सकारात्मकतेसाठी विचारांचा मध्यममार्ग

23 Sep 2025 12:20:21

आपल्याकडे कुठल्याही घटनेकडे, गोष्टीकडे पाहण्याचे सर्वसामान्यपणे फक्त दोनच पर्याय असतात - एक तर चांगले किंवा वाईट. काळे किंवा पांढरे एवढेच! मधला राखाडी रंग जणू आपल्या खिजगणतीतही नसतो. विचार आणि वर्तनाच्या बाबतीतही मानवी मानसिकता अशाचप्रकारे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या बर्‍यावाईटाच्या तराजूत तोलली जाते. एखाद्या बाबतीत यशस्वी झालो, तर ही भावना निश्चितच सुखावणारी असते, पण अपयशाने दार ठोठावल्यास माणूस पुरता खचून जातो. म्हणूनच विचारांची दिशा निश्चित करताना, मध्यममार्गाचाही स्वीकार करणे तितकेच आवश्यक. तेव्हा, नेमके मानवी मन असा टोकाचा विचार का करते? आणि मग या मनाला मध्यममार्गावर नेमके आणायचे तरी कसे? याच्या मनोवाटा उलगडणारा हा लेख...

कधी तुमच्या मनात असा विचार आला आहे की, तुमचं जीवन एखाद्या झपाट्याने धावणार्‍या रोलर कोस्टरसारखं आहे? कधी टोकाची उंची, तर कधी भीषण दरी आणि मध्ये कुठेही न जाणवणारा संतुलित मार्ग! कधी तुम्ही उत्तम यश मिळवून यशाच्या शिखरावर असल्यासारखे वाटता, तर पुढच्याच क्षणी स्वतःला अपयशाच्या गर्तेत पाहात खचून जाता. हा दृष्टिकोन ‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’ असा आहे. यालाच ‘संपूर्ण किंवा काहीच नाही’ असा विचारप्रकार म्हणून ओळखला जातो. ‘कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी’मध्ये याला ‘संज्ञानात्मक भ्रम’ म्हटले जाते. विचार करण्यातील सवयीची अशी चूक, जी नकारात्मक भावना आणि वर्तन अधिक दृढ करते.

विचार करण्यातील सवयीची अशी चूक, जी नकारात्मक भावना आणि वर्तन अधिक दृढ करते, तिला ‘संज्ञानात्मक भ्रम’ म्हणतात. या विचारसरणीत प्रत्येक गोष्ट काळ्या-पांढर्‍या, टोकाच्या चौकटीत बसवली जाते. यश की अपयश, चांगले की वाईट, योग्य की अयोग्य, मूल्यवान की निरर्थक. मध्ये असलेल्या वास्तवाच्या राखाडी छटा मात्र पूर्णपणे दुर्लक्षित होतात. ही निरुपयोगी रोबोटिक विचारपद्धती हळूहळू सवय बनते. एक मानसिक शॉर्टकट जो बहुतेकदा तणावामुळे सुरू होतो. परिणामी, जीवन हे जणू निरपेक्षतेच्या मालिकेसारखं वाटू लागतं. यामुळे अवास्तव अपेक्षा जन्म घेतात आणि त्या पूर्ण न झाल्यास ताण, नैराश्य आणि आत्मद्वेष यांचा भडका उडतो. आपल्याला अपयश व अधिक ताणाचा सामना करावा लागतो.

या विचारसरणीतून जीवन आपल्याला नेहमी दोन टोकांकडील बंधनात बांधून ठेवते. उदा. उत्तम गायलो, पण एक ठिकाणी सूर लागला नाही, म्हणून सर्वच वाया गेलं असं वाटणं. परीक्षेत ‘-’ मिळालं, पण ‘-+’ नाही, म्हणून स्वतःला अपयशी समजणं.

सहकर्मी एक डेडलाईन चुकवतो आणि आपण त्याला पूर्णपणे बेजबाबदार समजतो. अशा टोकाच्या विचारसरणीमुळे आपण जीवनातील छोट्या विजयांचा आनंद घेणं विसरतो आणि प्रत्येक चूक आपल्या अस्मितेवर प्रहार करते. या विचारसरणीचे परिणाम घातक आहेत.

प्रेरणा कमी होते - परिपूर्ण करता येणार नाही, तर प्रयत्नच नको, असा विचार मनात रुजतो.

आत्मविश्वास ढासळतो - मी काहीच बरोबर करू शकत नाही, अशी वैचारिक साखळी स्वतःबद्दलचा विश्वास उद्ध्वस्त करते.

निराशा वाढते - प्रत्येक परिस्थितीत फक्त नकारात्मक बाजू दिसते. बदलाची शयता नाहीशी वाटते.

मानसिक आरोग्य धोयात येते - या संज्ञानात्मक भ्रमामुळे चिंता, नैराश्य, आत्महत्येच्या प्रवृत्ती, व्यसनाधीनता यांचा धोका वाढतो.

थोडयात, ‘संपूर्ण किंवा काहीच नाही’ या विचारसरणीचं मोठं संकट असं आहे की, यात कुठलाही मध्यम मार्ग दिसत नाही. कारण, मन फक्त अतिरेकी टोकांकडे धाव घेतं. ही विचारसरणी म्हणजे जणू तारेवर चालताना खाली पसरलेल्या सुरक्षाजाळ्याला नाकारणं. अशा दृष्टिकोनामुळे आपण वाढीच्या संधी गमावतो, नातेसंबंधांना तडा जातो आणि ताण अधिक गहिरे होतात. आपण केलेल्या चांगल्या गोष्टी, मिळवलेली यशं, साधलेली प्रगती यांना आपण क्षुल्लक समजतो किंवा त्यांना काहीच किंमत देत नाही. थोडा विचार करा, स्वतःच्या यशाकडे असे अन्यायकारक दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःशीच अन्याय करणं!

यासाठी उपाय म्हणून डॉ. अ‍ॅरॉन बेक यांनी शिकवलेली ‘संज्ञानात्मक पुनर्रचना’ ही एक प्रभावी रणनीती आहे, ज्यात परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा काळा किंवा पांढरा दृष्टिकोन बदलतो. एकदा का दृष्टिकोन बदलला की, विचार करण्याची पद्धत, अनुभवण्याची ताकद आणि वागण्याची दिशा हे सगळं विधायक आणि जीवन समृद्ध करणार्‍या मार्गावर वळू लागत.

संज्ञानात्मक पुनर्रचनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, तुमच्या नकारात्मक विचारांना सक्रियपणे आव्हान देणे.

नकारात्मक विचारांना आव्हान द्या - तुम्ही स्वतःला कुठलीही मुभा देत नाही. एखादे काम तुमच्या दृष्टीने ‘-’ ग्रेडपेक्षा कमी किंवा त्याहूनही ‘-+’पेक्षा कमी झालं, तर ते तुम्ही स्वीकारायलाच तयार नसता. तुम्ही स्वतःशी कठोर वागत असता, पण करुणामय प्रतिसाद असा असू शकतो. प्रत्येक गोष्टीत कोणीच परिपूर्ण कामगिरी करत नाही. ज्या अपेक्षा मी इतरांकडून ठेवत नाही, त्या स्वतःकडून ठेवणं योग्य नाही. मी माझ्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न केला आणि एवढंच माझ्याकडून अपेक्षित आहे.

आपल्या यशाकडे केंद्रित करा -
लहानसहान गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. मी कदाचित पूर्ण स्वयंपाक केला नाही, पण मी आजारी असूनसुद्धा मुलांना किमान खिचडी करून खाऊ घातली, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा -
जेव्हा एखाद्या कार्यप्रदर्शनाचा विचार करता, तेव्हा सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा द्या. उदा. लेचर मनासारखे झाले नाही, तरी वर्ग संपल्यानंतर मी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तम उत्तरे दिली किंवा मी पाचपैकी चार दिवस आहारशिस्त पाळली.

तुम्ही काय साध्य केले आहे आणि कोणत्या गोष्टी नीट पार पाडल्या आहेत, यावर लक्ष केंद्रित करा- ‘नकारात्मक आणि स्वतःला पराभूत करणारे विचार अधिक वास्तववादी, सकारात्मक विचारांनी बदलणे आवश्यक आहे. यामध्ये पर्यायांचा विचार करणे आणि विविध पर्यायी स्पष्टीकरणांवर चिंतन करणे समाविष्ट असते. मनाला हे स्मरण करून द्या की, प्रत्येक परिस्थितीला अनेक बाजू असतात. आपण कोणता दृष्टिकोन स्वीकारतो, त्यावरच अनुभवाचा रंग ठरतो.

जीवनातील खरं सुख, समतोल आणि सौंदर्य याच करड्या छटांमध्ये लपलेलं आहे. त्या ओळखल्या की, मन तणावमुक्त होतं, आत्मविश्वास बळकट होतो आणि जीवनाचा प्रवास अधिक मृदू व आनंदी वाटतो.

- डॉ. शुभांगी पारकर
Powered By Sangraha 9.0