
सेमीकंडटरचा मू्ळ शोध कुणी लावला? तीन वर्षे बिनपगारी शिकवण्याचा यशस्वी सत्याग्रह कुणी केला? सर सी. वि. रमण यांचे संशोधन कोणत्या संस्थेमध्ये झाले? भिलाईला मातीत खनिज आहे, हे टाटांना सांगणारे कोण? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयास व त्याद्वारे तशी राष्ट्रीय वैज्ञानिक वृत्ती लहानपणीच निर्माण होऊन वाढीस लागावी म्हणून, ‘विज्ञान भारती’तर्फे घेतली जाणारी परीक्षा म्हणजे ‘विद्यार्थी विज्ञान मंथन.’ त्यानिमित्ताने या उपक्रमाचा घेतलेला आढावा...विद्यार्थी विज्ञान मंथन’ ही नवभारत निर्मितीसाठी, डिजिटल उपकरणाच्या आधारे घेतली जाणारी सर्वांत मोठी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा आहे. ‘विज्ञान भारती’ ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये व अन्य सहा देशांमध्ये पसरलेली चळवळ असून, याअंतर्गत स्वदेशी भावनेशी निगडित विज्ञाननिष्ठ असे विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. (www.vibhaindia.org) त्यातील एक उपक्रम म्हणजे, ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ (VVM). ही वैज्ञानिक प्रतिभा, प्रज्ञाशोध परीक्षा ‘राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद’ (एनसीएसएम), भारत सरकारचे ‘संस्कृती मंत्रालय’, ‘एनसीईआरटी’ व ‘विज्ञान भारती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. या परीक्षेला २० प्रश्न हे भारताचे विज्ञान विश्वातील योगदान, २० प्रश्न सत्येंद्र नाथ बसू यांचे जीवनकार्य या विषयावर असून, ५० प्रश्न वर्गानुसार पाठ्यक्रमावर (गणित आणि विज्ञान) व दहा प्रश्न तर्कावर (बुद्धिमत्ता चाचणी) आधारित असतील. सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील. पहिल्या ४० प्रश्नांसाठी लागणारी पुस्तके ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ (VVM)च्या संकेतस्थळावर (
https://vvm.org.in) मिळतील. ही परीक्षा दरवर्षी इयत्ता सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. सर्व नोंदणी प्रक्रिया तसेच प्राथमिक परीक्षाही ऑनलाईन असते.
हा झाला पहिला स्तर. यात उत्तीर्ण झालेल्यांची ५० प्रश्न, ५० गुणांची ४५ मिनिटांची दुसऱ्या स्तराची परीक्षा नकारात्मक गुणपद्धतीने ऑनलाईनच होईल. यातील प्रत्येक वर्गातील वरचे २५ विद्यार्थी, प्रांत शिबिरांत बोलावले जातील. एखाद्या नामांकित महाविद्यालयात हे शिबीर होते. इथे झालेल्या परीक्षणातून, प्रत्येक वर्गातील सर्वोच्च दोन विद्यार्थी राष्ट्रीय शिबिरांत बोलावले जातात. तिथेे दोन दिवसांचे परीक्षण झाल्यावर त्यातून राष्ट्रीय विजेते निवडले जातात. हे शिबीर ‘आयआयटी’, ‘आयआयसीईआर’ अशा उच्च दर्जाच्या संस्थेत घेतले जाते.
गेल्या वर्षी देशभरातून ४ हजार, २०० शाळांमधून, १ लाख, ५५ हजार विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. यावर्षीसुद्धा ही ओपन बुक परीक्षा १४ भाषांमधून देता येणार आहे. नोंदणीपासून ते राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेपर्यंतची विस्तृत माहिती, आपल्या vvm.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोंदणीसाठी शेवटचा दिवस दि. ३० सप्टेंबर रोजीपर्यंत आहे. या परीक्षेतील प्रांतीय व क्षेत्रीय विजेत्यांना रुपये पाच हजार, तीन हजार, दोन हजार आणि राष्ट्रीय विजेत्यांना २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये रोख पारितोषिके दिली जातात. तसेच, राष्ट्रीय व क्षेत्रीय विजेत्यांना राष्ट्रीय नामांकित प्रयोगशाळा किंवा ‘डीआरडीओ’, ‘इस्रो’, ‘सीएसआयआर’, ‘बीएआरटी’, ‘आयआयटी’ यांसारख्या प्रमुख संशोधन संस्थांमध्ये, विस्तृत प्रशिक्षण कार्यक्रमात (एक ते तीन आठवडे) सहभागी होण्याची संधीही मिळते. राष्ट्रीय विजेत्यांना दोन हजार रुपये प्रतिमाह अशी शिष्यवृत्ती, एका वर्ष विशिष्ट कायार्र्साठी व कार्याच्या प्रगतीच्या प्रमाणात दिली जाते. तरी या स्पर्धेची माहिती आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना द्यावी, तसेच या ‘स्वदेशी विज्ञान’ चळवळीत आपल्या भावी पिढीस अधिक संख्येने समाविष्ट होण्यासाठी प्रेरणा द्यावी, ही आग्रहाची विनंती.
विस्तृत माहिती लिंक (https://vvm.org.in)
(लेखिका छत्रपती शिक्षण संस्था, कल्याण येथे विज्ञान शिक्षिका आहेत.)
७५०६७४०१०५
परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क, कोकण प्रांत समन्वयक
डॉ. रविकांत आळतेकर - ९८६९९५१९१०