देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच त्यांचा ७५वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी सर्व स्तरांतून आणि सर्व क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यामध्ये क्रीडाक्षेत्रही मागे नव्हते. देशविदेशांतील अनेक क्रीडापटूंनी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने व्यक्त केलेल्या भावनांचा घेतलेला आढावा...
अमृत महोत्सव म्हणजे एखाद्या व्यक्ती, संस्था किंवा देशाच्या स्थापनेचे किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेचा ७५वा वर्धापन दिन साजरा करणे. भारताने २०२२ साली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला. दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशाचा ७५वा वर्धापन दिन साजरा करणार्या सर्व भारतीयांनी बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी अजून एक अमृत महोत्सव साजरा केला, विदेशी लोकांच्या भाषेत ‘प्लॅटिनम जुबली.’ याचे निमित्त होते, लोकांसाठी समर्पित असलेल्या दि. १७ सप्टेंबर १९५० रोजी जन्मलेल्या एका व्यक्तिमत्त्वाचे.
स्वतंत्र भारताच्या १५व्या पंतप्रधानाचा, पूर्वाश्रमी ओळख असलेल्या जनसंघाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल स्वयंसेवकापासून, आज ओळखल्या जाणार्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा अर्थात नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा तो वाढदिवस होता. पंतप्रधान म्हणून आपण त्यांना ओळखण्यापूर्वी, गुजरातचे मुख्यमंत्री हीच त्यांची ओळख सर्वांना होती. हेच नरेंद्र मोदी आज भारतातील आबालवृद्धांना जितके परिचित आणि लोकप्रिय आहेत, तितकेच ते जागतिक पटलावरही परिचित आणि लोकप्रिय आढळतील. बालपणापासून शाखेत जात असल्याने, संघशाखेतील खेळांपासून ते जागतिक स्तरावरील क्रीडाप्रकारांची जाण असलेल्या मोदी यांच्यावर वाढदिवसानिमित्त, क्रीडाविश्वासहित सगळ्यांनीच शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला.
एका योग्याचा अमृत महोत्सव
लोकहितासाठी काम करणार्या ‘इशा फाऊंडेशन’चे संस्थापक असलेल्या जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरू यांनी योगाचा पुरस्कर्ता असलेल्या मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने व्यक्त केलेल्या भावनांत म्हटले आहे की, "योगाचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात पंतप्रधान मोदी यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा करून, योगाबद्दलची आवड अभूतपूर्व रीतीने वाढवण्यास आणि त्यामुळे होणारे कल्याण अधोरेखित करण्यास हातभार लावला आहे. आजच्या काळात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, योगाचे तंत्रज्ञान हाच आज मानवासमोरील मानसिक आरोग्य आणि शारीरिक आव्हानांवरील उपाय आहे. जर जगाच्या विकासासाठी एक स्थिर अंतर्गत व्यासपीठ तयार करायचे असेल, तर त्यात योगाभ्यासाची किंवा ध्यानाची किमान काही मिनिटे समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” सद्गुरूंचे हे विचार अंगी बाणवून, रोज पहाटे ४ वाजता उठून सकाळी नियमित योगासने, ध्यानधारणा आदी करणार्या नरेंद्र मोदींसारख्यांची दिनचर्या सगळ्यांनी आदर्शवत मानली पाहिजे.
ज्योतिने केली तेजाची आरती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर, एका शानदार थ्रीडी ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. ‘ज्योतिने तेजाची आरती’ नावाचा हा कार्यक्रम ४५ मिनिटे चालला. सुमारे एक हजार ड्रोन्सने, मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचे प्रदर्शन त्यात केले होते. पुणेकरांनी मैदानावर अलोट गर्दी करत, कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. असेच विविध विषयांवर अनोखे उपक्रम अनेकांनी साजरे केले. वानगीदाखल पुणेकर क्रीडाविश्वातील अजून एक उपक्रम पाहू. अवकाशात ड्रोन्सद्वारे मोदी यांना दिलेल्या शुभेच्छेसारखीच, पुणेकरांची आकाशातून दिलेली अजून एक शुभेच्छाही बघण्यासारखीच होती.
पुणेरी ‘फ्लाईंग बर्ड’च्या शुभेच्छा
‘क्वीन ऑफ स्काय’, ‘जंप क्वीन’, ‘फ्लाईंग बर्ड’ने आकाशातून दिल्या पंतप्रधानांना शुभेच्छा! भारतीय प्रोफेशनल स्कायडायव्हर, पॅराशूट जम्पर असलेल्या शीतल महाजन; ज्यांची पुणे हडपसरच्या ग्लायडींग सेंटर येथे, साडी नेसून पाच हजार फुटांवरून मारलेली उडी एक जागतिक विक्रम ठरली होती. शीतल महाजन यांचा जन्म पुण्याचा, मूळ जळगावच्या असलेल्या शीतल, या प्रसिद्ध कवयत्रि बहिणाबाई चौधरी यांच्या पणती आहेत. बहिणाबाई चौधरी यांचे नातू कमलाकर महाजन यांच्या त्या सुकन्या. पृथ्वीच्या सातही खंडांवर आकाशातून उड्या मारणार्या या जगातल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्याशिवाय उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जे पृथ्वीचे दोन टोक आहेत, तिथे जाऊनही त्यांनी उडी मारली आहे. असे करणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आतापर्यंत शीतल महाजन यांनी ‘छत्रपती क्रीडा पुरस्कार’, ‘पद्मश्री पुरस्कार’, ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ असे अनेक पुरस्कार पटकावले आहेत. अमेरिकेतील शिकागोमध्ये मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शीतल यांनी हजारो फुटांवरून स्काय डायव्हिंग करत, मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रॅण्डमास्टर ग्रॅण्डनेत्याबद्दल
याप्रसंगी बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टरनेही, देशाच्या ग्रॅण्डनेत्याबद्दल व्यक्त केलेले मनोगत आपण पाहूया. ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद सांगत होता की, ’जेव्हा मी माझ्या बुद्धिबळाच्या प्रवासाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा माझ्या काही आठवणी ताज्या होतात. फक्त बुद्धिबळाच्या पटावरच्याच नव्हे, तर प्रत्यक्ष आयुष्यातल्याही. त्या आठवणींपैकी एक क्षण गुजरातमधील आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी राष्ट्रीय अजिंयपद स्पर्धेत अहमदाबादमध्ये खेळायला गेलो होतो, तेव्हा माझी गुजराती थाळी खाण्याची एक साधी इच्छा होती. ही थाळी मला खूप आवडायची. खेळाव्यतिरिक्तचा तो माझा एक छोटासा आनंद असे. मी कधीच कल्पना केली नव्हती की, एके दिवशी माझ्या आयुष्यातील ही छोटीशी गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षात ठेवतील आणि ती साजरीही करतील.’
ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद एकदा राष्ट्रीय अजिंयपद स्पर्धेसाठी अहमदाबादला गेले होते, तेव्हाची मोदी यांच्याबद्दलची एक आठवण त्यांनी दि. १७ सप्टेंबर रोजी सांगितली. गुजराती थाळीचा आस्वाद घेण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. ही त्यांची इच्छा दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी पुरवतील, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. ग्रॅण्डमास्टर मोदी यांच्याबद्दल व्यक्त होत सांगत होते की; ’मला अजूनही तो क्षण आठवतो, जेव्हा एका सामान्य संभाषणादरम्यान मी नरेंद्र मोदी यांना गुजराती थाळीबद्दलच्या माझ्या प्रेमाबद्दल सांगितले. त्यांनी हे ऐकताच ते लगेच हसले आणि म्हणाले, "अरे, ठीक आहे, चल तर मग जाऊया.” कोणतीही औपचारिकता न बाळगता, ते मला स्टेट गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेले. जिथे आम्ही एकत्र बसलो आणि स्वादिष्ट गुजराती थाळीचा आस्वादही घेतला. तेव्हा मोदी यांनी अगदी प्रेमाने असेही म्हटले, "मी तुम्हाला आठवत असलेली सर्वोत्तम थाळी देऊ इच्छितो.” माझ्यासाठी ती एक नम्र आणि अविस्मरणीय कृती होती. एक आठवण करून देणारे हे नेते केवळ भव्य स्वप्नांद्वारेच नव्हे, तर अशा छोट्या क्षणांद्वारे तुमच्याशी नकळत जोडले जातात.
आनंद पुढे सांगतो; "बुद्धिबळाच्या जगातही मी त्यांचा नावीन्यपूर्ण उत्साह पाहिला आहे. पंतप्रधान मोदी यांनीच मला तेव्हा बुद्धिबळ ऑलिम्पियाड बद्दल सूचवले होते. जरी ऑलिम्पिकपासून वेगळे असले, तरी त्याची स्वतःची मशाल रिले असावी, ही एक क्रांतिकारी कल्पना होती आणि प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये मशाल समारंभाची ओळख करून देण्यात आली. आजही ती आपल्या खेळातील एक अभिमानास्पद परंपरा बनली आहे की, ज्याचा संपूर्ण जगाने स्वीकार केला आहे. ज्यावर्षी भारत आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करत होता, अशावेळी बुद्धिबळ ऑलिम्पियाडची ही मशालदेखील देशातील ७५ शहरांमध्ये फिरवण्यात आली होती. साध्या गुजराती जेवणातून असो किंवा जागतिक बुद्धिबळ परंपरेतून, ते नम्रता, नावीन्य, प्रेम आणि स्नेहाचे धडे मला शिकवून जातात.”
मेस्सीची जर्सी
या वर्षाच्या अखेरीस होणार्या बहुचर्चित भारत भेटीसाठी सज्ज होत असताना, अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू सुपरस्टार लिओनेल मेस्सी याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना, त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अर्जेंटिनाच्या २०२२ सालच्या ‘फिफा विश्वचषक’ विजयाची स्वाक्षरी असलेली जर्सी पाठवली आहे. मेस्सीच्या आगामी भारत भेटीचे आयोजन करणारे सताद्रु दत्ता यांनी, नुकतेच त्यांच्या संकेतस्थळावर तशी पुष्टी केलीे. मेस्सी दि. १३ डिसेंबर रोजी भारतात येणार आहे. कोलकाता येथे थांबून, तो तीन शहरांच्या दौर्याची सुरुवात करेल आणि त्यानंतर मुंबई आणि नवी दिल्लीला जाईल. तो अंदाजे दि. १५ डिसेंबर रोजी, पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे.
क्रीडाक्षेत्राचा कायापालट
भारतीय हॉकी संघाचा तत्कालीन कर्णधार राजपाल सिंग याचे २०११ सालचे, एक मर्मभेदी वक्तव्य माझ्या वाचनात आले होते. २०११ सालच्या काळात भारतीय हॉकी संघाला पुरवल्या क्रीडासामुग्रीमध्ये प्रमाणित नमुन्यापेक्षा, हलया दर्जाची क्रीडासामुग्री उपलब्ध करून दिली गेल्याविषयी राजपाल सिंग सांगत होता. त्याच्या खुलाशातून भारतातील क्रिकेट आणि क्रिकेटेतर खेळांमधील तफावत स्पष्टपणे कळून येत होती. आज त्यात आमूलाग्र फरक झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताच्या क्रीडा क्षेत्रात खोलवर परिवर्तन झाले आहे. भारतीय क्रीडाक्षेत्राचा कायापालट झालेला आढळून येत आहे. तर अशा भारतीय क्रीडा विश्वाकडून मोदींना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४