
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक माधव विनायक कुलकर्णी उपाख्य मधुभाई यांचे गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये प्रचारक असताना मधुभाईंशी त्यांचा निकटचा संबंध आला होता. ‘समरसता मंच’चे काम देशव्यापी विस्तारावे, यासाठी मधुभाईंनी देशभर प्रवास केला. तसेच ‘समरसता मंच’च्या सर्व संमेलनामध्ये मधुभाईंनी वेळोवेळी सहभागी होऊन सक्रिय मार्गदर्शनही केले. मधुभाई अगदी अखेरच्या क्षणापर्यंत शाखा, प्रवास आणि संवाद असे संघकामात सक्रिय होते. अशा या ‘आधुनिक दधिची’ ठरलेल्या संघसमर्पित मधुभाई कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत असतानाच, संघकामासाठी अहोरात्र कष्ट करणारे, १९६२ सालापासून संघाचे प्रचारक असणारे मधुभाई कुलकर्णी यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. या विजयादशमीचा संघाचा उत्सव त्यांना पाहता आला असता, तर खूप बरे झाले असते. आपण ज्या कामासाठी आयुष्यभर अपार कष्ट केले, ज्या काळात अत्यंत प्रतिकूल वातावरणात संघाचे काम स्वीकारले व असिधाराव्रताने ते आयुष्यभर केले, त्याची शताब्दी पाहण्याचे भाग्य लाभले असते, तर त्यांना आनंदच झाला असता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम पू. डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली सुरू केले व आपल्या हयातीत त्यावेळच्या देशातील सर्व राज्यांत विस्तार केला. त्यावेळी त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाबरोबर त्यांचे जे सहज भेटणे होते, ते अत्यंत संवेदनशीलपणे प्रत्येक स्वयंसेवकाला हाताळत असत. त्याच स्वयंसेवकांनी संघकामाचा विस्तार सर्व देशभर केला. अत्यंत तरुण वयामध्ये संघ कामासाठी कोणी कोलकाताला गेला, कोणी केरळला गेला, कोणी मध्य प्रदेशमध्ये गेला, कोणी आसामला गेला, कोणी कर्नाटकात गेला, कोणी पुण्यात आला, कोणी दिल्लीला गेला, कोणी पंजाबमध्ये गेला, कोणी उत्तर प्रदेशला गेला, कोणी लाहोरला गेला, तर कोणी गुजरातला गेला. असा एक विलक्षण अनुभव संपूर्ण देशाला आला व काम करायला गेलेले जवळपास सर्व कार्यकर्ते आजन्म ब्रह्मचारी राहून जिथे गेले, तेथील कार्यकर्त्यांना उभे करून त्यातूनही प्रचारक बाहेर निघाले. आधुनिक काळात जगात असे दुसरे उदाहरण नाही. एक व्यक्ती हे कसं करू शकली? असा अनेक वेळा प्रश्न पडतो. पू. डॉ. हेडगेवारांचे चरित्र वाचत असताना हे लक्षात येते की, असेच आपल्यासारखे प्रचारक त्यांनी उभे केले, हे त्यांचे वैशिष्ट्य. आता डॉ. हेडगेवारांना आपण काही पाहिलेले नाही. परंतु, तसेच वर्तन करणारे अनेक प्रचारक आजही आपण पाहतो. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे, मधुभाई कुलकर्णी!
मधुभाई यांचा जन्म १९३८ साली कोल्हापूरला झाला. चिकोडी येथे त्यांची वाढ झाली. बालपणीच संघाशी संबंध आला. मुंबईमध्ये रुपारेल महाविद्यालयामध्ये त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. काही काळ सेल्स टॅस खात्यामध्ये सेवाही झाली. परंतु, १९६२ साली संघाचे तालुका प्रचारक म्हणून ते बाहेर पडले. डॉ. हेडगेवारांची जी वैशिष्ट्ये मी सांगितली आहेत, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मधुभाई कुलकर्णी! मधुभाई जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक असताना त्यांची अपार कष्ट करण्याची प्रवृत्ती, एक एक कार्यकर्ता जोडून त्याचा गुणविकास कसा होईल, अशी काळजी घेणारे, सहज वागण्या-बोलण्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खूप मोठा प्रभाव कार्यकर्त्यांवर निर्माण होत असे. ते विभाग प्रचारक असताना माझा पहिला संपर्क पुणे येथील संघ शिक्षा वर्गामध्ये झाला. त्या वर्गामध्ये स्वयंसेवकांना विविध प्रकारच्या सूचना ते देत असत. त्यांच्या सूचना अत्यंत स्पष्ट व कडक शिस्तीच्या वाटायच्या. त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांच्या मृदुभाषी स्वभावाचा अनुभव यायचा.
नंतर ते गुजरात प्रांताचे प्रांत प्रचारक झाले व माधवरावांचे ‘मधुभाई’ झाले. गुजरात प्रांतामध्ये संघकामाचा विस्तार वेगाने झाला. उत्तम प्रकारे ते गुजरातीमधून संभाषण करू लागले. कार्यकर्त्यांचे भेटणे व त्यातूनच त्यांच्या गुणांचा संघकामासाठी उपयोग करून घेणे व नवनवीन प्रचारकही बाहेर पडणे सुरू झाले. याच कालखंडामध्ये माझ्या स्मरणाप्रमाणे नरेंद्र मोदी गुजरातमध्ये प्रचारक होते. त्यांच्याशीही त्यांचा निकटचा संबंध आला. नंतरच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी हे राजकीय क्षेत्रामध्ये काम करू लागले. त्यांच्याशी त्यांचा शेवटपर्यंत संपर्क राहिला. आपल्याबरोबर काम करणारा एक कार्यकर्ता हा देशाचा पंतप्रधान आहे, हे बघण्याचे भाग्य त्यांना लाभले.
सतत प्रवास, सतत वाचन, कोणत्याही विषयावर त्यांचे चिंतनशील भाष्य असायचे. वृत्तपत्रीय वाचन व त्यावरील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा, चालू घडामोडींबद्दल संवाद, वृत्तपत्रांमध्ये काही पत्र लिहिणे, काही लेख लिहिणे हे चालू असायचे. संघाच्या अखिल भारतीय बैठकांमध्ये त्यांच्याबरोबर सहभागी होण्याचा अनेक वेळा योग आला. कोणत्याही विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्यावर मनाला विशेष आनंद मिळायचा. ते पश्चिम क्षेत्राचे क्षेत्र प्रचारक होते. त्यावेळी त्यांच्याशी सतत संपर्क होत गेला. कोणत्याही विषयावर त्यांच्याशी चर्चा करताना खूप आनंद व्हायचा. ते संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते, त्यावेळी मी पश्चिम क्षेत्र बौद्धिक प्रमुख होतो. त्यामुळे संघाच्या अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा व्हायच्या. त्यापेक्षाही बौद्धिक विभागाच्या बैठकीमध्ये अत्यंत सुस्पष्ट मार्गदर्शन व्हायचे. बौद्धिक विभागाचा विस्तार देशव्यापी व्हावा म्हणून, ते अनेक कार्यक्रम सूचवायचे आणि आम्हा बौद्धिक विभागाच्या कार्यकर्त्यांच्या कामावर त्यांचे लक्ष असायचे. ठरलेले कार्यक्रम ठीक पार पाडले जात आहेत ना, यांवर त्यांचे लक्ष असायचे. त्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा करणे, कार्यक्रम आखणे, त्यांचे क्रियान्वयन करणे, हा आमचा स्वभावच बनला. संघाच्या सैद्धांतिक भूमिकेसंबंधात ते खूपच सतर्क असत. अनेक प्रकारच्या चर्चा घडवत. काही पुस्तके वाचायला सांगत. नंतर वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करत. अनेक वेळा निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून आलेल्या लेखांची कात्रणे वाचायला देत. नंतर गप्पागोष्टीत त्यावर प्रश्न विचारत, अशा तर्हेने कार्यकर्त्याला ते अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत.
त्यांनी ‘अथातो संघ जिज्ञासा’ हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाबद्दल त्यांनी काही प्रश्न विचारले. त्यावेळी ते मी वाचलेले नव्हते. संभाजीनगरच्या संघ कार्यालयातून ते पुस्तक मी मिळवले व त्याचे वाचन केल्यानंतर त्यांच्याशी त्या पुस्तकावर मी चर्चा केली. त्यांना खूप आनंद झाला. हे एक छोटेखानी, परंतु संघ आचार व विचारांची योग्य माहिती देणारे एक पुस्तक आहे, ते देशातील अनेक भाषांमध्ये भाषांतरितही झाले आहे.
संघामध्ये ‘समरसता मंच’चा विषय १९८३ साली सुरू झाला. १९८५ साली मी महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह असताना त्याची जबाबदारी माझ्याकडे आली व सहप्रांतप्रचारक कै. दामूअण्णा दाते हे मार्गदर्शक होते. अनेक अधिकारी व संघ कार्यकर्ते यांच्या सहकार्याने सुमारे २५ वर्षे महाराष्ट्रामध्ये आम्ही याचे खूप प्रयोग केले, खूप जाहीर कार्यक्रम केले. फुले-आंबेडकर संदेश यात्रा काढली. समरसता संमेलने घेतली. या सर्व काळात अनेकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्य मार्गदर्शन दत्तोपंत ठेंगडी यांचे होते. नंतर मुकुंदराव पणशीकर, शिवराय तेलंग, मोहनराव गवंडी, नाना ढोबळे व मधुभाई कुलकर्णी अशा अनेक राष्ट्रसमर्पित कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन लाभले. ज्यावेळी ‘समरसता मंच’च्या कामाचे अखिल भारतीय स्वरूप निर्माण झाले, त्यावेळी ‘अखिल भारतीय संयोजक’ म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली आणि मार्गदर्शक म्हणून मधुभाई कुलकर्णी यांच्याकडे जबाबदारी आली. या काळात ‘समरसता मंच’चे काम देशव्यापी व्हावे, यासाठी मधुभाई कुलकर्णी यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी संपूर्ण देशभर प्रवास केला. सर्व प्रांतांच्या बैठकींमध्ये उपस्थित राहिले. त्या काळामध्ये निर्माण होणार्या सामाजिक प्रश्नासंबंधात ते खूप सतर्क असायचे. अनेक अभ्यासवर्ग घडविण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. ‘समरसता मंच’चा एक तीन दिवसांचा अखिल भारतीय अभ्यासवर्ग बडोदा येथील सोकडा या गावी झाला होता. या वर्गासाठी पू. सरसंघचालक, मा. सरकार्यवाह व अनेेक अखिल भारतीय अधिकारी पूर्ण वेळ उपस्थित होते. याचे नियोजन व त्यातील विषयाचे चिंतन करण्यामध्ये कै. मधुभाईंचा खूप मोठा वाटा होता. या बैठकीनंतर ‘समरसता मंच’चा देशव्यापी विस्तार झाला. नंतरच्या काळात दोनवेळा अखिल भारतीय बैठकाही झाल्या. हे श्रेय मधुभाई कुलकर्णी यांना जाते. एखादा विषय सर्वांगाने कसा करावा, याचे मार्गदर्शन ते सातत्याने करीत असत. एकदा चर्चा करीत असताना ‘समरसता हा व्यवहार झाला पाहिजे असे वाटत असेल, तर महिलांचा म्हणजे मातृशक्तीचा सहभाग हा त्यामध्ये असला पाहिजे,’ अशी चर्चा झाली व यासाठी काय करावे, याचा विचार विनिमय झाल्यानंतर देशातील सर्व प्रांतांमध्ये महिला संमेलने घेता येतील का? असा विषय पुढे आला आणि तसे ते केले पाहिजे, असा निर्णय झाला. मुख्यतः या संमेलनामध्ये मधुभाई कुलकर्णी यांनी सहभागी व्हावे, अशी योजना केली आणि देशातील सर्व प्रांतांमध्ये ‘समरसता’ या विषयासाठी महिला संमेलनांचे आयोजन झाले. जवळपास सर्व संमेलनामध्ये मधुभाईंनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे कुटुंबामध्ये ‘समरसता’ या विषयाचे स्थान निर्माण व्हायला मदत झाली. म्हणजे ‘समरसता’ हा भाषणाचा किंवा लिखाणाचा विषय नसून वर्तनाचा विषय आहे. म्हणून सतत प्रयत्नपूर्वक केला पाहिजे, त्याच्यामध्ये सातत्य हवे, असा विषय त्यांनी सर्व देशभर मांडला आणि मधुभाईंचे हे वैशिष्ट्य होते की, कोणत्याही विषयाचा पूर्व अभ्यास व पूर्ण अभ्यास ते करत असत. कार्यकर्त्यांना करायला लावत. हे सर्व करीत असताना नित्य शाखा यावर त्यांचा कटाक्ष असे. शेवटचा काही काळ संभाजीनगरच्या संघ कार्यालयात ते राहत होते. मी वारंवार त्यांना भेटण्यासाठी जात असे. संभाजीनगरला जे नवीन संघ कार्यालय ‘समर्पण’ निर्माण झाले, तेथे त्यांचे वास्तव्य होते व तेथेच त्यांना आजारपणात त्रास झाल्यामुळे डॉ. हेडगेवार रुग्णालयात उपचारामध्ये असताना त्यांनी अंतिम श्वास घेतला. पू. डॉ. हेडगेवारांसारखे जीवन जे स्वतः जगले व डॉ. हेडगेवारांच्या नावाने असणार्या रुग्णालयामध्ये त्यांचा अंत झाला. समाजाच्या संरक्षणासाठी ‘वज्र’तयार करण्यासाठी आपली हाडे देणार्या दधिची ॠषींची आठवण करून देणारे जीवन म्हणजे मधुभाई कुलकर्णी यांचे जीवन होय. त्यांच्या संपर्कात आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संघ कामामध्ये सक्रिय होणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, ही त्याच्या चरणी प्रार्थना!
दादा इदाते