९ ऑक्टोबरला कुणबी समाजाचा मुंबईत 'एल्गार' मोर्चा

    23-Sep-2025
Total Views |

मुंबई :
हैदराबाद गॅझेटियर रद्द करणे, ओबीसींसह सर्व घटकांची जातनिहाय जनगणना करणे तसेच प्रलंबित कुणबी शेतकरी समाजाचे प्रश्न सोडवणे, या प्रमुख मागण्यांसाठी कुणबी समाजाकडून ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुणबी समाजोन्नती संघ यांच्या वतीने अनिल नवघणे यांनी ही माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांनी सांगितले की, कुणबी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजाच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या मागण्यांची योग्य दखल घ्यावी, असा उद्देश या आंदोलनामागे आहे.

नवघणे यांनी पुढे सांगितले की, घटस्थापनेपासून कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये जनजागृती मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्यांमधून समाजातील लोकांपर्यंत आंदोलनाचे स्वरूप, मागण्यांची कारणमीमांसा आणि शासनाकडून होणारी पुढील कार्यवाही याची माहिती पोहोचवली जाणार आहे.

यापूर्वी ओबीसी समाजाने विविध आंदोलनांद्वारे आपली भूमिका मांडली होती. तथापि, शासनाने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी कायम ठेवली आहे. यामुळे कुणबी समाजाने स्वतंत्रपणे संघटित शक्तीचे प्रदर्शन करून आपली मागणी शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतल्याचे नवघणे यांनी स्पष्ट केले.

मोर्चाच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जावे, समाजातील प्रलंबित प्रश्न सोडवले जावेत आणि शासनाशी चर्चा होऊन सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.