वसई-विरार महापालिकेची अभिनव संकल्पना: मोडकळीस आलेल्या बसगाड्यांचे रूपांतर मोबाइल शौचालयांमध्ये.

22 Sep 2025 18:08:17

वसई, वसई-विरार महापालिका (VVMC) ने शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह कमतरतेवर उपाय म्हणून एक आगळीवेगळी आणि स्तुत्य कल्पना हाती घेतली आहे. मोडकळीस आलेल्या आणि बंद पडलेल्या बसगाड्यांचे रूपांतर मोबाइल शौचालयांमध्ये करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी जाहीर केला आहे.

वसई-विरार परिवहन विभागाकडे सध्या ३० ते ४० अशा बसगाड्या आहेत ज्या विविध यांत्रिक बिघाडांमुळे गेल्या काही काळापासून वापरात नाहीत. यापूर्वी अशा बसगाड्या थेट स्क्रॅपमध्ये टाकल्या जात असत. मात्र यंदा, या गाड्यांचे पुनर्वापर करत, त्यांचे रूपांतर स्वच्छतागृहांमध्ये करून त्या शहरातील विविध भागांमध्ये उभ्या राहणार आहेत.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, काही भागांमध्ये जागेअभावी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे बांधणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मोबाइल शौचालयांची संकल्पना ही एक व्यवहार्य आणि उपयुक्त पर्याय ठरू शकते.

या उपक्रमामुळे विशेषतः महिलांना व घनदाट वस्ती असलेल्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका लवकरच या बसगाड्यांमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून, त्यांना सार्वजनिक शौचालयांमध्ये रूपांतरित करणार असून, लवकरच हे मोबाइल शौचालय युनिट्स शहरात कार्यरत होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ही योजना केवळ सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी नव्हे, तर पर्यावरणपूरक पुनर्वापराच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानली जात आहे.

Powered By Sangraha 9.0