मुंबई : बॉलिवुडचा लोकप्रिय गायक जुबीन गार्गच्या निधनाने देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेलेल्या जुबीनचा स्कुबा डाइव्हिंग करताना अपघाती मृत्यू झाला. जुबीनच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर सिनेविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी जुबीनचं पार्थिव गुवाहाटी विमानतळावर पोहोचलं, तेव्हा त्याला अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता.
जुबीनचा हा आकस्मित मृत्यू आणि त्या बाबत बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सिंगापूर सरकारद्वारे जारी केलेल्या जुबीनच्या मृत्यू प्रमाणपत्राचा खुलासा केला आहे. या प्रमाणपत्रानुसार जुबीनचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला आहे.
सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंग करताना बुडाल्याने जुबीनचा मृत्यू झाल्याचं त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रात स्पष्ट केलंय. त्याच्या अकस्मात निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. २१ सप्टेंबरला रविवारी गुवाहाटीतील सरुसजाई स्टेडियममध्ये हजारो चाहते जुबीनच्या अंत्यदर्शनासाठी जमले होते. हजारो चाहते सकाळपासूनच सरुसजाई स्टेडियममध्ये गर्दी करत होते. काहींनी रात्रभर स्डेटियमच्या बाहेरच तळ ठोकला होता. चौथ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी जुबीन सिंगापूरला गेला होता. २० सप्टेंबर रोजी त्याचा परफॉर्मन्स होता. पण त्यापूर्वीच जुबीनचा मृत्यू झाला. जुबीनच्या निधनानंतर हा फेस्टिव्हल रद्द करण्यात आला.
दरम्यान, रविवारी आसाम मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात जुबीनसाठी एक मिनिट मौन पाळण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की गुवाहाटीजवळील एका गावात जुबीनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. २३ सप्टेंबर रोजी शासकीय इतमामात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत जुबीनची पत्नी गरिमाने सांगितलं, “तो इतर सात-आठ लोकांसोबत एकाच जहाजाने सिंगापूरच्या एका बेटावर गेले होते. यावेळी त्याच्यासोबत ड्रमर शेखर आणि सिद्धार्थसुद्धा उपस्थित होते. ग्रुपमधल्या सर्व सदस्यांनी लाइफ जॅकेट्स घातले होते. परंतु जेव्हा जुबीन पुन्हा पोहायला गेला, तेव्हा त्याला झटका आला.’’ पुढे गरिमाने सांगितलं, “ते सर्वजण एकत्र पोहत होते. त्यानंतर ते किनाऱ्यावर आले होते. त्या सर्वांनी लाइफ जॅकेट घातलं होतं. परंतु जुबीन पुन्हा पोहायला गेला आणि त्याचवेळी त्याला झटका आला.”
जुबीन फक्त हिंदीच नाही तर बंगाली आणि आसामी सिनेविश्वातीलसुद्धा प्रसिद्ध गायक होता , तो एक अप्रतिम गायक असण्यासोबतच अभिनेता आणि लेखकही होता. जुबीनचा जन्म १८ नोव्हेंबर १९७२ रोजी मेघालयमध्ये झाला होता. आसामी भाषेबरोबरच जुबीनने बंगाली, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, मराठी, मिसिंग, नेपाळी, ओडिया, संस्कृतसारख्या जवळपास ६० भाषांमध्ये गाणी गायली होती. असा मोठा प्रवास जुबीन यांचा राहिला आहे.
अभिनेत्री कंगना रणौत, इम्रान हाश्मी आणि शाइनी आहूजा यांच्या गँगस्टर चित्रपटासाठी त्यांनी प्रसिद्ध गाणे ‘या अली’ गायले होते. जुबीन यांना जवळपास १२ प्रकारचे संगीत वाद्ये वाजवता येत होती. जुबीन यांचे पूर्ण नाव जुबीन बोरठाकुर गार्ग होते. १९९५ मध्ये जुबीन मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी पहिला इंडिपॉप अल्बम चांदनी रात लाँच केला. त्यांनी दिल से (१९९८), डोली सजा के रखना (१९९८), फिझा (२०००), कान्टे (२००२) सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायली होती. याशिवाय अनेक पुरस्कार हे जुबीनच्या नावावर आहेत.