‘अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती’च्या उपाध्यक्ष असलेल्या जयश्री ओव्हाळ. प्रचंड संघर्ष आणि दुःखातून उभे राहिलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.
मुंबईमधील चेंबूर परिसरातल्या निस्वार्थी समाजसेविका म्हणजे जयश्री ओव्हाळ! आर्थिक परिस्थिती जेमतेम मात्र प्रेमाने, कर्तृत्वाने जोडलेल्या माणसांची श्रीमंती अफाट, गरजू, दुर्बल आणि अज्ञानतेच्या अंधारात निपचित-खितपत पडलेल्यांना मदतीचा हात देणाऱ्या जयश्री, निर्भीडपणे समाजासाठी काम करतात. त्या ‘अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती’ या संस्थेच्या उपाध्यक्ष तर आहेतच परंतु, ‘अधिष्ठान प्रतिष्ठान’च्याही उपाध्यक्षपद भूषवत आहेत. चेंबूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घरगुती हिंसाचार, महिला बालकांसंबंधित अन्यायाचे प्रश्न सोडवण्यासाठी जयश्री काम करत आहेत. अत्यंत साधे राहणीमान, नम्र संवाद मात्र समाजहिताबाबत ठाम आणि विश्वासाने बोलणे ही त्यांची वैशिष्ट्ये!
बीडच्या लिंबारूई गावचे शिवराम आणि पद्मिनी वाघमारे दाम्पत्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. या वाघमारे कुटुंबाने कायमच नातेवाईकांना जपण्यास प्राधान्य दिले. कामानिमित्त शिवराम मुंबई चेंबूरला आल्यावर, मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये त्यांना काम मिळाले. शिवराम यांना सहा अपत्य, त्यांपैकीच एक म्हणजे जयश्री. जयश्री यांचे बालपण चारचौघींसारखेच गेले मात्र, नशीब बदलले. अचानक शिवराम यांची प्रकृती खालावून, त्यांना फिट्स येण्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना कामाला जाणे अशक्य झाले. इथूनच वाघमारे कुटुंबीयांच्या घरचे वासे फिरले आणि त्यांना गरिबीने ग्रासले. घर चालवण्यासाठी पद्मिनी चार घरची धुणीभांडी करू लागल्या; मिळेल ते काम करू लागल्या. आजारी असलेल्या शिवराम यांचा उपचार आणि त्याचवेळी मुलांचे संगोपन करणे, हे तसे जिकिरीचचे काम. त्यामुळेच वयाच्या नवव्या वर्षीच जयश्री आईसोबत कामाला जाऊ लागल्या. परिणामी,जयश्री यांचे शाळेकडे दुर्लक्ष होऊ लागले. घरकाम, घराकडे लक्ष देणे, घरातील मुलांना सांभाळणे यांमुळे त्यांना शाळा सोडून घरी बसावे लागले. खरे तर जयश्री यांना शिक्षणाची खूप आवड होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा मंत्र दिला म्हणजे, शिक्षण पूर्ण केलेच पाहिजे असे त्यांना वाटे. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. त्याच काळात आईला वडिलांच्या जागी नोकरी मिळाल्याने, जयश्री यांच्या शिक्षण पूर्ण करण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. जयश्री यांनी आईला शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा सांगितली आणि शाळेत प्रवेश घेतला. मात्र, त्यावेळी कधी न येणारे, बोलणारे लोकही आईबाबांना सांगू लागले, "हिला आता शिकवून काय करणार? मोठी बॅरिस्टर होणार का डॉक्टर होणार. वयात आलेल्या पोरीला शिकवतीस.” परंतु, जयश्रीच्या आईंनी या सगळ्यांकडे दुर्लक्ष केले.
पण, सातवीनंतर जयश्री यांना लग्नाचे मागणे आलेच. नातेवाईकांच्या रेट्यापुढे आईबाबांचे काही चालले नाही. सासरही हातावर पोट असलेलेच. त्यामुळे भाकरीसाठी मोलमजुरी करणे सुरू झाले. परिणामी शिक्षणाशी संबंध येणे शक्यच नव्हते. मजुरीत, हालअपेष्ठेमध्ये दिवस कधी उगवे आणि रात्र कधी मावळे, हेसुद्धा त्यांना समजत नसे. पण, जयश्री यांच्या मनातील आशेने, त्यांचे शिक्षणाचे स्वप्न कधीही मरू दिले नाही.
बीडमध्ये पतीसोबत मोलमजुरी करूनही हलाखीचे जगणे संपत नव्हते. त्यामुळे जयश्री यांच्या पतीने, पुण्याला बहिणीकडे राहायचा निर्णय घेतला. पतीसोबत जयश्री पुण्याला आल्या. इथेही काही बरे किंवा नवे नव्हतेच. इथे विटभट्टीवर दोघे काम करू लागले. एक दिवस जयश्री यांचा भाऊ त्यांना भेटायला आला. विटभट्टीवर काम करणाऱ्या जेमतेम १७-१८ वर्षांच्या बहिणीला पाहून, त्याला खूप वाईट वाटले. त्याने जयश्री आणि त्यांच्या पतीला मुंबईला आणले आणि एका ठिकाणी कामाला लावले.
मुंबईतही पोटासाठी काम करणे भागच होते. धागा कापणे, आशा वर्कर म्हणून काम करणे आणि उरलेल्या वेळेत चारदोन धुणी भांड्याची कामे करणे त्यांचे सुरूच होते. याच काळात त्यांचा संपर्क एका स्वयंसेवी संस्थेशी झाला. जयश्री इथे मन लावून काम करू लागल्या. त्यांच्या मनात पुन्हा शिक्षणविषयक विचार येऊ लागले. त्यांनी शिकायला सुरुवात केली. यावेळी पती गौतम यांनी त्यांना साथ दिली. जयश्री यांनी त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान त्यांना दोन मुलं झाली, त्यामुळे जबाबदार्याही वाढल्या. या मुलांचे संगोपन, शिक्षण व्यवस्थित करायचे. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा वसा, मुलांमधून जागवण्याचा संकल् त्यांनी केला. एका मुलाला डॉक्टर, तर एका मुलाला इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न जयश्री यांनी उराशी बाळगले. त्यांचा मोठा मुलगा अनिकेत हा अत्यंत हुशार, बुद्धिमान आणि समाजशील. तो ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे काम करू लागला. त्याचे कर्तृत्व, समाजभान सगळेच शब्दातीत होते. समाजासाठी काम करायचे, हे त्याचे ध्येय होते. जयश्री यांच्यासाठी अनिकेत म्हणजे जीव की प्राण मात्र, एका अपघातात अनिकेतचे निधन झाले. जयश्री यांच्या दु:खाला सीमा उरली नाही. ‘का आणि कशासाठी जगायचे’ हा प्रश्न निर्माण झाला पण, त्या दुःखातून त्या सावरल्या. अनिकेतचे ध्येय त्यांनी स्वतःचे ध्येय ठरवले. समाजाच्या प्रश्नांवर त्या काम करू लागल्या. त्या म्हणतात, "जिवात जीव असेपर्यंत, महिला बाल सक्षमीकरणासाठी काम करायचे आहे. मुंबईतही बालविवाह अजूनही होतात. वयात आल्यावर आजही मुलींचे शिक्षण सुटते, असे होऊ नये, यासाठी काम करणार आहे.” जयश्री यांच्या मातृत्वाला, कर्तृत्वाला आणि भाविष्यातील वाटचालीला दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
९५९४९६९६३८