गजानन मेहेंदळे : एक सच्चा इतिहास तपस्वी

    21-Sep-2025
Total Views |

ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे नुकतेच वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले. मागील पाच दशकांहून अधिक काळ इतिहास संशोधनासाठी जीवन समर्पित केलेल्या मेहेंदळे यांनी शिवरायांचा इतिहास, महायुद्धांचा सामरिक इतिहास यांची तथ्यात्मक मांडणी केली. अशा या सच्च्या इतिहास तपस्वीला जवळून अनुभवायचे भाग्य लाभलेल्या निखिल बेल्लारीकर यांचा हा श्रद्धांजलीपर लेख...



दि. १७ सप्टेंबर रोजीच्या रात्री फोनवर बोलत असताना, बायकोने मला हाका मारायचा सपाटा लावला. काय झाले ते विचारल्यावर एक फेसबुक पोस्ट दाखवून म्हणाली, "मेहेंदळे सर गेले...” ते ऐकताक्षणी मोठा धक्का बसला. मला ते खरेच वाटेना. ‘काय?’ हा एकच प्रश्न मी वेड्यासारखा पुन्हा पुन्हा विचारत राहिलो. नंतर त्याची खातरजमा करूनही मन काही ते मानायला तयार नव्हते, अजूनही नाहीच! अवघ्या १२ दिवसांमागे सरांना भेटलो होतो. तेव्हा त्यांची तब्येत थोडी खालावलेली वाटली, तरी बहुतांशी ते नेहमीसारखेच तल्लख होते. इतिहास म्हटलं की, ते अंतर्बाह्य खुलून येत असत. तो त्यांचा ध्यास नसून श्वास झाला होता. ‘तपस्वी’, ‘ऋषितुल्य’ वगैरे विशेषणे आजमितीस घासून गुळगुळीत झाली असली, तरी काही लोकांच्या बाबतीत ती एकदम चपखल बसतात. अशा मोजया लोकांपैकी गजानन भास्कर मेहेंदळे उर्फ मेहेंदळे सर हे होते.

सरांसोबत माझा परिचय जवळपास वीसेक वर्षांपासूनचा. २००५ साली मी अभियांत्रिकी शिक्षणासाठी मिरजेहून पुण्यात आलो. नव्या वातावरणाशी जुळवून घेत हळूहळू पुण्यात थोडीफार भ्रमंती सुरू केली. इतिहासाची आवड असल्याने गोनीदा, पुरंदरे इत्यादींचे लेखन थोडेफार वाचले होते. त्यातच एके ठिकाणी पुण्यातील ‘भारत इतिहास संशोधन मंडळा’चा उल्लेखही वाचला होता. तडक एके दिवशी तिथे थोडासा भीतभीतच जाऊन थडकलो. पुढे पुढे तिकडे नियमित जाऊ लागलो. तिथे गेल्यावर लोकांच्या चर्चा ऐकायचो. साधारण साठीचे एक गृहस्थ तिथे नियमित येत आणि अन्य लोक त्यांना खूप मान देत, हे मला एव्हाना जाणवले होते. अशातच एकदा त्यांना मी एक शंका विचारली. त्यांनी तिचे तत्काळ निरसन केले. मग त्यातून जुजबी ओळख झाली आणि त्यांचा मोबाईल क्रमांक घेताना त्यांचे नाव विचारले. ‘मेहेंदळे’ एवढेच नाव त्यांनी सांगितले. काही दिवसांनी एका इतिहासप्रेमी कॉलेजमित्राला सांगितले की, ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त कुणी मेहेंदळे म्हणून आहेत, ते ऐतिहासिक माहिती खूप छान सांगतात. हे ऐकल्याबरोबर मित्र तीन ताड उडाला.

"ते कोण आहेत तुला माहिती तरी आहे का?”

"नाही!” आता चकित होण्याची पाळी माझी होती. एरवी माझे वाचन उत्तम असल्याबद्दलचा अभिमान आता साफ मावळला होता. मग त्याने त्यांच्या दोनखंडी शिवचरित्राबद्दल सांगितले. मला हे काहीच माहीत नव्हते. मंडळाच्या ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक मागवले आणि वाचायला सुरुवात केली. त्या शिवचरित्रामागची तर्ककठोर भूमिका, प्रत्येक गोष्टीचा मुळापासून केलेला अभ्यास, प्रत्येक विधानाला दिलेले टनावारी संदर्भ, ऐतिहासिक साधनांची केलेली धारदार चिकित्सा या सर्वांनी मनावर जे गारूड घातले ते आजतागायत आणि मग एवढ्या मोठ्या माणसाशी आपण अघळपघळ वागत असल्याची मला भयंकर लाज वाटली. पण, सरांनी आपल्या विद्वत्तेचे अवडंबर कधीच माजवले नाही. ते सर्वांना सारख्याच आदराने वागवत.

त्यानंतर आमच्या भेटीगाठी वरचेवर होऊ लागल्या. त्यातून तसेच इतरांकडून सरांबाबतच्या अनेक गोष्टी समजल्या. त्यांचा जीवनप्रवास निव्वळ थक्क करणारा आहे. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मून व वाढूनही त्यांची विचारपद्धती त्यापेक्षा पूर्ण वेगळी होती. पुणे विद्यापीठात ‘डिफेन्स स्टडीज’ या विषयात त्यांनी बहिस्थ प्रकारे पदवी मिळवली. त्यात त्यांना सुवर्णपदकही मिळाले. पुढे पत्रकाराची नोकरी करत असताना ते चक्क बांगलादेशला म्हणजे, तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानला जाऊन आले. त्या युद्धाचे जवळून रिपोर्टिंग करता यावे, हा मुख्य हेतू. त्यासाठी जीव धोयात टाकून ते भारताची हद्द ओलांडून पलीकडे गेले. तिथे पाकिस्तानी सैन्याविरुद्ध एका चकमकीत सहभागीही झाले. परत आल्यावर त्यांनी त्यावर एक इंग्रजी पुस्तकही लिहिले. परंतु, त्यात लष्कराचे तपशीलवार उल्लेख असल्याने त्यांच्या प्रकाशनाला परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा सरांचे वय होते अवघे २५!त्यानंतर सरांनी मध्ययुगीन इतिहासाचा, त्यातही मराठेशाही आणि विशेषतः शिवचरित्राचा अभ्यास सुरू केला. ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त त्यांची ही अविरत साधना सुरू झाली. ग. ह. खरे, माधवराव ओंकार इत्यादी महान संशोधक आणि अभ्यासकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. परंतु, एक अभ्यासक म्हणून सरांची वाटचाल ही बहुतांशी स्वतंत्रच होती. मंडळातल्या पूर्वसूरींपेक्षा त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही अंमळ वेगळी असल्यामुळे त्यांच्या विवेचनातही त्याचे प्रतिबिंब दिसते. मोडी लिपीखेरीज फारसी, पोर्तुगीज, फ्रेंच या भाषाही इतिहास संशोधनाला आवश्यक इतया प्रमाणात सर शिकले. त्या त्या भाषांमधल्या संदर्भांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. विशेषतः ‘शिवचरित्र’ साहित्यनामक पुस्तकमालेचे १४ खंड तर सरांना तोंडपाठ होते आणि यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. एकदा माझ्यादेखतच शिवकालीन पत्रांचा एक मोठा गठ्ठा सरांनी १०-१५ मिनिटांत हे खंड एकमध्ये हे खंड १४ मध्ये असे करत करत बसल्याजागी वर्गीकृत केला होता. त्यांच्या अभ्यासातील नेमकेपणा आणि बारकाव्यांचे असे प्रत्यंतर वारंवार येत असे, मग ते बोलण्यात असो किंवा सरांच्या शिवचरित्रात असो.

त्यांचे दोनखंडी मराठी शिवचरित्र म्हणजे, निव्वळ बौद्धिक मेजवानी आहे. पहिल्या खंडात अफजलवधापर्यंतचे चरित्र आहे. त्यातही प्रत्येक पानावर अनेक लहानमोठ्या तळटीपा आहेत. पण, मेहेंदळे सरांच्या बुद्धीचे खरे प्रखर तेज दिसते ते दुसर्या खंडात. हजारपेक्षा जास्त पानांच्या या खंडात शिवचरित्रातील अनेक महत्त्वाचे मुद्दे, उदा. छत्रपती शिवाजी महाराजांची खरी जन्मतारीख, साक्षरता, ऐतिहासिक कागदपत्रांच्या खरेखोटेपणाचे परीक्षण इत्यादींचा इतका तर्कशुद्ध परामर्श घेतला आहे की, त्या विवेचक क्षमतेपुढे नतमस्तक व्हायला होते. इंग्रजीत म्हणतात तशी ती र्’ीेीीं वश षेीलश’ आहे. यानंतर दशकभराने सरांनी इंग्रजीत एक पूर्ण शिवचरित्रही लिहिले. ते मराठी चरित्रापेक्षा थोडे संक्षिप्त आहे. तरी त्यात ७०० पर्यंत पानांचा मजकूर आणि २०० पाने भरून तळटीपा आहेत!

पण, निव्वळ ‘शिवचरित्रकार’ हे बिरुदही सरांवर अन्याय करणारेच आहे. ‘मिलिटरी हिस्टरी’ अर्थात ‘सामरिक इतिहास’ हा सरांचा मुख्य आवडीचा विषय होता. त्यातही पहिले आणि दुसरे महायुद्ध, तसेच नेपोलियन या विषयांवर सर इतके भरभरून बोलत की, त्या ज्ञानवर्षावात चिंब भिजण्याइतके सुख दुसरे नसे. नेपोलियनचा मीही चाहता असल्यामुळे त्याबद्दल ऐकायला मला नेहमीच आवडायचे. अनेक पाश्चात्य इतिहासकार, त्यांचे ऐतिहासिक तत्त्वज्ञान व त्याची ग्राह्याग्राह्यता, सामरिक डावपेच, लॉजिस्टिस, युद्धाचे राजकीय पैलू इत्यादी विषयांवरचे त्यांचे आकलन अतिशय मर्मग्राही आणि नेमके होते. ‘महायुद्धांत वापरल्या जाणार्या सांकेतिक लिप्या’ या विषयावर सरांनी एक पुस्तक भरेल इतका मजकूर लिहून ठेवला होता. त्याखेरीज पहिल्या व दुसर्या महायुद्धाचा अनेक खंडी इतिहास मराठीतून विस्तृतपणे आणायचा, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यानुसार त्यांनी काम सुरू केले होते आणि काही एक हजार पाने लिहूनही तयार होती. पण, हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. याला कारणही तसेच सबळ होते. त्यामुळे हा अतिप्रिय विषय सरांना अनेक वर्षे बाजूला ठेवून एका पूर्णपणे वेगळ्याच विषयाला वाहून घ्यावे लागले.

त्याचे झाले असे; शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी आदिलशाही, मोगली इत्यादी साधने वाचत असताना, ही साधने व त्यांचा अन्य अनेक इतिहासकारांनी लावलेला अन्वयार्थ व त्यातील चुका किंवा अनेकदा हेतुपुरस्सर केलेली दिशाभूल सरांच्या लक्षात आली आणि या सर्व गोष्टींत एक समान धागा असल्याचे त्यांना दिसून आले. र्’ीीििीशीीळे र्ींशीळ र्ीीससशीींळे षरश्रीळ’ अर्थात सत्य दडपून खोट्यानाट्या गोष्टींचे स्तोम माजवणे आणि त्याला सामाजिक सलोख्याचा किंवा पूर्वग्रहरहित विवेचनाचा मुलामा देणे, हे मध्ययुगीन इस्लामी सत्तांबाबतीत कायमच होताना दिसून आले. आपल्या परीने त्याचा मुकाबला करण्यासाठी सरांनी मध्ययुगीन इस्लामी सत्तांच्या धार्मिक धोरणावर एक ग्रंथमालाच कल्पिली होती. एकच मोठे पुस्तक करायचा बेत होता. परंतु, वर्ष-दीडवर्षांमागे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांनी ते अनेक पुस्तकांत विभागून प्रकाशित करण्याचे ठरवले. पैकी ‘इस्लामची ओळख’नामक पहिला खंड प्रकाशित झाला असून, औरंगजेबावरचा दुसरा खंड लवकरच प्रकाशित होईल. बाकी सुलतानांवरचे लेखनही बहुतांशी तयार असून यथावकाश तेही प्रकाशित होईल. औरंगजेबाच्या तथाकथित धार्मिक सहिष्णुतेखातर दिल्या जाणार्या उदाहरणांमधील खोटेपणाचा त्यांनी अक्षरशः जंग जंग पछाडून माग घेतला. याखेरीज त्यांनी ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हे पुस्तक आणि ‘टिपू अॅज ही रिअली वॉज’, ‘शिवाजी महाराजांच्या अधिकार्यांची यादी’ इत्यादी ई-पुस्तिकांचेही लेखन केले.

ही झाली त्यांच्या लेखनकार्याची एक संक्षिप्त ओळख. त्यांचे लेखन तसे पचायला हलके नाही. बुद्धीचा चांगलाच कस लागतो. पण, एकदा आवडले की, त्यापुढे दुसरे काहीच आवडत नाही, हा माझ्यासह अनेकांचा अनुभव. अर्थात, सर हे निव्वळ संशोधक नव्हते, तर अनेक संशोधकांचा आधारवड होते. हक्काने कधीही त्यांना फोन करावा आणि मग विचारलेल्या शंकेचे निरसन झाल्यावर इतरही अनेक बाबतींत आडवीतिडवी प्रचंड माहिती मिळावी, असे नेहमीच व्हायचे. ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’ला ऊर्जितावस्था आणण्यासाठी त्यांनी प्रशासकीय आणि बौद्धिक अशा दोन्ही पातळ्यांवर अविरत परिश्रम केले. त्याचेच फळ म्हणून आज मंडळ संशोधकांनी पुनरेकवार बहरले आहे.

सरांचा स्वभाव प्रसिद्धीपराङ्मुख असला, तरी ते माणूसघाणे अजिबात नव्हते. अनेकदा त्यांच्यासोबत जेवण्याचे भाग्य मला लाभले आहे. दाक्षिणात्य पदार्थ त्यांना आवडत. जेवण झाले की, अनेकदा बिल देताना ‘किती आहे बघू’ म्हणून, बिलाचा कागद काढून घेऊन स्वतःच बिल भरून टाकत. ही चलाखी लक्षात आल्यावर मग मी सावध झालो.

नवीन गोष्टी शिकण्यासही सर कायम उत्सुक असत. त्यांनी जर्मन भाषा वयाच्या सत्तराव्या वर्षानंतर शिकायला सुरुवात केली होती. इतकेच नव्हे, तर कार ड्रायव्हिंगही ते त्याच सुमारास शिकले होते. नवीन तांत्रिक सुधारणा, उदा. स्मार्टफोन, लॅपटॉप इत्यादींचा वापरही ते सराईतपणे करत. श्रमपरिहारार्थ कधी कधी टीव्ही सीरिज पाहत. ‘फौदा’ ही ‘नेटफ्लिस’वरची सीरिज त्यांना आवडे.

असो! काय न किती लिहावे तेवढे थोडेच. सरांचे माझ्यासह अनेकांवर इतके मोठे ऋण आहेत की, त्याची परतफेड कशानेच होऊ शकत नाही. इतिहासात पूर्वीपासूनच रस असला, तरी त्यात गणित किंवा विज्ञानासारखे नवीन संशोधनही करता येते, हे सरांनी आम्हांला शिकवले. आज माझ्यासह अनेक इतिहाससंशोधकांनी या क्षेत्रात येण्याचे कारण या ना त्याप्रकारे सरांपर्यंतच जाते. मराठ्यांच्या इतिहासाचे भक्कम पुराव्यांवर आधारित अनेकपदरी संशोधन करत राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. यथाशक्ती ते करत राहू, इतकेच आज सांगेन. बहुत काय लिहिणे?