पुणे महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास ८४२.८५ कोटींची मान्यता

22 Sep 2025 19:07:26

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी ८४२.८५ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सोमवार, २२ सप्टेंबर रोजी नगर विकास विभागामार्फत याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाची २०२१-२२ पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, सरोवरांचे पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. अमृत २.० अभियानातून राज्यातील ४४ शहरात मलनि:स्सारण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातील हा एक पुण्याचा आहे.

या प्रकल्पासाठी मंजूरी देताना ठेवण्यात आलेल्या अटी

१) या प्रकल्पासाठी कार्यान्वयन यंत्रणा पुणे महानगरपालिका राहील.

२) प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्यातर्फे येणाऱ्या हिश्याव्यतिरिक्त उर्वरित निधी पुणे महानगरपालिकेमार्फत किंवा भागधारकांमार्फत भरण्यात यावा.

३) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करणे बंधनकारक

४) राज्यस्तरीय तांत्रिक समितीने विहित केलेल्या सर्व अटींची पूर्तता करणे बंधनकारक

५) सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आणि अंमलबजावणी विहित कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक

६) या प्रकल्पाच्या कामाचे आदेश प्रशासकीय मंजूरीच्या आदेशापासून ४५ दिवसांच्या आत येतील याची कार्यान्वयन यंत्रणेने दक्षता घ्यावी

निधी वितरणाची कार्यपद्धती

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासन हिश्याचा निधी हा २० टक्के+४० टक्के+४० टक्के अशा तीन टप्प्यात वितरित केला जाणार आहे. त्यानुसार, केंद्र शासनाकडून वितरित निधीच्या प्रमाणात राज्य हिश्याचा निधी केंद्र हिस्सा वितरित करताना सोबत वितरित केला जाईल. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रथम हिश्याचा प्रथम हफ्त्याचा निधी कार्यादेश निर्गमित केल्यानंतर पुणे महापालिकेला वितरित करण्यात येईल. या अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यात्मक बाबींची पूर्तता करण्याची संपूर्ण जबाबदारी पुणे महापालिका आयुक्तांची असेल. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाने वितरित निधीच्या प्रमाणात पुणे महापालिकेने निधी उभारणे अनिवार्य आहे. तसेच हा निधी त्याच प्रकल्पासाठी वापरणे बंधकारक असेल.

पुणे महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी ८४२.८५ कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे, हे सांगताना मला आनंद होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अमृत २.० अभियानातून राज्यातील ४४ शहरात मलनि:स्सारण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातील हा एक पुण्याचा आहे. यातील २५२.८६ कोटी केंद्र सरकार देणार असून २१०.७१ कोटी राज्य सरकार देणार आहे. तसेच २०.४९ कोटी पुणे महानगरपालिका देणार असून उर्वरित निधी हा खाजगी भागीदारीतून उभारला जाणार आहे. पुणेकरांना यामुळे मोठा दिलासा मिळेल."

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


Powered By Sangraha 9.0