‘कुर्ला टू वेंगुर्ला’ : कोकणातील मुलांची लग्न कोणी रखडवली?

    22-Sep-2025
Total Views |


कोकणातल्या मुलांची रखडलेली लग्न हा अत्यंत गंभीर विषय दिवसेंदिवस बनत चालला आहे. फक्त कोकणच नाही तर ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा एकंदरीत विचार केला तर हा विषय खरचं संवेदनशील आहे. आणि याच गंभीर विषयाला ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या सिनेमातून स्पर्श केला आहे. नेहमीच्या हिरो-हिरॉइनच्या प्रेमकहाणीत या चित्रपटाला न अडकवता वेगळ्या रितीने ही कथा मांडली आहे. त्याचबरोबर कोकणातला चाकरमानी या शब्दांची उत्तम उकल सिनेमात पाहायला मिळणार आहे. दरम्यान सिनेमाचा ट्रेलर आल्यापासून प्रेक्षकांना उत्सुकता होती. तर १९ सप्टेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचं तर, चित्रपटाची गोष्ट नावाप्रमाणेच कोकणातल्या वेंगुर्ल्यात सुरु होते. सुंदर निसर्ग, समुद्र आणि तेथील फणसासारखी बाहेरुन काटेरी पण मनाने गोड असेलेली माणसं. सारंग कुटुंब, जोशी, तारी आणि तांबट कुटुंबाभोवती ही कथा फिरते. सारंग कुटुंबातल्या आनंदचं (अभिनेता प्रल्हाद कुडतरकर) आठ महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. गौरी (अभिनेत्री वीणा जामकर) त्याची बायको. आनंद मुंबईतला चाकरमानी, चाकरमानी म्हणण्यापेक्षा फक्त लग्न जमवण्यासाठी केलेली तडजोड. त्याचं मन काही शहरात रमत नाही आणि हवी तशी नोकरी त्याला मिळालेलीही नाही. भाड्याने दहा बाय दहाच्या खोलीतच त्याचं जीवन, पण मुंबईला जाण्याच्या उद्देशाने लग्न केलेल्या गौरीला मात्र लग्नाच्या आठ महिन्यांनतरही मुंबई काही पाहता आलेली नाही. मुंबईला कधी जाता येईल याच आशेवर तिचा एक-एक दिवस जात असतो.

पण एकेदिवशी तिच्या या स्वप्नांचा चुराडा होतो, जेव्हा आनंदची तात्पुरती नोकरी जाते आणि तो कायमचा गावी निघून येतो. यानंतर खऱ्या ट्वीस्टला सुरुवात होते. लग्न जमवताना झालेली फसवणूक गौरीच्या लक्षात येते आणि गौरी माहेरी निघून जाते. दुसरीकडे आनंदची लहान बहीण शर्मिला आता लग्नाच्या वयात आली आहे. तिच्यासाठी स्थळं पाहिली जात आहेत. पण मुलाच्या नोकरीचा पत्ता नसताना सारंग कुटुंबियांना मात्र जावई शहरातला खासकरुन मुंबईतला, स्वतःच घर, चांगली नोकरी असणारा हवा आहे. तर आनंदचा मित्र आणि गावकरी परिमल जोशी (साईंकित कामत) हा देखील शहरातून त्याचं इंजिनियरींगचं शिक्षण पूर्ण करुन गावात परतला आहे. उच्च शिक्षण घेऊनही परिमलला मात्र नोकरी करायची नाही. त्याला गावातच स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. अशी एकंदरीत चित्रपटाची कथा आहे. मध्यंतरानंतर अस्मिता धोपेश्वरकर (स्वानंदी टिकेकर) हे पात्र येतं. आणि पुढे कथेला आणखी निरनिराळी वळणं येत जातात.

दिग्दर्शक विजय कलमकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. कथा, पटकथा, संवाद हे अमरजित आमले यांनी लिहिले आहेत. अतिशय गंभीर विषयाला त्यांनी अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने हातळण्याचा प्रयत्न केला आहे, जो अतिशय उत्तमरित्या त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणातील भाषा आणि निसर्गसौंदर्य कोणत्याही सिनेमॅटीक इफेक्टशिवाय अतिशय सुंदररित्या दाखवण्याचं काम दिग्दर्शकाने केलं आहे. याशिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात कुठेही कृत्रीम सेटचा वापर न करता खऱ्याखुऱ्या घरांमध्ये चित्रीकरण करण्यात आलं आहे. फक्त संवादफेक न करता उत्तम दृष्यांमधून सिनेमाची बांधणी केली आहे. पण असं असलं तरीही बऱ्याच ठिकाणी सिनेमा रेंगाळला आहे. एकाचवेळी तीन वेगवेगळ्या कथा जोडताना लेखकाची तसेच दिग्दर्शकाची बरीच तारांबळ उडाली आहे. आनंद शहर सोडून गावात येतो, बायकोच्या हट्टापायी पुन्हा शहरात जातो, शहरातलं झोपडपट्टीपतलं जीवन तो जगतो. परिमल गावात उद्योगधंदा तयार करतो. गावातल्या तरुणांना समजावण्य़ाचा प्रयत्न करतो. पण पुढे काय? त्यामुळे चित्रपट संपताना तो बऱ्याच ठिकाणी अपूरा वाटतो. आनंद गावात राहिल्यानंतर पुढे करणार काय? कारण तो परिमलसारखा उच्चशिक्षितही नाही आणि त्याला व्यवसायाचं ज्ञानही नाही. याशिवाय दुसरीकडे शर्मिलाला (आनंदची बहिण) गावातल्याच तरुणाशी लग्न करायचं आहे. पण हे दोघे गावात नक्की काय करणार याची उकल कथेतून होत नाही. तसेच उत्तरार्धात अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचं अस्मिता हे पात्र गावात येतं. पण तिनेही तिचा विषय पूर्णपणे मांडला नाही.

चित्रपटाचा विषय अतिशय ज्वलंत आणि गंभीर आहे, त्याला अतिशय साध्यासरळ रितीने मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे पण तितका प्रभावी तो पडद्यावर दिसत नाही. पण या अशा विषयावर भाष्य करणारा सिनेमा आणि हलकी-फुलकी कॉमेडी आणि उत्तम कलाकार यात पाहायला मिळतात.

प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत ,कविता अमरजीत, अमेय परब, शेखर बेटकर, अनघा राणे असे बरेच कलाकार चित्रपटात आहेत. कलाकारांनी अतिशय उत्तम मालवणी भाषा बोलली आहे. याबरोबरच अभिनयसुद्धा उत्तम केला आहे. वैभव मांगलेचं भन्नाट विनोदी पात्र मध्येच तुम्हाला खळखळून हसवतं. वीणा जामकरने गौरी हे पात्र प्रेक्षकांच्या मनात पुरतं उतरवलं आहे. साईंकित कामतचा परिमलदेखील प्रेक्षकांना भावतो. सुनील तावडे हे वडिलांच्या भूमिकेत चपखल बसले आहेत. इतर कलाकारांनीही सुंदर काम केलं आहे. कुटुंबासह कौटुंबिक, सामाजिक विषयाला धरुन, सुंदर कोकणचा नजारा दाखवणारा चित्रपट पाहायचा असेल तर कुर्ला टू वेंगुर्ला तुम्ही नक्कीच पाहू शकता.


दिग्दर्शन - विजय कलमकर
कथा, पटकथा, संवाद - अमरजित आमले
कलाकार - प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत ,कविता अमरजीत, अमेय परब, शेखर बेटकर, अनघा राणे
संकलन - विजय कलमकर
गीतकार - चंचल काळे, अमरजीत आमले
संगीतकार, पार्श्वसंगीत - अक्षय खोत
निर्मिती संस्था - सिनेकथा किर्तन, चंद्रभागा स्टुडिओज, एम. व्ही. शरतचंद्र
निर्माते - अमरजीत आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र
रेटींग – ३/५