मुंबई, "आज ठाणेकरांसाठी अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. ठाणेकरांना पहिल्यांदाच मेट्रो मिळते आहे आणि ही संपूर्ण ठाणेकरांसाठी ऐतिहासिक व अभिमानाची बाब आहे. भारतातील सर्वांत मोठ्या ५८ किलोमीटरच्या उन्नत मेट्रो कॉरिडॉरची ही सुरुवात आहे," असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ठाण्यातील पहिल्या मेट्रो मार्ग ४ व 4अ च्या पहिल्या टप्प्यातील तांत्रिक तपासणी आणि चाचणी धाव यशस्वीरित्या पार पडली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुंबई मेट्रो ४ आणि ४अ मार्गिकेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार,दि.२२ रोजी हा ऐतिहासिक क्षण पार पडला. दरम्यान झालेल्या या चाचणी धावेत टप्पा-१ मधील चार प्राधान्य स्थानकांचा समावेश करण्यात आला. गायमुख, गोवणीवाडा, कासारवडवली व विजय गार्डन असा ४.४ किमी टप्प्याचा समावेश आहे. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे आणि प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांसह सर्व मान्यवरांनी मेट्रोने प्रवास केला.
दरम्यान या चाचणी प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज आहेत की नाही याची खात्री करण्यात आली. उड्डाणपूल, मार्गिका आणि ओव्हरहेड इक्विपमेंट पूर्ण झाले असून, लोड कॅल्क्युलेशन व सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनसाठी माहिती संकलित करण्यात आली. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणालींचे एकत्रीकरण तपासले गेले. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता (ISA) प्रमाणपत्र आणि त्यानंतर सीएमआरएस मंजुरी घेण्यात येईल. सर्व वैधानिक मंजुरी पूर्ण झाल्यानंतरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.
मुंबई महानगराच्या विकासाची गती वाढवणारा प्रकल्प"मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ हा प्रकल्प केवळ एक वाहतूक साधन नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी विकासाची गती वाढवणारा आहे. या मार्गाची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून त्यात ३२ स्थानके प्रस्तावित आहेत. संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर दैनंदिन १३ लाख ४३ हजारांहून अधिक प्रवासी मेट्रोचा लाभ घेतील. प्रवासाचा वेळ ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होईल, रस्त्यावरील कोंडीला मोठा दिलासा मिळेल आणि नागरिकांना पर्यावरणपूरक, सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सोय मिळेल."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आजचा दिवस ठाण्याच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण "आजचा दिवस ठाण्याच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. १८५३ साली ठाण्यातून पहिली रेल्वे धावली होती आणि आज जवळपास १७२ वर्षांनी ठाण्यात पहिली मेट्रो धावते आहे, ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. मेट्रो मार्ग 4 आणि 4अ मार्गामुळे ठाणे शहराला अखंडपणे मुंबई आणि उपनगरांशी जोडणी मिळणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने सतत पाठबळ दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कामाला वेग मिळाला आणि एमएमआरडीएने अनेक अडचणींवर मात करून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे."
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष
पूर्णत्व कालावधी- टप्पा १ : गायमुख – कॅडबरी जंक्शन : १०.५ कि.मी. - ४ स्थानके, डिसेंबर २०२५ - १० स्थानके एप्रिल,२०२६
- टप्पा २: कॅडबरी – गांधी नगर : ११ कि.मी. - ११ स्थानके - ऑक्टोबर, २०२६
- टप्पा ३: गांधी नगर – वडाळा : १२ कि.मी. - ११ स्थानके - ऑक्टोबर, २०२७
प्रकल्पाविषयीमेट्रो मार्ग - ४ चा विस्तार दक्षिणेला मेट्रो मार्ग ११ (वडाळा- सी.एस.टी.एम.) ला असून उत्तरेचा विस्तार हा मेट्रो मार्ग - ४अ (कासारवडावली गायमुख) व प्रस्थावित मेट्रो मार्ग १० (गायमुख - शिवाजी चौक) ला मीरा गाव पर्यंत प्रस्तावित आहे. सदर चारही मेट्रो मार्ग पूर्णत्वानंतर भारतातील सर्वात जास्त लांबी असा अंदाजित ५८ कि.मी चा उन्नत मार्ग उपलब्ध होऊन दैनंदिन २१.६२ लक्ष प्रवाश्यांना लाभ होईल.
आंतरबदल स्थानके:• गायमुख – मेट्रो मार्ग १०
• डोंगरीपाडा – ठाणे रिंग मेट्रो
• कापुरबावडी – मेट्रो मार्ग 5
• गांधी नगर – मेट्रो मार्ग 6
• सिद्धार्थ कॉलनी – मेट्रो मार्ग 2ब
• भक्ती पार्क – मेट्रो मार्ग 11 व मोनोरेल