उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात जवळच्या बिल्डरांना १२ हजार कोटींची खैरात वाटली - मंत्री आशिष शेलार

23 Sep 2025 13:06:40

मुंबई : उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात जवळच्या बिल्डरांना १२ हजार कोटींची खैरात वाटली असून महापालिकेच्या ठेवीत तीच १२ हजार कोटींची घट आजतागायत कायम आहे, असा आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी केला.
'एक्स' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामध्ये जवळच्या बिल्डरांना १२ हजार कोटींची खैरात वाटली. महापालिका तिजोरीवर हा जो व्हाईट कॉलर डल्ला मारला त्याचा खड्डा आजपर्यंत भरुन निघालेला नाही. आज समोर आलेल्या माहिती नुसार महापालिकेच्या ठेवीत तीच १२ हजार कोटींची घट आजतागायत कायम आहे. गेल्या पंचवीस वर्षात कारभाऱ्यांनी जी लूटमार केली त्याचे मुंबईवर झालेले व्रण, जखमा आणि खड्डे कायम आहेत. हे खड्डे कायमस्वरूपी मिटवून टाकायची संधी मुंबईकर हो लवकरच तुमच्या हाती येणार आहे. मुंबईची भ्रष्टाचारी अंधाराची रात्र संपणार आहे," असे ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0