
कोणतीही गोष्ट सरावाने अधिक परिपक्व होते. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात सरावाला महत्त्व अधिक. मग, नाटकही त्याला अपवाद नाहीच? नाटकामध्येही मुख्य प्रयोगाच्या आधी अनेकदा सराव केला जातो. नाटकातील प्रत्येक बाजू समजून घेतली जाते. याला ‘तालीम’ म्हणतात. यामध्ये नेमके काय होते, या सरावाचा कसा फायदा कलाकारांना होतो, याचा घेतलेला आढावा....तालमींना नाट्यप्रयोगाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. एखादा बालकलाकार रंगमंचावर आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे आणि सहजतेने, दिलेल्या भूमिकेचे सादरीकरण करतो. कारण, प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याआधी त्या व्यक्तिरेखेत तो अनेकदा जगलेला असतो. तालीम केवळ प्रयत्न करण्याची संधी देत नाही, तर चुका करण्याची, प्रयोग करण्याची, शिकण्याची आणि सुधारण्याचीही संधी देते. यातूनच कलाकाराला स्वतःच्या व्यक्तिरेखेचे, नाटकातील परिस्थितीचे, इतर पात्रांचे आणि संपूर्ण कथानकाचे आकलन करायला वेळ मिळतो.
नाट्यकलेचे विद्यार्थी समजून घेतात की, रंगभूमी म्हणजे संहिता, कथानक नाटकाच्या रूपात सांगणं होय. नाटक हे संवाद, देहबोली, वेशभूषा आणि भावनांच्या अभिव्यक्तीद्वारे रंगमंचावर सादर केले जाते. भावनांद्वारे अभिव्यक्त होणे, हे नाटकाचे सर्वांत महत्त्वाचे अंग. आज आपण तालमींदरम्यान बालकलाकारांच्या भावनांच्या अभिव्यक्तीवर काय परिणाम होतो, हे पाहत आहोत.
नाटक ही एक जिवंत कला आहे. जिथे कथा विविध पात्रांद्वारे प्रेक्षकांसमोर घडत असल्यासारखीच सादर होते. प्रत्येक पात्र वेगळ्या शारीरिक, मानसिक, भावनिक व मानसशास्त्रीय स्थितीत असतं. वय, लिंग व संस्कृतीही भिन्न असतात. त्यामुळे त्यांच्या भावना परिस्थितीनुसार, मनःस्थितीनुसार, काळ-वेळेनुसार बदलत राहतात. भावनांची अभिव्यक्ती ही नाटकात अत्यंत महत्त्वाची अशीच. तालीम विद्यार्थ्यांना ती समजून घेण्यास मदत करते. व्यक्तिरेखा वेगवेगळ्या भावनांमध्ये किंवा रसांमध्ये वावरतात. महाकवी भरतमुनींनी भावनांचं वर्गीकरण करून, नवरस दिले आहेत. रस म्हणजे मनाची भावस्थिती. शृंगार (प्रेम-सौंदर्य), हास्य (हास्य), करुण (दुःख), रौद्र (क्रोध), वीर (शौर्य-पराक्रम), भयानक (भीती), बीभत्स (वितृष्णा-किळस), अद्भुत (आश्चर्य-विस्मय), शांत (शांती-समाधान) हे नऊ रस आहेत.
मुलांच्या मनावर होणारा परिणाममुलांचं मन अत्यंत जिज्ञासू असतं. ते नेहमी शिकत असतात, समजून घेत असतात आणि प्रयोग करत असतात. जेव्हा नाटक भावनांद्वारे सादर होतं, तेव्हा बालकलाकार स्वतःही त्या भावनांमधूनच जातात. नवरसांशी परिचय करून घेतल्यावर, ते त्या भावनांचा अनुभवही घेतात. हा परिचय ’थिएटर गेम्स’ आणि तालमींच्या माध्यमातून केला जातो.
मानवाला जन्मापासूनच प्रेम, राग, अहंकार आणि भीती, या मूलभूत चार भावना परिचित असतात. पण, नवरसांतील उर्वरित पाच भावना मुलांसाठी नवीन असतात. त्यांचा परिचय झाल्यावर, मुलांच्या मनावर खोल परिणाम झालेला दिसतो. त्यांच्या मनात नवनवीन प्रश्न, शंका निर्माण होतात. तालमीमध्ये कृती-प्रतिक्रियेच्या प्रक्रियेतून, ते त्या भावनांना अधिक चांगल्याप्रकारे समजतात आणि उत्तरही शोधतात. शिक्षकांच्या मदतीने ते स्वतःला जाणवणार्या भावनांची खात्री करून घेतात.
कार्यपद्धती
तालमींपूर्वी आणि नंतर मुलांच्या भावनांच्या अभिव्यक्तीवर काय परिणाम होतो हे पाहूया. ‘सियावर रामचंद्र की जय’ नाटक सादर करायला घेतले, तेव्हाचे अनुभव मी इथे सांगते आहे. हे दोन अंकांचे बालमहानाट्य मी लिहिले. प्रभू श्रीरामांच्या कथेत विविध व्यक्तिरेखा आणि प्रसंग आहेत, ज्यामध्ये सर्व नवरसांची अभिव्यक्ती करता येते. यात मनोरंजनाचे सर्व घटक आहेत आणि त्याचवेळी नैतिक मूल्ये व नीतीही शिकायला मिळते. रामायणाची कथा धर्मनिष्ठ जीवनशैलीचे सर्वोत्तम उदाहरण मानली जाते. यामध्ये अध्यात्म, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र सर्व काही आहे. या बालमहानाटयातील पटकथा व संवाद विद्यार्थ्यांच्या वयानुसार लिहिलेले आहेत.
भावनांच्या अभिव्यक्तीवर काय परिणाम होतो, हे समजण्यासाठी विद्यार्थ्यांना सात टप्प्यांतून मी नेले. यात भारतातील विविध राज्यांतील, वेगवेगळ्या सांस्कृतिक मूल्यांचे विद्यार्थी होते. त्यांचे स्वभाव बहिर्मुख, अंतर्मुख व मिश्र होते. वयोगट पाच ते १४ मधील मुलं आणि मुली होत्या.
थिएटर गेम्सविद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भावना समजावून देण्यासाठी माझ्याकडे दोन पर्याय होते:१) भरतमुनींनी सांगितलेल्या नवरसांची थिअरी समजावून सांगणे
२) प्रत्यक्ष नाट्यखेळांच्या माध्यमातून, मुलांना त्या भावना अनुभवायला लावणे आणि नंतर त्यांचा संबंध रसांशी जोडणे. मी दुसरा मार्ग निवडला.
खेळ क्र. १सर्व विद्यार्थी एकमेकांना ओळखू लागल्यानंतर आणि आपसात मैत्री झाल्यानंतर, त्यांना जोड्यांत विभागले गेले. प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यातील दोन प्रसंग सांगायला सांगितले, एक आनंददायी व एक दुःखद. नंतर त्यांनी आपल्या जोडीदाराचा अनुभव संपूर्ण वर्गाला सांगितला. त्यानंतर विद्यार्थ्यांना विचारले गेले की, त्यांना कसं वाटलं आणि त्यांच्या आवाजात, चेहर्यावर, शरीरात व मनात काय बदल झाले. यामुळे त्यांना आनंद व दुःख, या दोन सोप्या व ठळक भावनांची जाणीव झाली. उदाहरणार्थ, कुत्रा मेल्यामुळे दुःखी झाले आणि खूप रडले. हवी असलेली सायकल भेट मिळाली, खूप आनंद झाला आणि प्रेम वाटले.
खेळ क्र. २विद्यार्थ्यांना चार जणांच्या गटात विभागले गेले. त्यांना असे ठिकाण सांगायला सांगितले, जिथे त्यांनी किळस, भीती, विस्मयकारक आश्चर्य, शांती अनुभवली होती. प्रत्येकाने आपला अनुभव सांगितल्यानंतर संपूर्ण वर्गात चर्चा झाली. त्यांना विचारलं गेलं की, तो प्रसंग किंवा ठिकाण कसं दिसत होतं, त्यावेळी त्यांना कसं वाटलं आणि त्यांनी काय केलं. उदाहरणार्थ, रस्त्याच्या कडेला मोठा कचर्याचा ढीग पाहिला, तेव्हा किळस आली, पिकनिकला गेल्यावर रात्री मित्रांनी भूतांच्या गोष्टी सांगितल्या, तेव्हा भीती वाटली. मनोरंजन उद्यानातील रोलर-कोस्टरची सफर केल्यावर आश्चर्य आणि रोमांचित झाले. मंदिरात गेले असता ‘ॐ’चा जप सुरू होता, शांतता आणि समाधान वाटलं. ही होती बीभत्स, भयानक, अद्भुत व शांत रसांची उदाहरणं.
खेळ क्र. ३
आता विद्यार्थ्यांना आठजणांच्या गटात विभागले गेले. त्यांना सांगितलं गेलं की, त्यांनी असे लोक किंवा टीव्हीवरील पात्रं आठवावीत जे विनोदी, शूर, धाडसी, रागीट होते. बालकलाकारांनी संपूर्ण वर्गाला सांगितलं की ती पात्रे कशी दिसत होती, ती काय बोलली, कशी बोलली आणि स्वतः विद्यार्थ्यांना त्या व्यक्तीबद्दल कसा अनुभव आला. उदाहरणार्थ, माझे काका नेहमी विनोद करतात, ‘छावा’ चित्रपट पाहताना कसं वाटलं, एका विद्यार्थ्याने तर छत्रपती संभाजी महाराजांना कसा राग आला, याचीही नक्कल करून दाखवली.
खेळ क्र. ४वरचे तीन खेळ खेळताना विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधला, समजून घेतलं, सहानुभूती दाखवली आणि अनुभवांवर चर्चाही केली. यानंतर त्यांनी प्रत्यक्ष एखादा प्रसंग साकारायचा, एखाद्या व्यक्तीचं अनुकरण करायचं, ‘नक्कल‘ किंवा त्यात बदल करून कल्पनाशक्तीला ताण देऊन, कल्पकतेने प्रसंग उभा करायचा असे सांगण्यात आले. यासाठी मुलांना साधारण बाराजणांच्या गटात विभागण्यात आलं.
नाट्य अभिवाचनयानंतर विद्यार्थ्यांना संहिता वाचून दाखवली. सुरुवातीला त्यांना स्वतः वाचायला सांगितलं नाही कारण, त्यांचं वाचन कौशल्य अजून पूर्ण विकसित झालेलं नव्हते. प्रत्येक व्यक्तिरेखा व प्रसंग रंगवून सांगितला. प्रत्येक प्रसंग वाचून झाल्यावर का, कसे, केव्हा, कुठे असे प्रश्न विचारले. मग नाटकातले प्रसंग पहिल्या तीन-चार खेळांमध्ये अनुभवलेल्या भावनांशी कसे जुळतात, याच्यावर चर्चा केली. हळूहळू त्यांनी संहितेत असलेले नवरस ओळखायला सुरुवात केली.
विद्यार्थ्यांना विचारलं गेलं की, कोणत्या प्रसंगात कोणता रस प्रामुख्याने दिसतो. नाटकातील प्रसंग उदाहरणार्थ रामाचं सीतेशी लग्न यात शृंगार रस, कुंभकर्णाला उठवायचा प्रयत्न करतात तिथे हास्य, जटायू जखमी होऊन रामाच्या मांडीवर प्राण सोडतो, तेव्हा करुण रस इत्यादी. ही निव्वळ सुरुवात होती, हवं तर इमारतीचा पाया म्हणूया. यानंतर बांधले जाणार मजले. आजच्या लेखात इथेच थांबते. नाट्यनिर्मिती करत असतानाचाअ पहिला अंक इथे संपला, असं म्हणा हवं तर. यानंतर ही बर्याच प्रक्रियेतून मुलांना जावं लागणार आहे. ते टप्प्या-टप्प्याने पुढील लेखात समजावून घेऊया.
रानी राधिका देशपांडे
[email protected]