नशामुक्त भारताच्या दिशेने मुंबईकरांची धाव; 'नमो युवा रन'ला उदंड प्रतिसाद आपली तरुणाई देशभक्तीचा नशा करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

21 Sep 2025 19:12:19

मुंबई : आपली तरुणाई देशभक्ती, देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचे तसेच देशाला आत्मनिर्भर करण्याचा नशा करेल असा विश्वास आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, २१ सप्टेंबर रोजी केले.

भाजप युवा मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त वरळीतील कोस्टल रोड प्रोमेनेड येथे आयोजित 'नमो युवा रन' कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते. यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ, अभिनेते मिलिंद सोमण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यांनी हिरवा झेंडा दाखवत नमो युवा रनचा शुभारंभ केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारत आत्मनिर्भरतेकरिता कृतसंकल्पित झाला आहे. आत्मनिर्भर  भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना असून आपण सगळ्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची ताकद बघितली आहे. भारताची ताकद आणि भारताची हवाई संरक्षण यंत्रणा अशी आहे की, ज्यामुळे भारताला कुणीही पराजित करू शकत नाही. पण ड्रग्स ही एकच गोष्ट भारताला पराजित करू शकते. आमचा युवा नशामुक्त आणि ड्रग्समुक्त असला तर भारताला कुणीही पराजित करू शकणार नाही. परंतू, आमच्या युवाला आतून पोकळ करून टाकले तर मात्र, या देशाचे भविष्य असणार नाही. म्हणूनच आपण नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र ही थीम घेतलेली आहे. आपली तरुणाई देशभक्तीचा, देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा नशा करेल, असा दृढनिश्चय आणि कृतसंकल्प करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. तेजिंदर तिवाना यांनी अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो."

हजारों युवक-युवती धावले

मुंबईतील या ५ किमी लांबीच्या नमो युवा रन'मध्ये ७ हजारांहून अधिक मुंबईकरांनी सहभाग घेतला होता. दोन श्रेणींमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरुष आणि महिला या दोन्ही श्रेणींमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे आणि रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुंबईकरांनी 'नमो युवा रन'च्या माध्यमातून व्यसनमुक्त भारताचा संकल्प केला. इतिहासात पहिल्यांदाच नव्या कोस्टल रोड प्रोमेनेड येथे हजारों मुंबईकरांनी व्यसनमुक्त भारताचा संकल्प केला. यामध्ये ७ हजारांहून अधिक युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. मुंबईतील अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात देत नशामुक्त मुंबई करण्याचा संकल्प भाजयुमोने केला आहे."

- तेजिंदर सिंग तिवाना, भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष
Powered By Sangraha 9.0