-
इतिहासकार आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे आता शरीररूपाने आपल्यात नाहीत. परंतु, त्यांनी करून ठेवलेले काम एवढे प्रचंड आहे की, त्या कामाच्या आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, शिष्यांच्या आणि सुहृदांच्या आठवणींच्या रूपाने ते कायम आपल्यासोबतच राहणार आहेत.
गजानन भास्कर मेहेंदळे हे असंख्य लोकांसाठी गुरु, मार्गदर्शक, मित्र होते. मात्र, माझी पूर्वपुण्याई अशी की, ते मला माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकाच्या, म्हणजेच माझ्या मामाच्या रूपात लाभले. (माझी आई ही त्यांची सख्खी बहीण) लहानपणी अजाणत्या वयात मला त्यांचा सहवास अल्पकाळ लाभला. परंतु, त्या वयातल्या माझ्या या विषयीच्या आठवणी धुसर आहेत. मी सात वर्षांचा असताना माझी आई देवाघरी गेली, त्यानंतर माझे संगोपन माझ्या आजी-आजोबांनी (म्हणजे मामाच्या आई-वडिलांनी केले.) काही वेळा नियती विचित्र खेळ खेळते. काही लोकांच्या आयुष्यात काही जवळची नाती अशी असतात की, जी महाभारतातल्या सूर्यपुत्र कर्णाप्रमाणेच त्यांना फार उशिरा समजतात. माझ्या बाबतीत देखील असेच काहीसे झाले. ही थोर विभूती म्हणजे आपला सख्खा मामा आहे, हे मला कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना समजले.
त्या वर्षी मे महिन्यात मी माझ्या मावशीकडे कोकणांत राहायला गेलो होतो आणि तिथे प्रथमच मी मामाचा ‘श्री राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथराज पाहिला. त्यातली सुरुवातीची काही पानं वाचली. मग जोपर्यंत मावशीकडे होतो, तोपर्यंत त्या ग्रंथाचे जमेल तितके वाचन मी केले. त्यावेळी त्यातलं सगळंच समजलं असं नाही, पण आपला मामा फार मोठा माणूस आहे, एवढं माझ्या लक्षात आलं! आणि पुण्याला गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची? तर मामाला जाऊन भेटायचं, हे मी मनाशी पक्कं केलं. पुण्याला आलो आणि तडक ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त गेलो. तो दिवस होता दि. 18 जून 1997. मंडळात आल्यावर “गजानन भास्कर मेहेंदळे आहेत का?” अशी चौकशी केली. “थोड्या वेळात येतील. बसा,” असे उत्तर मिळाले. मग मामाची वाट बघत मंडळात बसलो. थोड्या वेळाने मामा (शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे) आला. मला कोणीतरी सांगितले, “हेच मेहेंदळे.”
मी उठून मामाला नमस्कार केला आणि म्हणालो, “मी सत्येन, तुझा भाचा.” “अच्छा तू सत्येन होय! ये ये...” मामा म्हणाला. त्यानंतर मग मी काय करतो, कुठे असतो, याबद्दल मामाने चौकशी केली.थोड्याफार अवांतर गप्पा झाल्या. “आता मला नेहमी भेटत जा,” असं सांगून मामाने माझा निरोप घेतला. माझी आई ही माझ्या मामाची अतिशय लाडकी बहीण. तिचा एकुलता एक मुलगा एवढ्या वर्षांनंतर आपल्याला भेटल्यावर मामाला काय वाटले असेल? मी कधी त्याला विचारले नाही. परंतु, त्याच्या काही जवळच्या मित्रांकडून, त्याच्या विद्यार्थ्यांकडून इतक्या वर्षांनी मी भेटल्यानंतर त्याला अतिशय आनंद झाला होता, हे मला समजले आणि हे ऐकून माझे मन तृप्त झाले!
या भेटीनंतर मामा हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. त्यानंतर त्याने माझ्यासाठी खूप केले. कोणताही सुखदुःखाचा प्रसंग असो, मामाचा सल्ला घेतल्याशिवाय माझे पान हलेनासे झाले. तो मोठा इतिहासकार आहे, हे मला ठावूक होतेच. मी देखील लहानपणी व तरुण वयात ऐतिहासिक विषयांवर थोडेफार वाचन केले होते आणि मला त्याची गोडी लागली होती. परंतु, शिस्तबद्ध पद्धतीने इतिहासाचा अभ्यास कसा करावा, याचा मार्ग मला मामाची भेट झाल्यानंतरच सापडला.
मी मामाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्याने मला त्याचे ‘श्री राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र भेट दिले होते. त्यावेळी मी त्याला म्हणालो, “मामा, मी हे नक्की वाचेन.” तेव्हा तो मिश्किलपणाने मला म्हणाला होता, “अरे कशाला अशी रुक्ष पुस्तकं वाचतोस. तुला त्रास होईल!” माझी परीक्षा घेण्याचा त्याचा उद्देश असावा! पण, मी देखील त्याचाच भाचा! “नाही होणार मामा त्रास. मला हे वाचायला आवडतं,” असं उत्तर मी दिल्यानंतर त्याने स्मितहास्य केलं.
मामाचं मूळ गाव म्हणजे, माझं आजोळचं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आणि देवगड तालुक्यातलं हिंदळे. हिंदळ्याच्या अलीकडे मिठबांव नावाचे गाव आहे. तिथे मामाची आत्या राहात असे. तरुण वयात मामा काही महिने तिच्याकडे जाऊन राहिला होता. त्याकाळात त्याने अद्वैत वेदांताचा अभ्यास करण्यासाठी ‘ब्रह्मसूत्र शाङ्करभाष्य’ वाचून त्यावर सुमारे हजार-दीड हजार पानं भरतील एवढ्या नोट्स काढल्या होत्या. त्यावेळी मामाचे वय जेमतेम 20 वर्षे असावं. एकदा बोलताना तो एखाद्या कर्मयोग्यासारखा मला अगदी थंडपणे म्हणाला, “हा अभ्यास केल्यानंतर मला हे नक्की काय आहे ते समजलं होतं आणि त्यावेळी मला थोडी आर्थिक अडचण देखील होती. त्यामुळे मी त्या सर्व नोट्स रद्दीत विकून टाकल्या.” हे ऐकल्यावर मलाच कसंतरी झालं. ज्या वाचकांनी मेहेंदळ्यांचे ‘श्री राजा शिवछत्रपती’ आणि इतर लिखाण वाचले आहे, त्यांना त्यांच्या अभ्यासाची खोली ठावूक आहे. मामाने केलेले शाङ्करभाष्यावरचे लिखाण आज असतेच, तर या विषयात रस असणार्या लोकांचा केवढा फायदा झाला असता, याचा विचार करून मन हळहळले
पुढे मला नोकरी वगैरे लागल्यानंतर हिंदळ्याच्या आमच्या आजोळच्या घरासंबंधी आणि जमिनीसंबंधी काही वाद उद्भवले तेव्हा मग मी, मामा आणि त्याचे जवळचे स्नेही राजाभाऊ चिवटे असे तिघेजण हिंदळ्याला गेलो. मामा देखील त्याच्या तरुणपणानंतर सुमारे 30-40 वर्षांनी आपले वडिलोपार्जित घर असलेल्या गावी जात होता. त्यानंतर दरवर्षी मे महिन्यांत हिंदळ्याला जाणे हा आम्हां तिघांचा (मी, मामा आणि राजाभाऊ चिवटे) नेमच झाला. कोकणातले हे तीन-चार दिवस म्हणजे माझ्यासाठी एक आनंदयात्रा आणि पर्वणी असायची. मामासोबत घालवलेल्या वर्षभरातील या तीन-चार दिवसांत मी मामाकडून जे ज्ञान मिळवलं, ते अनेक पुस्तकं वाचून मिळणं देखील अशक्य आहे. गाडीच्या सारथ्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने, गाडी चालवता चालवता मी अनेक प्रश्न विचारायचे आणि मामाने आपल्या ज्ञानाचा झरा अखंड प्रवाहित करायचा आणि आम्ही ते ज्ञान ग्रहण करायचे, असा हा सोहळा असे. या सहलींदरम्यान आम्ही कोणत्या विषयावर चर्चा केली नसेल? इतिहास, युद्धशास्त्र, अध्यात्म, शिकार असे अनेक विषय!
शिकारीवरून आठवलं. मामा त्याच्या तरुणपणी शिकार करीत असे. त्याकाळात शिकारीसाठी बंदुकीचे स्पोर्ट्स लायसन्स मिळवणे सोपे होते. मामाने शॉटगनचे लायसन्स मिळवले होते आणि त्याच्याकडे बंदूकदेखील होती. शिकार करायला शिकवेल अशा गुरूच्या शोधात तो होता. डेक्कन जिमखान्यावरील ‘लकी हॉटेल’ हे त्या काळात मामाचे आवडते ठिकाण होते. मित्रांची मैफल जमवून मामा चहा पीत, गप्पा रंगवत तासनतास ‘लकी’ मध्ये बसत असे. त्यावेळी रामभाऊ खोडे नावाच्या माणसाने एक उपद्रवी वाघ मारल्याची बातमी पेपरमध्ये आली होती. या रामभाऊ खोडेंचा उल्लेख प्रसिद्ध साहित्यिक श्री व्यंकटेश माडगूळकर उर्फ तात्यांनी आपल्या ‘वाटा’ या पुस्तकात केला आहे. ते देखील खोडेंसोबत शिकारीला जात असत. खोड्यांचे डेक्कनवर टेलरिंगचे दुकान होते, पण मुख्य शौक’ म्हणजे शिकार. मामाने खोड्यांची ती बातमी वाचली. योगायोगाने हे रामभाऊ खोडे देखील ‘लकी’ मध्ये येत असत. ‘लकी’च्या मालकाने मामाला सांगितले, तुम्ही ज्यांची बातमी वाचताय ना, ते खोडे पलीकडच्या टेबलावर बसले आहेत बघा आणि मामाला त्याचा शिकारीतला आणि अरण्यविद्येतला गुरूच सापडला.
मामाने खोड्यांपाशी जाऊन त्यांची ओळख करून घेतली आणि म्हणाला, “मला शिकार करायला शिकवाल का?” “हो शिकवेन की बाबा (खोड्यांनी मामाचे नाव बाबा असे ठेवले होते.) त्यात काय एवढं!” खोडे उत्तरले. गप्पांच्या ओघात शिकारीचा विषय आला की मग मामा खोड्यांबरोबर त्याने केलेली अरण्यभटकंती आणि शिकारीच्या कथा सांगत असे. कोकणातल्या त्या गूढ वातावरणात, रात्रीच्या वेळी चांदण्या रात्रीत अंथरुणावर पडल्या पडल्या मामाकडून त्या कथा ऐकणे म्हणजे एक रोमांचक अनुभव असे!
मामा सांगे, “काका (रामभाऊ खोडे) इतका हुशार शिकारी होता सत्येन, एकदा आम्ही असेच बारप्याच्या जंगलात (मुळशी जवळील बारपं) शिकारीसाठी दबा धरून बसलो होतो, तेवढ्यात आमच्या बाजूने एक ससा आला. काकाने आधीच तिथे ट्रॅप लावून ठेवला होता. तो ससा धावत आमच्या बाजूने जात होता, त्याला ट्रॅप दिसल्यावर तो थोडा थबकला. काकाच्या ते लक्षात आलं. त्याने फक्त हाताने जोरात टाळी वाजवली, तशी त्या थबकलेल्या सशाने घाबरून त्या ट्रॅपमध्ये उडी मारली!” काकाचे असेच किस्से सांगताना मामा एकदा म्हणाला, “आम्ही रात्री जंगलात फिरत असू, तेव्हा एकदा एके ठिकाणी कोणी तरी उतारा म्हणून अंडी ठेवली होती. मी ते काय आहे हे बघण्यासाठी पुढे झालो. तशी काका ओरडला, “बाबा! तिथे जाऊ नको! खैस आहे खैस! (म्हणजे खवीस)”
पण, काका असा निडर माणूस होता की भूक लागली की तो ती खविसाला उतरवून टाकलेली अंडी स्वतः खात असे. तो कसला खविसाला भीक घालतोय!” मामाच्या अंगात पहिल्यापासून निर्भयपणा होताच, पण कदाचित काकाबरोबर जंगलात जाऊन जाऊन, शिकारी करून तो जास्तच निडर बनला. आम्ही कोकणात जात असू, तेव्हा आमच्या घराभोवती कंबरेएवढ्या उंचीचे गवत माजलेले असे. वर्षभर घर बंदच असे, साफसफाई कोण करणार. पण, पोचायला कितीही रात्र झाली तरी घरी जाऊन यायचं असा मामाचा निर्धार असे. एकदा असाच आम्हाला पोचायला उशीर झाला होता. मला वाटतं रात्रीचे 10-10:30 झाले असावेत. मामाने गाडी घराकडे घेण्याची आज्ञा केली. मी म्हणालो, “मामा एवढ्या रात्री जायचं?” “हो. आत्ताच जायचं...” मामा कंबरेएवढं गवत माजलं होतं, मिट्ट काळोख होता. पण, करणार काय मामाची आज्ञा होती गेलो. मागून मामा सूचना देत येतच होता. “पाय आपटत चाल. म्हणजे साप किरडू असेल तर ते बाजूला होतं.”
त्यावेळी भीती वाटली, पण नंतर लक्षात आलं की, हा सगळा उद्योग आमच्या अंगी निर्भयपणा बाणवण्यासाठी होता. रामभाऊ खोड्यांनी मामाला आपल्याकडची शक्य असलेली सर्व अरण्यविद्या दिली होती. मामा सांगत असे, “जंगलातून फिरताना पाणी कसं प्यावं, ते काकाने मला शिकवलं. एकदा मी असाच एक डोंगर चढून धापा टाकत माथ्यावर आलो. समोर पाणवठा होता. तहान एवढी लागली होती की मी धावत जाऊन घटाघट पाणी प्यालो.” काका म्हणाला, “बाबा, असं पाणी पिऊ नको. कितीही तहान लागली असली तरी थोडावेळ पाणवठ्यावर बसायचं. मग थोडं पाणी तोंडावर मारायचं. मग हळूहळू एक एक घोट घ्यायचा.”
इतिहास तर मामाचा हातखंडा असलेला विषय. शिवछत्रपती हे त्याचं दैवत! त्याने वयाच्या 22व्या वर्षी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त पाऊल ठेवले. त्यानंतर शेवटचा श्वास घेईपर्यंत त्याने शिवछत्रपतींविषयी काही वाचलं नाही, लिहिलं नाही, त्या विषयीची कागदपत्रं पाहिली नाहीत, असा एकही दिवस गेला नाही. शिवाजी महाराजांचं असं एकही पत्रं नाही, जे मामाने वाचलं नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा, मुख्यत्वेकरून अफझलखान स्वारीमागचा इतिहास समजून घेण्यासाठी मामा फार्सी शिकला. ‘आदाब-ए-आलमगिरी’ हा औरंगजेबाच्या पत्रांचा संग्रह. आदिलशहाने अफझलखानाला शिवाजी महाराजांविरुद्ध कशासाठी पाठवलं होतं, याच्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल, तर आदाब-ए-आलमगिरी’मध्ये संग्रहित केलेली औरंगजेबाची पत्रं आणि सीतामाहू वगैरे ठिकाणी असलेली शाहजहान, औरंगजेब, मुरादबक्ष वगैरेंची फर्मानं मुळातून वाचण्याखेरीज गत्यंतर नाही, हे त्याच्या लक्षात आलं. फार्सी शिकण्याच्या धडपडीविषयी बोलताना मामा सांगत असे, “औरंगजेबाची फर्मानं, त्याच्या दरबारचे अखबार हे फार्सी भाषेच्या शिकस्ता, नस्तालिक लिपीत असतात. मी सुरवातीला पुस्तकांवरून प्राथमिक फार्सी शिकलो, आणि आता फर्मानं, कागदपत्रं वगैरे वाचता येतात का पाहू, म्हणून ती वाचायला घेतली. चार-चार रात्री घालवल्या तरी मला एक अक्षर देखील वाचता येईना. मी रडकुंडीला आलो. आपल्याला हे काही जमणार नाही, असं मला वाटू लागलं. पण, माझ्या तोंडाला आता रक्त लागलं होतं. या जगात अवघड असं काही नसतं. जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही, तोपर्यंत ते अवघड वाटतं.”
मामाने अपार कष्ट घेऊन फार्सी भाषेच्या ‘शिकस्ता’, ‘नस्तालिक’ वगैरे लिपी आत्मसात केल्या आणि हे ज्ञान स्वतःपाशी न ठेवता त्याने अनेक विद्यार्थी घडवले. आता अशी परिस्थिती आहे की, ज्यांना उत्तमप्रकारे फार्सी कागदपत्रं वाचता येतात, असे मामाने घडवलेले किमान 10 ते 15 विद्यार्थी आज भारतात आहेत! थोर इतिहास संशोधक ग. ह. खरे हे मामाचे गुरु. ग. ह. खरेंविषयीचा एका किस्सा मला एकदा मामाने सांगितला तो असा:- “मी नुकताच फार्सी वाचायला लागलो होतो. ग. ह. खरे यांनी औरंगजेबाच्या दरबारचे काही अखबार संकलित करून ते ऐतिहासिक फार्सी साहित्य खंडात छापले होते. एक अखबार वाचताना माझ्या असं लक्षात आलं की, त्याची तारीख चुकलेली आहे. मी खर्यांकडे गेलो आणि त्यांना ती चूक दाखवून दिली. खरे म्हणाले की, या अखबारांची मायक्रोफिल्म आपल्याकडे मंडळात आहे, परंतु ती पाहण्याची सोय टिळक स्मारक मंडळाजवळ एके ठिकाणी आहे. तू माझ्यासोबत चल, आपण तो अखबार पाहू. असे म्हणून मी आणि खरे तिथे गेलो आणि तो अखबार बघितला, तेव्हा खरोखरच त्या अखबाराची तारीख चुकलेली होती. मी परत येताना खर्यांना म्हणालो की, काही वेळा असं होतं की वर्षं बदलले तरीदेखील आपण तारीख टाकताना सवयीने चुकून मागचेच वर्षं टाकतो. इथे देखील तसेच काहीसे झाले असावे. खरे माझे उत्तर ऐकून बेहद्द खूश झाले! मला मंडळात आल्यावर म्हणाले , तू सुद्धा थोडाफार अभ्यास करतोस वाटतं! असं म्हणून त्यांनी मला बक्षीस म्हणून त्यांच्या कपाटात जपून ठेवलेलं एक प्राचीन नाणं दाखवलं!”
इतिहासातील काही बारकाव्यांविषयी गप्पा मारताना मामा मला सांगत असे, “सत्येन, असं बघ आपण एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला ओळखतो ते कशाप्रकारे ओळखतो? आपण त्याला हाडामांसाच्या स्वरूपात पाहिलेले असते का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. आपल्या समोर येते ती समकालीन कागदपत्रांमधून पुढे येणारी त्याची प्रतिमा! प्रोजेक्टर ज्याप्रमाणे एखादी प्रतिमा भिंतीवर दाखवतो, तशीच कागदपत्रांमधून त्या व्यक्तिमत्वाची जी काही चांगली-वाईट प्रतिमा असेल ती आपल्या समोर येत असते. हा इतिहास संशोधनातला एक सूक्ष्म विचार आहे.” मी एकदा युद्धशास्त्रावर मामाशी अशीच चर्चा केली होती. मुख्यत्वेकरून छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरल्या बाजीरावांच्या युद्धकौशल्याबद्दल. त्यातून वेचलेले काही मोती पुढीलप्रमाणे- थोरल्या बाजीरावांच्या दिल्लीवरील स्वारीविषयी बोलताना मामा सांगत असे -
सून झू म्हणतो, ”To win 100 victories in 100 battles is not the acme of skill, skill of generalship. To win a battle without fighting is the acme of skill.'' आता जवळजवळ इथे लढाई झालीच नाही. एक चकमक किरकोळ झाली. All that was done, बादशहाला शो दाखवला. Show of force. की आम्ही कुठेही तुझ्या राज्यात फिरू शकतो आणि तुझं सैन्य आम्हाला अडवू शकत नाही. तेवढ्यात बाजीरावाला कळलं की, मुघल आपल्या मागे धापा टाकत येतायत. त्यांच्याशी त्याला लढायचंच नव्हतं. तो अदृश्य झाला, राजस्थान मार्गे निघून आला मागे. पुढे कालौघात दिल्ली दरबारातल्या dovesचा विजय झाला आणि मराठ्यांना पुढे बाजीरावाच्या मृत्यूनंतर का होईना, पण चौथाई मिळू लागली, त्याचं बी बाजीरावाने पेरलं होतं.
आता सून झू जे सतत म्हणतो की, युद्धात कुठं हल्ला करायचा असतो सगळ्यात महत्त्वाचा? Body वर नाही! Brain वर! To attack the enemy's mind! या कन्सेप्टचं इतकं उत्कृष्ट उदाहरण मला जगाच्या इतिहासात दुसरं माहिती नाही! हे बाजीरावाचं आहे ते एकमेव! आणि ही मी केलेली कल्पना नाहीये, बाजीरावाने हे सगळं पत्रातच लिहिलंय तो काय करत होता ते! तो पुढे लिहितो की, “मी दिल्ली जाळू शकलो असतो, पण मी का नाही जाळली? तर राजकारणाचा धागा तुटतो.” म्हणजे काय होतं दुसर्या शब्दात सांगतो. एखाद्या माणसाचा जर मर्यादेपलीकडे एखाद्याने अपमान केला ना, तर तो म्हणतो आता जाऊ दे, माझा फायदा होवो नाही, तर तोटा होवो, आता मी नाहीच ऐकणार. बाजीरावाचं म्हणणं होतं की, मला इतकं टोकाला पण न्यायचं नव्हतं बादशहाला. बादशहा ज्यामुळे उतावीळ होईल असं मला काही करायचं नव्हतं. मला काय पाहिजे होतं? मला चौथाई पाहिजे होती आणि ती बादशहाने बर्या बोलाने द्यावी, एवढाच दबाव मला त्यावर आणायचं होतं. त्याहून जास्त दबाव मला बादशाहावर टाकायचा नव्हता. ते साध्य झालं!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याविषयी बोलताना मामा सांगत असे, “शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील फार थोड्या लढाया आहेत. खरं सांगायचं तर एकच लढाई आहे. कोणती? रुस्तुमेजमानचा त्यांनी जो पराभव केला ती. आणि दुसरी लढाई जी त्यांना ’लढावी’ लागली, ती म्हणजे सुरतेहून परत येताना वणी दिंडोरीला त्यांना जेव्हा शत्रूने पाठलाग करत गाठलं, तेव्हा झालेली एक लढाई. संपलं. लढाया दोन. दोनच! सुरतेची लूट ही काही लढाई नाहीये! साल्हेरची लढाई शिवाजी महाराजांच्या सेनापतीने लढली आहे, शिवाजी महाराज नव्हते त्यात. म्हणजे ती जर जमेला धरली तर एकूण तीन लढाया झाल्या. बाकी त्यांनी कोकणातले जे किल्ले घेतले आहेत, ते न लढता घेतले आहेत आणि त्यात महाराजांचं राजकीय कौशल्य आहे. तुम्ही जर माझं इंग्रजी शिवचरित्र वाचलंत, त्यात कर्नाटक मोहीम दिली आहे. महाराजांनी कर्नाटकातले जे किल्ले घेतले आहेत, त्यावेळेला 40 किल्ले त्यांनी घेतले, दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत. रक्ताचा एक थेंब न सांडता आणि मुघल फौजेने त्याच काळात फक्त दोन किल्ले घेतले, गुलबर्गा आणि नळदुर्ग, भरपूर रक्त सांडून! याचं कारण ते शत्रूशी प्रत्यक्ष लढत होते! म्हणजे टक्कर जशी होते ना दोन रेड्यांची आणि रक्तबंबाळ होतात तसं. पण, शिवाजी महाराज मुळी शत्रू विरुद्ध लढतच नव्हते! त्यांनी weak spot पाहून undefended spot पाहून तो काबीज केला आणि 40 किल्ले दोन-तीन महिन्यात घेतले. त्या काळात मुघलांनी रक्त सांडून सांडून फक्त दोन किल्ले घेतले. इथे शिवाजी महाराजांची कुठे लढाई आहे? शत्रूचं पाच हजार सैन्य होतं, शिवाजी महाराजांचं होतं पंचवीस हजार आणि ते लांबून महाराजांचं सैन्य पाहात आणि पळून जात. लढाई झाली नाही! ते पळत सुटले आणि महाराजांचे सैन्य त्यांचा पाठलाग करत होतं. There was no battle!
'Generalship' म्हणजे सेनापतीत्वाचं मोठेपण हे रक्तपात न करता जिंकण्यात आहे! लढायांमध्ये काय होतं? फक्त रक्त सांडतं, चिखल होतो आणि असं म्हणतात की, Goddess of Battlefield कोणाला माळ घालेल ते सांगता येत नाही! म्हणून बाजीरावाच्या किंवा शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पानिपत नाही! लढाया करणारे भाऊसाहेब पेशवे, त्यांच्या आयुष्यात पानिपत आहे! अशा किती आठवणी सांगू! जन्मभर पुरेल अशी शिदोरी या मोठ्या माणसाने मला आणि त्याच्या असंख्य विद्यार्थ्यांना दिली आहे. शेवटी साश्रू नयनांनी एकच ओळ ओठांवर येते.
हे सरता संपत नाही,
चांदणे तुझ्या स्मरणाचे...
लेखनावधी.
- सत्येन वेलणकर