ज्येष्ठ समग्र गायिका विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर आणि जयपूर घराण्याच्या गायिका विदुषी मंजिरी असनारे-केळकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे बारकावे आत्मसात केले.

संगीताचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच लाभले. गौरी सांगतात, माझे पणजोबा हरिभक्त पारायण आणि राष्ट्रीय कीर्तनकार होते. त्यांचे सख्खे भाऊ म्हणजेच माझे काकाआजोबा हे राज घराण्यात गायक होते. त्यांचाच संगीतवारसा आमच्याकडे आला. त्यामुळे आईच्या गर्भात असल्यापासूनच आमच्यावर संगीत आणि गायनाचे स्वरसंस्कार झाले आहेत. हेच पाहता शालेय जीवनापासूनच विविध स्पर्धांमधून पारितोषिकांची मालिकाच गौरी यांच्या गळ्यात पडत गेली. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताबरोबरच अभंग, भजन, गौळण, गझल, भावगीते आणि फ्युजनपर्यंत विविध प्रकारांमध्ये त्यांचे योगदान आहे. त्याचबरोबर हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादनातही त्या तितयाच पारंगत आहेत.

स्वतः स्वरबद्ध केलेल्या त्यांच्या रचनांमध्ये बंदिशी, तराणे, रागमाला, प्रार्थना आणि देशभक्तीपर गीते यांचा समावेश आहे. त्यांनी वसंतोत्सव पारनेर, बालगंधर्व महोत्सव जळगाव, निनादिनी संगीत महोत्सव गोवा, देवगांधार संगीत महोत्सव नाशिक, सरस्वती पुरस्कार महोत्सव नाशिक, जागतिक हार्मोनियम समिट बगळुरु, स्वरोन्मेष महोत्सव पुणे अशा अनेक प्रतिष्ठित ठिकाणी आपली कला सादर केली आहे. ‘एबीपी माझा’, ‘झी युवा’, ‘झी २४ तास’, ‘कलर्स मराठी’ आणि ‘दूरदर्शन सह्याद्री’ यांसारख्या वाहिन्यांवरही त्यांना व्यासपीठ लाभले आहे. ‘मुंबई आकाशवाणी’, ‘रेड एफएम’, ‘माय एफएम’, ‘रेडिओ सिटी’ अशा विविध केंद्रांवर त्यांनी आपले गायन सादर केले, तसेच मुलाखतीही दिल्या. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकमत’, ‘सकाळ’, ‘दिव्य मराठी’, ‘देशदूत’ यांसारख्या वृत्तपत्रांतून त्यांच्या कार्याचे गौरवपर कौतुक झाले आहे. राष्ट्रीय स्तरावर आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकार म्हणून त्यांना ग्रेड मिळाला असून भारत सरकारकडून सीसीआरटी शिष्यवृत्तीही त्यांनी पटकावली आहे.

सोशल मीडियाच्या युगात दसककर भगिनींनी सादर केलेला व्होकल हार्मोनी हा अनोखा प्रयोग प्रचंड लोकप्रिय ठरला. युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांनी स्वरचित रचनांचे सादरीकरण केले असून लाखो रसिकांनी त्याचे कौतुक केले. या प्रयोगानेच स्व. लता मंगेशकर यांच्या कानावर त्यांचे गायन पोहोचले. ‘असा बेभान हा वारा’ हे गाणे त्यांनी हार्मोनीच्या रूपात सादर केले आणि ते लतादीदींपर्यंत पोहोचले. त्यानंतर उषा मंगेशकर यांनी त्यांच्या कलेची चौकशी करून आवर्जून कौतुकाचा संदेश पोहोचवला. हा क्षण गौरी यांच्या आयुष्यातील सर्वाधिक अनमोल व प्रेरणादायी ठरला.

गौरी यांनी राजन-साजन मिश्रा, पं. बिरजू महाराज, पं. किशोरी आमोणकर, उस्ताद अमजद अली खान, पं. शिवकुमार शर्मा अशा दिग्गज कलाकारांसमोर आपली कला सादर करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना शक्ती पुरस्कार, नाशिकची लावण्यवती पुरस्कार, स्वरपालवी पुरस्कार, नेशन बिल्ड अ‍ॅवॉर्ड असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

गौरी अपस्तंब या केवळ उत्तम गायिका नसून समर्पित संगीत शिक्षिका आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी लावली आहे. बालगीतांपासून देशभक्तीपर, समाजप्रबोधनपर गीतांपर्यंत त्यांनी मुलांकडून सादरीकरण करवून घेतले आहे. कार्यशाळा, शाळा भेटी, ऑनलाईन वर्ग आणि भारताबाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले त्यांचे मार्गदर्शन हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. आज गौरी अपस्तंब या घराण्याच्या परंपरेचा मान राखत संगीतविश्वाला नवनवीन स्वरांनी समृद्ध करत आहेत. गानसरस्वतीचा आशीर्वाद लाभलेली ही गायिका, नक्कीच पुढील काळात भारतीय शास्त्रीय संगीताच्या वाटचालीत आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करेल, हे नक्की. अशा गानसरस्वतीचा कृपाशीर्वाद लाभलेल्या गौरीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील संगीतसाधनेसाठी अनेकानेक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0