या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता...

    22-Sep-2025
Total Views |

शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत, घटात विराजमान होते आदिमाया, जगद्जननी! आश्विन शुल प्रतिपदेला होणारी घटस्थापना हे एक काम्य व्रत आहे. देवीचे नवरात्र हे वसंत आणि शरद या दोन ऋतूमध्ये साजरे केले जाते. त्यापैकी आजपासून प्रारंभ होणार्‍या शारदीय नवरात्र व्रताचा हा भावार्थ...

नवरात्र हे देवी उपासकांसाठीचे एक महत्त्वाचे व्रत आहे. नऊ दिवस देवीची पूजा करून, दहाव्या दिवशी या व्रताची सांगता केली जाते. ‘शाक्त’ म्हणजे शक्तीची उपासना करणारी जी पुराणे आहेत, त्यामध्ये ‘कालिका पुराण’, ‘देवी पुराण’, ‘बुह्न्नंदिकेश्वर पुराण’ यांचा समावेश होतो. दुर्गापूजेचे महत्त्व या पुराणांनी विशद केले आहे. ‘मार्कंडेय पुराण’ देवीचे माहात्म्य विशेषत्वाने वर्णन करते. दुर्जनांच्या अनाचाराने त्रस्त देवांनी, दुष्टांचा संहार करण्यासाठी देवीचे आवाहन केले. विष्णु, शिव, अग्नी अशा देवांच्या तेजापासून देवी उत्पन्न झाली. देवांनी तिला आपापली आयुधे आणि शक्ती दिल्या. त्याआधारेच देवीने महिषासुर, शुंभ-निशुंभ, रक्तबीज, चंड अशा घोर राक्षसांचा पराभव केला.

या व्रताचे महत्त्व देवी पुराणात असे सांगितले आहे की, "जो कोणी हे व्रत करेल, त्याला महान सिद्धी प्राप्त होतील. त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होईल. हे व्रत समाजातील सर्वांसाठी विहित आहे.” शरद ऋतूतील नवरात्र व्रतावर शूलपाणी रचित ‘दुर्गोत्सव विवेक’, रघुनंदन रचित ‘दुर्गार्चनपद्धती’, विद्यापती लिखित ‘दुर्गाभक्तीतरंगिणी’, ‘दुर्गापूजा प्रयोगतत्त्व’ अशा काही ग्रंथांमध्ये भाष्य करण्यात आले आहे.

हिंदू धर्मामध्ये देवतेचे महत्त्व सांगणार्‍या विविध आख्यायिका प्रसिद्ध आहेत. नवरात्र व्रताचे महत्त्व सांगणारी रामायणाशी संबंधित एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेले. शोकग्रस्त राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात फिरू लागले. या काळात नारदांनी रामाला सांगितले की, सीतेच्या पूर्वजन्मात ती एका मुनींची कन्या होती. रावण तिच्यावर मोहित झाला पण, सीतेने त्याला नकार दिला. चिडलेल्या रावणाने सीतेला बळजबरीने ओढत नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सीतेने त्याला शाप दिला की, तुझा नाश करण्यासाठी मी पुढचा जन्म घेईन आणि त्यावेळी श्रीरामाच्या हातून तुझा वध होईल. या कथेला अनुसरूनच रामाने रावणाचा वध करावा, यासाठी नारदांनी रामाला नवरात्र व्रत करायला सांगितले. ते व्रत रामाने केल्याने देवी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि अष्टमीच्या रात्री देवीने रामाला आशीर्वाद दिला की, तुझ्या हातून रावणाचा वध होईल. त्यानंतर रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला आणि सीतेची मुक्तता केली.

दुष्ट प्रवृत्तीच्या संहाराचे सामर्थ्य श्रीरामाला उपासनेने प्राप्त झाले, हा बोध या कथेतून घेण्यासारखा आहे. या व्रतामुळे देवीच्या कृपेने भक्ताला धन, धान्य, समृद्धी आणि विजय प्राप्त होतो, अशी या व्रताची फलश्रृती आहे. हे केवळ देवी पूजनाचे व्रत नाही, तर विविध रूपे धारण करणार्‍या लक्ष्मीचे गुणही आत्मसात करण्याचे हे दिवस आहेत. ‘सुजलाम् सुफलाम्’ भूमी सृजनाने न्हावून निघालेली असताना, नव्या वर्षाचे आगमन औचित्यपूर्ण असेेच. मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात विशद केल्यानुसार, शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवी माहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास, सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि प्रत्येक जीवाच्या इंद्रियांना व्यापणारी ही शक्ती नवरात्रीत भक्ताच्या पूजेचा स्वीकार करते. देवीचे माहात्म्य वर्णावे तेवढे
थोडेच! या देवीने काय काय व्यापिले आहे?

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः|

नवरात्रीमध्ये आदिमायेचा उत्सव साजरा करताना प्रत्येक स्त्रीने, स्वत्वाचा जागर करण्याचाही संकल्प करावा. देवी जशी आईमध्ये वसते, तशीच ती निद्रा, बुद्धी, तृष्णा, क्षुधा यांमध्येही आहे. पोषण करणारी तहान-भूक, विचार करणारी बुद्धी, विश्रांती देणारी झोप, मनःस्वास्थ्य देणारी शांती ही प्रत्येक व्यक्तीची आवश्यक गरज! या सर्वांमध्ये आदिमाया आहे, तशीच ती लज्जा, दया, क्षमा या भावनांमध्येही आहे. प्रत्येक जीवाच्या इंद्रियांना व्यापणारी ही शक्ती, नवरात्रीत भक्ताच्या पूजेचा स्वीकार करते.

नवरात्री व्रताचे स्वरूप असे : घरातील पवित्र जागेवर किंवा देवघरात घटस्थापना करावी. एक वेदी तयार करून स्वस्तिवाचन आणि श्लोकांचे पठन करून, तिथे सिंहावर बसलेल्या अष्टभुजा देवीची स्थापना करावी. मूर्ती उपलब्ध नसेल, तर नवार्ण यंत्राची स्थापना करावी. देवीशेजारी एक कलश म्हणजे घट ठेवावा. अखंड नंदादीप चेतवावा आणि त्याची नऊ दिवस पूजा करावी. या नऊ दिवसांत चढत्या क्रमाने देवीला झेंडूच्या फुलांच्या माळा बांधाव्यात. दुरडीमध्ये सात किंवा नऊ प्रकारची धान्य घेऊन ती मातीत पेरतात, ही दुरडी देवीशेजारी ठेवली जाते. नऊ दिवस या दुरडीत पाणी शिंपडले जाते. दहाव्या दिवशी तरारलेल्या रोपांचे पूजन केले जाते. ती देवीला वाहिली जातात आणि पुरुष पागोटा किंवा फेट्यावर हे धान्य देवीचा प्रसाद म्हणून खोचतात. महिलाही आपल्या केशरचनेत हे वाढलेले अंकुर माळतात.

घट हा पावित्र्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. ‘दुर्गार्चनापद्धती’ या ग्रंथात घटस्थापनेचा विधी सांगितला आहे. मातीची वेदी तयार करून, ती शेणाने सारवावी. तिच्यावर गहू इत्यादी धान्ये पसरावी. त्याठिकाणी सोने, चांदी, तांबे यांपैकी जो उपलब्ध असेल तो पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यामध्ये चंदन, दूर्वा, फळे, रत्ने, सोने घालावे. कलशाभोवती वस्त्र बांधावे. त्यावर एक ताम्हन ठेवून त्यात तांदूळ भरावेत. या ठिकाणी वरुणदेवतेचे पूजन केले जाते आणि देवीचे आवाहनही या कलशावरच केले जाते. १६ उपचारांनी तिची पूजा केली जाते. देवीच्या नवरात्री व्रतात सप्तशती ग्रंथाचे पठन, श्रीसूक्ताचे पठन, होमहवन आणि काही प्रांतांत देवीला बळीही अर्पण करतात. भक्ताने नऊ दिवस उपवास करून हे व्रत करावयाचे असते. काही एकभुक्त राहून हे व्रत केले जाते.

समर्थ रामदासांनी अश्विन शुद्ध पक्षी अंबा या देवीच्या आरतीमध्ये तिच्या विविध रुपांच, गुणांचे मानवी आयुष्यातील महत्त्व सांगितले आहे. देवी उपासनेमध्ये वैदिक श्रीसूक्ताचे महत्त्व अनन्यसाधारण असेच. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलाच्या परिशिष्टात हे सुक्त आहे. यामध्येही देवीचे जे गुणवर्णन आले आहे, ते प्रत्येक स्त्रीला आदर्श वाटावा असेच आहे. उपासक देवीला प्रार्थना करतो की, माझे मालिन्य, लोभ आणि मोह तू दूर कर. पण, ही प्रार्थना वस्तुतः प्रत्येक स्त्रीने करावयास हवी. श्रीसूक्त हे देवीची विविध रूपे आपल्यासमोर मांडते. यातील देवी ही आत्मतृप्ता, गंधयुक्त, नेहमी संतुष्ट अशी आहे.

चिलीत आणि कर्दम म्हणजे चिखल आणि मातीचा ओलावा यांच्यामुळे लक्ष्मी ही पुत्रवती झाली आहे. भारतातील कृषी संस्कृतीत लक्ष्मीच्या या रूपाचे वर्णन अतिशय महत्त्वाचे ठरते. धान्य देणार्‍या भूमीलाही लक्ष्मीच मानले आहे. देवीपाशी पेरलेली धान्ये ही जणू पुढील काळात शेतीसाठी वापरायची, अंदाज घेण्याची पद्धत असावी. जे धान्य सर्वांत जास्त तरारेल ते पुढील रब्बी हंगामात शेतात लावावे, असेही सूचन यामागे आहे.

नवरात्री काळात साजरा होणारा कुमारिका मुलींचा ‘भोंडला’ हे कृषी संस्कृतीचे प्रतीकच. हस्ताचा पाऊस पडल्याने सुजलाम् सुफलाम् झालेली भूमी, मन आल्हादित करणारी . त्यामुळे भोंडला करताना हत्तीच्या भोवती फेर धरला जातो. २७ नक्षत्रांपैकी एक म्हणजे ‘हस्त’ नक्षत्र. या हत्तीची आठवण मनात ठेवत, त्याची पूजा करण्यालाच ‘भोंडला’ किंवा ‘हादगा’म्हणतात. नवरात्र काळात छोट्या मुली आपापल्या घरी ‘भोंडला’ करतात. याचवेळी आजूबाजूला खास करून शहराबाहेर हादगा या फुलांची रोपेही दिसतात. ही फुले भोंडला करताना हत्तीला वाहिली जातात. पाटावर चंदनाने किंवा कुंकवाने हत्ती काढून, त्याची पूजा केली जाते. हत्तीला नैवेद्य दाखविला जातो. भोंडला करताना पाटावर काढलेल्या हत्तीभोवती मुली फेर धरतात आणि गाणी म्हणतात. कुंठित विचारांच्या सीमा आत्मविश्वासाने ओलांडत दिग्विजय साधते ही आदिमाया आदिशक्ती! ज्ञानाचा समृद्ध ठेवा विश्वाच्या कल्याणासाठी वाटण्याची तिची इच्छा, तिला सतत कार्यमग्न ठेवते. जो ज्ञानपिपासू, विजिगीषु आहे, असलेल्या प्रत्येकाला ती तिची शक्ती संक्रमित करायला उत्सुक असते.

कोजागरी पौर्णिमेला ‘नवान्न पौर्णिमा’ असे म्हटले जाते. भाताचे पीक हाती आल्यावर पहिल्या लोम्ब्या देवीला अर्पण केल्या जातात. अग्नीत त्याची आहुती दिली जाते आणि त्यांचा वापर करून, घरातील स्वयंपाकही रांधला जातो. हातात आलेल्या सुगीचा हा उत्सव, धान्यलक्ष्मीचे स्वागत! बदलत्या गतिमान जीवनशैलीत आपल्या परंपरा जपताना, त्यांना आधुनिक काळाच्या कसोटीवरही तपासून पाहिले पाहिजे. अन्याय, अत्याचार, भ्रष्ट व्यवस्था, अधर्म, अनाचार यांनी जेव्हा समाज सैरभैर झाला, त्यावेळी या आदिमायेने कालीरूप धारण करून दुष्टांचा पराभव केला. रणांगणावर ६४ योगिनींनी चामुंडारूपी देवीला साहाय्य केले. आधुनिक काळातही असे मानवरूपी असुर स्त्रीजातीला त्रास देताना दिसतात. स्त्रियांनी एकत्रितपणे अशा दुष्टांचा संहार करून पुरुषार्थ गाजविला पाहिजे. देवीची नऊ दिवसांची उपासना ही व्यक्तिविकासाला बळ देणारी, समाजमन जोडणारी अशीच आहे. ज्ञानाचा नंदादीप अखंड आपल्या मनात तेवत राहावा आणि देवीच्या विविध सामर्थ्यांचे प्रकटीकरण आपल्यातून ही व्हावे, ही खरी उपासना ठरावी.

- डॉ. आर्या जोशी