मुंबई (अक्षय मांडवकर) - सह्याद्री रुस्तम म्हणजेच सह्याद्री रस्टिक या फुलपाखरांच्या अधिवासाचा विस्तार आता मुंबईपर्यंत झाला आहे (Sahyadri Rustic Butterfly). मुंबईतील निसर्ग निरीक्षकांनी या फुलपाखराच्या अधिवासाची नोंद बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून केली असून या फुलपाखराच्या अधिवासाच्या विस्ताराची मुंबईतील ही पहिलीच शास्त्रीय नोंद ठरली आहे (Sahyadri Rustic Butterfly). यापूर्वी हे फुलपाखरू पश्चिम घाटात उत्तरेकडे माथेरानपर्यंत आढळत होते (Sahyadri Rustic Butterfly).
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात १०४ किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. राष्ट्रीय उद्यानामधून फुलपाखरांच्या १४२ प्रजातींची नोंद आहे. मात्र, यामध्ये आता सह्याद्री रुस्तम या फुलपाखराच्या प्रजातीची भर पडली आहे. निसर्ग निरीक्षक अमेय पारकर आणि आकाश म्हाडगुत यांनी राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तरेकडे असलेल्या नागलाच्या जंगलामधून या प्रजातीची नोंद केली आहे. नागला बरोबरीनेच विक्रोळी येथील गोदरेज कांदळवन परिसरामधूनही या फुलपाखराची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम घाटामध्ये या फुलपाखराचा अधिवास असला तरी, त्याचा अधिवास हा उत्तरकडे रायगड जिल्ह्यातील कर्नाळा वन्यजीव अभयारण्य आणि माथेरानच्या जंगलापर्यंत सिमीत होता. मात्र, या नोंदीमुळे फुलपाखराची ही प्रजात मुंबईत देखील नांदत असल्याचे समोर आले आहे.
रुस्तम या फुलपाखराच्या प्रामुख्याने चार उपप्रजाती आढळतात. यामधील एक ही हिमालयात, दुसरी सह्याद्रीत म्हणजेच पश्चिम घाटात, तिसरी अंदमानमध्ये आणि चौथी निकोबारमध्ये सापडते. त्यामधील पश्चिम घाटात सापडणाऱ्या सह्याद्री रुस्तम या सर्वसामान्य नावाने, तर कुफा एरिमँथिस माजा या शास्त्रीय नावाने ओखळले जाते. या फुलपाखराच्या पंखाचा विस्तार हा ५० ते ६० मिमी आकाराचा असतो. पंख पिवळे गेरु रंगाचे असतात. ज्याच्या पुढच्या पंखाच्या टोकावर काळ्या रंगाचे ठिपके असतात आणि त्यावर पिवळसर किंवा पांढरा मध्यवर्ती रुंद पट्टा असतो. यामधील नर हे काही वेळा ओल्या मातीमध्ये चिखलपान करतात, तर मादी ही केवळ फुलांद्वारे अन्नग्रहण करते. ही प्रजात सहसा जास्त सावलीच्या प्रदेशात बसणे पसंत करते. बसण्याच्या फांदीवर इतर फुलपाखरु बसलेले दिसल्यास प्रसंगी आक्रमक होऊन हे फुलपाखरु इतर फुलपाखरांना हुसकावताना देखील दिसतात.