ॲमेझॉन कंपनीची गुंतवणूक राज्याच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

23 Sep 2025 18:26:59

मुंबई : राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असून कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनीच्या मुंबईतील डेटा सेंटरचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस कंपनीने राज्यात पहिल्या टप्प्यातील ८.३ बिलियन डॉलर गुंतवणुकीचा या उपक्रमाद्वारे शुभारंभ केला आहे. यावेळी मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (पब्लिक पॉलिसी) शाखेचे जागतिक उपाध्यक्ष मायकल पुंके, दक्षिण आशिया व भारताचे अध्यक्ष संदीप दत्ता, आशिया पॅसिफिक क्षेत्राचे संचालक विक्रम श्रीधरन, कंपनीच्या भारतातील पायाभूत सोयी सुविधा क्षेत्राचे संचालक आदित्य चौधरी, तसेच गायत्री प्रभू, शुभंकर दास, रीना मरांडा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांसाठी देशाचे आकर्षण आहे. स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेतही महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली. या परिषदेतच ॲमेझॉनने राज्यात ' क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्टर' क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा सामंजस्य करार केला होता. त्यानुसार ॲमेझॉन गुंतवणूक करीत आहे. यापुढेही राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असून कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार लागेल. उद्योजकांना राज्यात उद्योग स्थापन करणे सहज आणि सोपे होण्यासाठी राज्य शासन विविध योजनांवर काम करीत आहे. उद्योगांना लागणाऱ्या परवान्यांचा कालावधी कमी करणे, प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ‘इज ऑफ डूईंग बिजनेस’ वॉर रूम च्या माध्यमातून जलद गतीने कार्यवाही होत आहे. उद्योजकांना परवानगीसाठी दिलेल्या प्रस्तावांची ‘रिअल टाइम इन्फॉर्मेशन’ देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे," असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ॲमेझॉन मोबाईल स्टेम लॅब उपक्रमा अंतर्गत भारतातील पहिल्या ' थिंक बिग मोबाईल व्हॅन' चे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. ही व्हॅन मुंबई शहरात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध संशोधन, नव विचारांनी शिक्षित करणार आहे.


Powered By Sangraha 9.0