अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे होणार मुख्यमंत्र्यांचा सत्कार ; नरेंद्र पाटील यांची माहिती

23 Sep 2025 22:18:54

मुंबई : अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीदिनी येत्या २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी दिली.

नरेंद्र पाटील म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले. अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि समाजोपयोगी योजना आखून त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणले. या कार्याची दखल घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला जाणार आहे."

काँग्रेस राजवटीत मराठा समाजाला विस्थापित करण्याचे काम


"देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्स्थापना केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात आलेल्या कोट्यवधींच्या अर्थसहाय्यामुळे दीड लाख मराठा उद्योजक तयार झाले. काँग्रेस राजवटीत मराठा समाजाला विस्थापित करण्याचे काम करण्यात आले तर फडणवीस यांनी मराठा समाजातील युवा पिढीला व्यवसाय उद्योगांसाठी सर्वाधिक निधी आणि योजना आखून त्यांना उद्योजक बनण्याची संधी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१६ पासून मराठा समाजाच्या हिताचे काम करत स्व. अण्णासाहेबांचे मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पूर्णत्वास नेले. राज्यात सर्वाधिक काळ काँग्रेसची राजवट होती मात्र तत्कालिन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केवळ पोकळ आश्वासने दिली," असे ते म्हणाले.

महामंडळाला कोणत्या सरकारच्या काळात किती निधी?


"१९९९ ते २०१४ या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी केवळ ५० कोटींची तरतूद होती. तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ही तरतूद २०१८-१९ दरम्यान १०० कोटींपर्यंत गेली. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे मविआ सरकार सत्तेत असताना ५० कोटी जाहीर केले, पण प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली गेली. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना १०० कोटींनी तरतूद वाढवण्यात आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल ३०० कोटी, पुढे २०२४-२५ ला ४०० कोटी आणि पुढच्या अर्थसंकल्पात तब्बल ७५० कोटी प्रस्तावित करण्यात आले. महामंडळामार्फत कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करून हजारो तरुणांना आणि गटांना उद्योजकतेची नवी संधी दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास १३ हजार २५० कोटींचे कर्ज मराठा युवा उद्योजकांना दिले आहे. महायुती सरकारच्या आवाहनाला अनुसरून बँकांनी महामंडळावर आणि मराठा युवा उद्योजकांवर विश्वास ठेवत कर्ज दिले. जवळपास १ हजार ३०० कोटींचा व्याज परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने दिला आहे," असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0