मुंबई : मुंबई बँकेच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आलेले स्वयंविकासाचे धोरण आता झोपडपट्टी पुनर्विकास इमारतींनाही लागू व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.
चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १५७ मध्ये माजी नगरसेवक आणि उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचे उपाध्यक्ष ईश्वर तायडे यांच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात मनसे आणि शिवसेना (उबाठा) पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला. यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर उपस्थित होते.
आ. अमित साटम म्हणाले की, "मुंबै बँकेच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आलेले स्वयंविकासाचे धोरण आता झोपू इमारतींच्या पुनर्विकासासाठीही लागू करावे. चांदिवली परिसरात असलेल्या २८६ झोपू इमारतींसाठी हेच धोरण राबवण्याची विनंती त्यांनी आ. प्रवीण दरेकर आणि ईश्वर तायडे यांच्याकडे केली. मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी आम्ही शासनाला त्यांच्या दरवाज्यावर घेऊन जाऊ. हा विषय दरेकर यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून लवकरच निर्णय घेतला जाईल," असेही त्यांनी सांगितले.