अतिवृष्टीमुळे राज्यात ७० लाख एकरवरील पीकांचे नुकसान; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

23 Sep 2025 19:01:43

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण राज्यात जवळजवळ ७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "राज्यात मोठी अतिवृष्टी झाली असून विदर्भ आणि मराठवाड्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्यात जवळजवळ ७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदी आणि ओढ्याकाठच्या जमिनी मातीसकट वाहून गेल्या आहेत. अनेक पीके, पशूधनाचे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरांची पडझड झाली, शाळांचेही मोठे नुकसान झाले. या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत."

पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर

"पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे निसर्गाचे संकट असून आपल्या सर्वांना याला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी सर्वांना धीर धरावा लागेल. या संकटकाळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले त्यांना नुकसान भरपाई दिली असून उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात येईल. कुठलीही निर्णय घेताना केंद्र आणि राज्य सरकारचे निकष तपासण्यात येतील. परंतू, अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत मिळावी ही शासनाची भूमिका आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठींब्यावर अवलंबून असून त्यांना मदत करणे आमचे कर्तव्य आहे. मागच्या काळात मदतीची रक्कम ठरवण्यात आली होती. याबाबतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. तसेच जी जनावरे वाहून गेलीत त्यांची माहिती मिळवली जात असून ज्यांची जनावरे वाहून गेलीत त्यांना मदत केली जाईल," असे त्यांनी सांगितले.

३० जिल्ह्यांत मोठे नुकसान

"राज्यभरात ७० लाख एकर पीकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नांदेड जिल्हा बाधित झाला आहे. त्यानंतर सोलापूर, यवतमाळ, धाराशीव, बीड, अहिल्यानगर, वाशिम, बुलढाणा, जालना, हिंगोली अशा एकूण ३० जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात ३१ लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे," असेही मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0