
मुंबई, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)च्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा मिळाव्यात या उद्देशाने एक अभिनव पाऊल टाकत ‘म्हाडासाथी’ या एआय चॅटबॉट सेवेचे लोकार्पण ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात म्हाडासाथी’ एआय चॅटबॉटचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी बोलताना ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल म्हणाले की, डीजीटायझेशनच्या युगात म्हाडाने आपल्या कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा करत नागरिकांसाठी उपयुक्त व तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘म्हाडासाथी’ हा चॅटबॉट त्या दिशेने घेतलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
म्हाडासाथी’ हा एजेन्टिक चॅटबॉट मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. म्हाडाच्या सर्व नऊ विभागीय मंडळांशी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती या चॅटबॉटमध्ये नागरिकांना सहज मिळणार आहे. याशिवाय, या सेवेअंतर्गत आवाजावर आधारित सुविधा देखील पुरविण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांसाठी संवाद अधिक सुलभ व सोयीस्कर होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आणि नागरिकांच्या मिळणार्यात प्रतिसादानुसार ही सेवा सातत्याने विकसित होणार आहे.
म्हाडा तर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या डिजिटल सुविधांबाबत बोलतांना जयस्वाल म्हणाले की, नागरीक सुविधा केंद्राला भेट देणाऱ्या नागरिकांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यात आला असून तो कमी होऊन आता ७ ते ८ मिनिंटावर आणला आहे. नागरिकांचे दस्तवेज अथवा टपाल स्कॅनिगसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी नागरिक आपले डॉक्यूमेंट स्कॅन करवून यापुढे या केंद्रावर सादर करू शकतील. तसेच पुढच्या टप्प्यात या सुविधा केंद्रावर येऊन कागदपत्रे सादर करण्यापेक्षा नागरिकांना घरी बसूनच डॉक्यूमेंट पाठवता येतील यादृष्टीने ही प्रणाली अद्ययावत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देखील जयस्वाल यांनी यावेळी दिली.