सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागात भेटी द्या: मुख्यमंत्र्यांचे निर्देश

23 Sep 2025 18:22:57

मुंबई : सर्व मंत्र्यांना उद्या पूरग्रस्त भागांमध्ये भेटी देण्याचे निर्देश दिले असून मी स्वत:सुद्धा काही भागांमध्ये भेट देणार आहे, अशी महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज मंत्रिमंडळात कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, याचा सविस्तर आढावा घेतला आहे. उद्या (२४ सप्टेंबर) पालकमंत्र्यांसह मंत्र्यांना पूरग्रस्त भागात भेटी देण्याबाबत सांगितले आहे. मी स्वत:देखील उद्या काही भागांमध्ये जाणार आहे. मात्र, मदतकार्यावर ताण येऊ नये, असा आमचा प्रयत्न असेल. संपूर्ण परिस्थिती समजून घेऊन अधिक मदत काय करता येईल याबाबत सरकारच्या वतीने प्रयत्न केला जाईल."

"गेले काही दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरु आहे. आतापर्यंत ९७५.५ मिलीमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या १०२ टक्का इतका आहे. काही भागांत पूर परिस्थितीमुळे लोक अडकलेली आहेत. बीड आणि धाराशीवमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. विशेषत: गेल्या काही दिवसांत अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये जवळपास ८ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या या भागांमध्ये काम करत आहेत. धाराशीवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे," असेही त्यांनी सांगितले.

२ हजार २१५ कोटी रुपयांची मदत

"मागच्या काळात आपण शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यावेळी एकत्रित पंचनामे आल्यावर मदत करण्याऐवजी जसे पंचनामे येतील, तशी मदत करतो आहोत. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत करण्याचे शासन निर्णय काढलेले आहेत. यातील १ हजार ८२९ कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमा झाले असून पुढच्या ८ ते १० दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत. अद्यापही पंचनामे करून मदत करण्याचे काम सुरुच आहे. कुठे मृत्यू झाला असेल किंवा दुर्दैवी घटना घडली असेल तर त्यांना मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. जनावरांच्या नुकसानीसंदर्भात तसेच पुरामुळे झालेल्या घरांच्या हानीबद्दल मदत करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर दिले आहेत," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ओला दुष्काळ जाहीर करणार?

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले की, "ओला दुष्काळ काय, जे काही नुकसान झाले त्याकरिता नियमांमध्ये जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही देणार आहोत. खरडून गेलेल्या जमिनींकरिता आपला जीआर असून त्यात आपल्याला मदत करता येते. नरेगाच्या माध्यमातूनही आपण निर्णय करतो. आ. सुरेश धस यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करतो आहोत. केंद्राची मदत यायला वेळ लागतो. पण एनडीआरएफ अंतर्गत केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिलेले असतात. त्यामुळे ते पैसे आपण खर्च करतो आणि गरज पडल्यास आपलेही पैसे देतो. केंद्र सरकारची मदत आम्ही निश्चित घेऊ पण त्यासाठी न थांबता शेतकऱ्यांना तातडीची मदत करणार आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

"घरे, शेती आणि जनावरांकरिता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. अजूनही पाऊस सुरु आहे. कमी दाबाचा पट्टा असल्याने २७-२८ तारखेकडे पुन्हा एकदा अतिवृष्टीची संभावना आहे. सरकार यामध्ये काळजी घेईलच. पण शेतकऱ्यांनीही योग्य ती काळजी घ्यावी," असे आवाहनही त्यांनी केले.

उद्धव ठाकरेंची मागणी हास्यास्पद

"सगळे पालकमंत्री आपापल्या क्षेत्रात आणि मराठवाड्यात जाऊन आले आहेत. उद्या मी स्वत: जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी अशी मागणी करणे हास्यास्पद आहे. त्यांच्या कार्यकाळात अशी परिस्थिती आली असताना लाल कार्पेटवर काय झाले होते त्यात मला जायचे नाही. त्यांनी यात राजकारण करू नये, अशी माझी अपेक्षा आहे. लोकांना अशावेळी राजकारण अपेक्षित नसते. सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या राज्यात काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते. मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही. आम्ही योग्य ती मदत करणार आहोत," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Powered By Sangraha 9.0