मुंबई, सागरी मत्स्य आणि कोळंबी निर्यातीवर अमेरिकन आयात शुल्काचा परिणाम तसेच कोळंबी विक्रीकरिता राज्यांतर्गत आणि स्थानिक बाजारपेठ बळकटीकरण या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवार,दि.२२ रोजी आयोजित या कार्यक्रमाला राज्यभरातून मत्स्य शेतकरी उपस्थित होते.
केंद्रीय मात्स्यिकि शिक्षण संस्था वर्सोवा येथे मत्स्य विभागाने आयोजित केलेल्या या चर्चासत्रात पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्य आयुक्त किशोर तावडे, मयांक एक्वाचे डॉ मनोज शर्मा, डॉ.नरोत्तम साहू - डायरेक्टर सीआयएफइ तसेच राज्यभरातून मत्स्य शेतकरी,पुरवठादार, एक्स्पोर्टर, सेलर्स आदी लोक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी तुमच्या सूचना वाया जाणार नसून त्याची अंमलबजावणी नक्की केली जाईल असे उपस्थितांना आश्वासित केले. मच्छीमारांसाठी २०२६च्या जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री जलसंपदा योजना अंमलात आणून अन्य २६ नवीन योजना आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच आपल्या खात्याचे बजेट वाढून मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचे ही मंत्री राणे यांनी सांगितले.मत्स्य क्षेत्राला राष्ट्राला पुढे नेण्याची प्रचंड क्षमता असल्याचे ही त्यांनी सांगितले.
राज्यभरातून आलेल्या मत्स्य शेतकऱ्यांनी टेरीफ मध्ये वाढ झाल्यानंतर निर्माण समस्या,मागण्या व काही सूचना मांडल्या. यावेळी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी युरोपियन बाजारपेठ खुली होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच कोळंबीसाठी गोव्याप्रमाणे प्रणाली वापर व्हावा,त्यातील पोषकमूल्यांची जाहिरातबाजी व्हावी,वाहतुकीच्या साधनांना सवलत मिळवून द्यावी अशा अनेक मागण्या मांडल्या. तसेच आपल्यासारखा मंत्री २० वर्षांपूर्वी लाभला असता तर आपल्या काही उद्योजकांना गुजरातला जाण्याची वेळ आली नसती असे गौरवोद्गारही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.