नागपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले ते महाराष्ट्राला माहिती आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार, २१ सप्टेंबर रोजी दिले.
वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवर माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मी मागच्या १५ दिवसांपूर्वीच ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष झालो आहे. ओबीसी मंत्रिमंडळ समिती समाजातील अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना कसा न्याय देते, हे विजय वडेट्टीवार यांना पुढे पुढे कळेल. आमची मंत्रिमंडळ उपसमिती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये ओबीसी समाजाकरिता असलेल्या योजनांचे तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने तयार केलेल्या ओबीसी मंत्रालयात येणाऱ्या सर्व योजनांचे मॉनिटरींग करणार आहे. वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले ते महाराष्ट्राला माहिती आहे. महाज्योतीमध्ये काय भ्रष्टाचार झाले ते जनतेला माहिती आहे. मी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष होऊन फक्त १५ दिवस झाले आहेत. त्यामुळे जरा धीर धरा. महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. वडेट्टीवार राजकारणाचे दुकान मांडत आहेत. ओबीसी समाजाच्या नावाने ते राजकारण करत आहेत."
वडेट्टीवारांची नौटंकी "काँग्रेसने कधीही ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा दिला नसून पंतप्रधान मोदीजींनी तो दिला. जातनिहाय जनगणना करण्यासाठी काँग्रेसने वल्गना केल्या. पण मोदीजींनी ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वडेट्टीवारांची ही नौटंकी आहे. भुजबळ साहेब आणि मी आम्ही राजकारण करत नसून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी आम्ही काम करत आहोत. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदीजींबद्दल बोलताना स्वत:ची उंची तपासून घेतली पाहिजे," असेही ते म्हणाले.
...तोपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला संधी नाही"ज्यादिवशी विधानसभा निवडणूकीत महायूती ५१.७८ टक्के मते घेऊन महायूती निवडून आली त्याचदिवशी काँग्रेस हरलेली होती. काँग्रेसची अवस्था फार वाईट असून आजही काँग्रेसच्या १२ सरपंचांनी पक्षप्रवेश केलेत. जोपर्यंत राहुल गांधी वोटचोरीच्या नावाने खोटे बोलत राहतील तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रात कुठलीही संधी नाही. त्यांना विकसित महाराष्ट्रावर चर्चा करावी लागेल. तेव्हाच त्यांचा पक्ष टिकेल. लोक कामावर विश्वास ठेवतात. काँग्रेसच्या नौटंकीला लोक कंटाळले आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "नितीन गडकरी यांचा कामावर विश्वास आहे. कुठलेही नेतृत्व जातीपातींच्या आधारे मोठे होत नाही तर ते कर्तृत्वाने मोठे होते. जात, धर्म, पंथाच्या आधारे विकसित भारत किंवा विकसित महाराष्ट्राचा निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे नितीनजींचे वक्तव्य योग्यच आहे. माणसाने जातीपातींचा आधार न घेता मेरीटवर मोठे व्हावे, हा त्याचा अर्थ आहे," असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.