रामकाल पथ आणि मनपा

22 Sep 2025 22:04:16

येत्या दोन वर्षांत नाशकात होणाऱ्या कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून दररोज जोरबैठका काढल्या जात आहेत. त्याअंतर्गत, विविध विभागांना आपले आराखडे सादर करण्याचे फर्मान सोडले गेले आहे. यासोबतच साधू-महंतांना विश्वासात घेतले जात नाही म्हणून, त्यांचीही समजूत काढण्यासाठी जिल्हाधिकार्यांना वणवण करावी लागत आहे. तर या कुंभपर्वात दुसरीकडे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, पौराणिक माहात्म्य असलेल्या आणि सातासमुद्रापार महती गेलेल्या नाशिक नगरीच्या गल्लीबोळात, देश-विदेशांतील भाविक अगदी सहज फिरताना दिसून येतील. नाशिकची हीच पौराणिक ओळख अधिक ठळक होऊन, प्रभू श्रीराम यांच्या पाऊलखुणा अधोरेखित व्हाव्यात या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेट असलेला ‘रामकाल पथ प्रकल्प’ नाशिक महापालिकेच्या माध्यमातून मार्गी लागणार असल्याने, नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

परंतु, या प्रकल्पाने बाधित होणाऱ्या रहिवाशांसोबत आयुक्तांची बोलणीच सुरू असून, त्यांना घरे देण्याचे आश्वासन दिले जात आहे. या प्रकल्पामुळे पंचवटीचा चेहरामोहरा बदलणार असून, यानिमित्ताने रामकुंडाकडे येणारे सर्वच रस्ते प्रशस्त होतील. सोबतच पादचार्यांसाठी जागा निर्माण केली जाणार असून, प्रभू श्रीरामांची रामकुंडावर भव्य मूर्तीही उभी राहणार आहे. त्यासाठी रामकाल पथ मार्गात येणारे अडथळे, मनपाच्या माध्यमातून लवकरच दूर केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर निर्माण होण्यासाठी शासन जरी उत्सुक असले, तरी प्रशासन काहीसे उदासीनच असल्याचे चित्र आहे. एव्हाना रामकाल पथ प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात होऊन, महिना दोन महिने उलटून जायला हवे होते. मात्र, अजूनपर्यंत या कामाचा नारळही वाढविण्याचे कष्ट, अजूनतरी घेण्यात आलेले नाही. परिणामी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल का? यावर शंका उपस्थित केली जात आहे. आता तरी महापालिकेने या कामाला गती देऊन, तो उभारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, एवढीच अपेक्षा.

‘जिप’चा सर्वसाधारण अध्यक्ष

जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा दिवाळीनंतर उडण्यास खर्या अर्थाने सुरुवात होईल. त्यादृष्टीने निवडणुकीच्या आखाड्यात नशीब आजमावण्यासाठी, आतापासूनच अनेकांनी दंड थोपटले आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या नवरात्रोत्सवात, काही इच्छुकांनी आपल्या प्रचाराची हौसही भागवून घेतली. त्यात अगदी काल-परवाकडेच साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण, सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाले. परिणामी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत, आपल्या उमेदवारीचा गळ पक्षाच्या वरिष्ठांकडे टाकून ठेवण्यास सुरुवात केली. उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी त्यांच्या जोरबैठका सुरूच आहेत. त्यामुळे यंदा अध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची चिन्हे असून, इच्छुकांनी त्यादृष्टीने रणनीती आखण्यास प्रारंभदेखील केला आहे. त्यात जिल्हा परिषदेचे एकूण ७४ गट आणि पंचायत समित्यांचे एकूण १४६ गण आहेत. गट व गणांची रचना अंतिम झाल्यानंतर, राज्य शासनाने फिरत्या आरक्षण पद्धतीला ‘ब्रेक’ लावत नव्याने आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्गातून ‘मविप्र’ संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर हे अध्यक्ष राहिले. त्यांच्या अगोदर सिन्नरच्या शितल सांगळे या सर्वसाधारण महिला, तर विजयश्री चुंबळे या ओबीसी महिला प्रवर्गातून अध्यक्ष राहिल्या आहेत. अध्यक्षपदी पुन्हा सर्वसाधारण गटातील व्यक्तीला संधी मिळणार असल्याने, इच्छुकांनी यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यातच सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले ग्रामीण भागातील, सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेकजणांचा जिल्हा परिषद सदस्यपद मिळविण्यासाठीही आटापिटा सुरू आहे. त्यासाठी वाटेल त्या मार्गाने लक्ष्मीदर्शन घडविण्याचा प्रयत्न आडमार्गाने केला जाईलच. त्यात नाशिकचे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे महत्त्व मोठे. त्यामुळे ते आपल्याकडेच राहावे, यासाठी सर्वच बाहुबली ताकद लावतील. दुसरीकडे सर्वसामान्य मतदारांचा हिरमोड झाला आहे. दिवाळीच्या मागेपुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या असत्या, तर लक्ष्मीदर्शन होऊन आपली दिवाळी अधिक गोड झाली असती अशी खुमासदार चर्चा गाव-खेड्यांतील पारावर चघळली जात आहे. एकंदरीतच मतदार आणि उमेदवार दोघेही आपल्या परिने स्वहित कसे साधले जाईल, या काव्यात मश्गुल असल्याचे दिसून येत आहे.

विराम गांगुर्डे


Powered By Sangraha 9.0