‘अर्चना’ महिला सक्षमीकरणाची

    23-Sep-2025
Total Views |

आर्थिक स्वावलंबनाचे आणि कामाचे महत्त्व जाणल्याने, स्वत:बरोबरच इतर महिलांनाही रोजगार मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्नशील असणाऱ्या अर्चना नवघणे यांच्याविषयी...

महिला बचतगट हे आजमितीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचे खरे परिवर्तनकारी शिल्पकार ठरले आहेत. सामूहिक बचत, परस्पर साहाय्य आणि छोट्या उद्योगांना चालना देत, त्यांनी महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाची नवी दारे उघडली. घराच्या चौकटीतून बाहेर पडून आज महिला शेती, हस्तकला, सेवा आणि उद्योजकतेच्या क्षेत्रांत दमदार पाऊले टाकू लागल्या आहेत. आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि स्वाभिमान या गुणांच्या जोरावर ग्रामीण भागातील महिलांनी केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गावाचेच भविष्य प्रकाशमान केल्याची अनेक उदाहरणे आढळतील. ग्रामीण भागातील महिलांच्या या प्रगतीमुळे स्थानिक अर्थव्यवस्था तर सक्षम झालीच; तसेच रोजगारवाढीबरोबरच विकासाच्याही नव्या वाटा खुल्या झालेल्या दिसतात. अशाच काही यशोगाथांपैकी एक म्हणजे अर्चना प्रवीण नवघणे होय!

अर्चना यांचा जन्म मावळमधील वडगाव येथे झाला. अर्चना यांचे आईवडील शेतकरी होते. घरच्या गरिबीमुळे स्वतःच्या शेतीबरोबरच आजूबाजूच्या रोपवाटिकांमध्येही जाऊन त्यांना काम करावे लागे. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणासाठी अर्चना यांना काहीकाळ त्यांच्या मामाकडे राहावे लागले. अर्चना यांच्या मामाचे घरही वडगावातच असल्याने, अर्चना यांना सहज जुळवून घेता आले. नंतरच्या काळात घरची परिस्थिती सुधारल्याने अर्चना पुन्हा त्यांच्या घरी आल्या. या काळात घरची परिस्थिती सामान्य असल्याने अर्चनाही मन लावून शिकत होत्या. मात्र, अर्चना यांची बारावी झाली आणि त्यांच्या वडिलांचा अपघात झाला. परिणामी पुन्हा एकदा अर्चना यांच्या घरची चक्रे फिरली. अर्चना आणि त्यांच्या तीन भावंडांवर आता जबाबदारी आली होती, घराला हातभार लावण्याची. चारही भावंडांनी ती लीलया पेलली. अपघातामुळे वडिलांना आलेले अपंगत्व अनेक औषध उपचारानंतर कायमस्वरूपी राहण्याची चिन्हे दिसत असल्याने सर्वांनीच आता संसाराचा गाडा हाकण्यासाठी हातभार लावला. त्यामुळे अनेक कामांमध्ये अर्चना लग्नाआधीच तरबेज झाल्या होत्या.

त्यानंतर अर्चना यांचे लग्न झाले. लग्नानंतर अर्चना यांचे सासर हे सुखवस्तू कुटुंब होते. त्यामुळे घरची परिस्थिती व्यवस्थितच होती. एकत्र कुटुंबपद्धती असल्याने सर्वच आनंदाने राहात होते. अर्चना यांचे यजमानही एका कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी करत होते. त्यामुळे लग्नानंतर सुरुवातीला फार काही काम करण्याची गरज अर्चना यांना भासली नाही. पण, लग्नाआधी केलेली कामे, त्यातून स्वावलंबनाचे उमगलेले सत्य यांमुळे अर्चना यांना करमेना. त्याचवेळी अर्चना यांच्या सासूबाईही बचत गटाचे काम करत असत. त्या अर्चना यांना कायमच उद्योगी राहण्याचा घरात बसून राहण्यापेक्षा वेगळ्या वाटा चोखंदळण्याचा सल्ला देत. अर्चना यांना मुळातच असलेली उद्योगाची आवड आणि त्यात घरच्यांचा असलेला पाठिंबा यामुळे अर्चना यांचा हुरूप वाढला.

त्यांनी सासूबाईंकडून बचत गटाच्या कामकाजाची पद्धत माहीत करून घेतली. त्यानंतर ‘सखी स्वयं सहाय्यता महिला समूह’ नावाचा बचत गट सुरू केला. त्यानंतर अर्चना यांना त्यांच्या गावामध्ये विविध पदार्थनिर्मितीची शिबिरे भरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकारी महिलांना घेऊन या शिबिरांमध्येही भाग घेतला आणि विविध पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्यावतीने अर्चना आणि त्यांच्या सहकारी महिलांना, नऊ माहिन्याचे व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही देण्यात आले. त्यामध्ये उत्पादन ते विपणन अशा सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना मिळाले. या अभ्यासक्रमानंतर प्रत्यक्ष कार्यानुभव घेणे अर्चना यांना मुलांच्या जबाबदारीमुळे शक्य झाले नाही. मात्र, त्यांनी खचून न जाता, विविध पदार्थ थोड्या मात्रेत तयार करून विकण्यासाठी गावातील जत्रांना निवडले. त्यामुळे ग्राहकांशी बोलणे, त्यांना माल कसा विकावा याचे ज्ञान प्रत्यक्षपणे अर्चना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळाले. यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आदर्श परिस्थिती असतानाही अर्चना यांनी जाणीवपूर्वक समूह व्यवसायाला प्राधान्य दिले. आपल्याबरोबर गावातील अन्य महिलांनाही त्यामुळे संधी मिळतील ही धारणा त्यामागे होती. या व्यवसायासाठी त्यांनी ‘सिमांतीनी महिला स्वयं सहाय्यता समूहा’ची स्थापना केली. या माध्यमातून पापड, कुरड्या, लोणचे, सांडगे यांची निर्मिती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, सुरुवातीच्या काळातच पदार्थ तयार करण्यासाठी जागेची अडचण उभी राहिली. त्यावेळी पुढे होऊन अर्चना यांनी स्वतःच्या घराचा वापर या कामासाठी केला. साधारण चार ते पाच वर्षांपूवी प्रत्येकी हजार रुपये भांडवल गुंतवून अर्चना आणि त्यांच्या ११ सहकार्यांनी सुरू केलेल्या पापड उद्योगाने आज २० लाखांचा वार्षिक उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे. आजमितीला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड या भागातून अर्चना यांच्या समूहाने तयार केलेल्या मालाला मोठी मागणी असते. हंगामाच्या काळात गावातील दहा ते पंधराजणींना रोजगारही यातून उपलब्ध झाला आहे. अर्चना यांच्या जाऊबाईही घराचा सांभाळ, मुलांचा सांभाळ करत अडीनडीला व्यवसायातही अर्चना यांना हातभार लावत आहेत. सासूबाई आणि जाऊबाईंची भक्कम साथ असल्यानेच, आज गावात नवीन व्यवसायनिर्मितीचे मार्गदर्शन करण्यासाठी अर्चना यांना निरधास्तपणे जात येत असल्याचे अर्चना सांगतात. भविष्यात उद्योगाचे महत्त्व महिलांना पटवून देत, स्वतःही उत्तुंग झेप घेण्याचा निर्धारही अर्चना यांनी व्यक्त केला. अर्चना यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!


कौस्तुभ वीरकर
७७०९७१७१७२