वैभवसंपन्न श्रीपुर

    21-Sep-2025
Total Views |


‘नक्षलग्रस्त राज्य’ म्हणून आजवर ओळख असलेल्या छत्तीसगढमध्ये भारतीय स्थापत्य शास्त्राचे उत्तम दाखलेही आहेत. तत्कालीन राजांनी आणि कलाकारांनी कलाकृती आणि व्यासंगाच्या साहाय्याने दगडांना सजीव केले. याच छत्तीसगढमध्ये सिरपूर अर्थात तेव्हाचे श्रीपूर या गावामध्येही असेच प्राचीन वैभव प्राचीन समृद्धतेची साक्ष देत उभे आहे. त्याचा घेतलेला मागोवा...


आपण या लेखमालेमध्ये छत्तीसगढमधील वेगवेगळी मंदिरे बघितली. आजदेखील आपण परत छत्तीसगढलाच जाणार आहोत, हरवलेला वारसा शोधण्यासाठी! छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूर शहरापासून ७८ किमी अंतरावर महासमुंदर नावाच्या जिल्ह्यामध्ये, सिरपूर नावाचे गाव आहे. इतिहासाला बोलते करणारे हे गाव महानदीच्या काठावर वसलेले आहे. सिरपूर हे कधीकाळी ‘श्रीपूर’ म्हणून ओळखले जायचे. आपल्या नावासारखेच प्रचंड वैभव, या गावाने अनेक शतके अनुभवले आहे. या संपूर्ण दक्षिण कोशल भागावर शरभपुरी, पंडूवंशी, कलचुरी, नागवंशी अशा अनेक वेगवेगळ्या राजघराण्यांनी राज्य केले. पण, यातल्या सोमवंशी घराण्याने सिरपूरच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि कलेचा इतिहासामध्ये मोलाची भर घातली.

सलग ७०० वर्षे सिरपूरने हे वैभव अनुभवलेले आहे. अनेक राजघराण्यांची राजधानी म्हणून देखील या गावाला मान मिळाला. जगभरातून आलेल्या वेगवेगळ्या प्रवाशांनी, सिरपूरविषयी सुंदर लिखाण आपापल्या नोंदींमध्ये करून ठेवलेले दिसते. इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत, भारतातल्या सर्वंत महत्त्वाच्या शहरांपैकी हे एक शहर होते. कदाचित म्हणूनच इथे असणार्या विद्यापीठामध्ये, भारतभरातून काही हजारोच्या संख्येमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येऊन राहत होते. तेराव्या शतकानंतर हळूहळू सिरपूर हे काळाच्या पडद्याआड गेले आणि हा सगळा वारसा आपल्यापासून गुप्त राहिला. त्यानंतर थेट १९व्या शतकात, ब्रिटिश अधिकारी अलेझांडर कनिंगहम याने हा वारसा उजेडात आणला. १९५० सालदरम्यान पुरातत्त्व अधिकारी दीक्षित यांनी तिथे उत्खनन करून, वारसास्थळे मोकळी केली आणि २०१३ साली झालेल्या उत्खननातदेखील अनेक जागा लोकांसमोर आल्या. या सगळ्या कष्टाचे फळ म्हणजे, सिरपूर गावात ४०पेक्षा अधिक वारसास्थळे आज बघायला मिळतात.

आज आपण त्या गावातले लक्ष्मण मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या, कधीकाळी त्या मंदिरावर असणारी काही शिल्पं बघणार आहोत. मंदिराच्या आवारात मिळालेल्या शिलालेखातून या मंदिरासंदर्भात माहिती मिळते. इसवी सन ६२५-६५० दरम्यान, या मंदिराची निर्मिती वत्स नावाच्या राणीने केली. मगध भागात राज्य करत असणारा राजा सूर्यवर्मन याची ती मुलगी, तर सोमवंशी राजा बालार्जुन याची ती आई होती.

विटांमध्ये बांधलेले हे मंदिर भारतातल्या काही ठराविक जुन्या मंदिरांपैकी एक आहे. विष्णुला अर्पण केलेले हे मंदिर सहा फूट उंच जगती (प्लॅटफॉर्म) उभे आहे. गर्भगृह, अंतराळ आणि मंडप असे याचे भाग आहेत. मंडपाचा भाग पडलेला असून, ज्या खांबांच्या आधाराने तो उभा होता, त्या खांबांचे तळ तिथे दिसतात. या मंदिराच्या गर्भगृहाची द्वारशाखा अतिशय सुंदर आहे. मधोमध शेषशायी कोरलेला असून, बाकी थरांमध्ये मत्स्य, वराह, नरसिंह, वामन इत्यादी अवतार कोरलेले आहेत. त्याचबरोबर पुराणातल्या ‘हयग्रीव’, ‘केशीवध’ या कथादेखील तिथे कोरलेल्या दिसतात. नागर शैलीमध्ये बांधलेले हे मंदिर असून, पाठीमागच्या बाजूला खोट्या पण अतिशय खर्या वाटणार्या दारांची रचनादेखील केली आहे. विटांमध्ये असे काम करणे हे अत्यंत अवघड असते पण, आपल्या स्थापतींनी आणि कलाकारांनी हे अवघड आव्हान लीलया पेललेले दिसून येते.

मंदिराच्या पाठीमागे संग्रहालय असून, संग्रहालयात तीन वेगळे कक्ष आहेत. एवढ्या आत असलेल्या जागेवर असे संग्रहालय उभे करणे, ते तेवढे सुंदर आणि स्वच्छ ठेवणे यामध्ये आपली संस्कृती जपण्यासाठी लागणारी महत्त्वाकांक्षा आणि राजकीय इच्छाशक्ती दिसून येते. इथल्या आणि लक्ष्मण मंदिरावर असलेल्या द्वारशाखेवरील शिल्पांचा परिचय करून घेऊयात.

उत्तम कलाकृती म्हणजे काय? तर कलाकारांना जी भावना कलेच्या माध्यमातून दाखवायची आहे, तीच भावना बघणार्यापर्यंत पोहोचत असेल, तर ती कलाकृती उत्तम होय. आपली सगळी शिल्पं म्हणजे या उत्तम कलाकृतीच आहेत.

चामुंडा-साक्षात अंत म्हणजे काय? बीभत्स रस शिल्पातून दाखवता येईल का? या प्रश्नांची उत्तरे, चामुंडेच्या शिल्पातून मिळतात. प्रेत आसनावर बसलेली चामुंडा सहा हातांची आहे. ज्या प्रेतावर ती बसली आहे, त्याच्या पोटातून आतडे काढून ते एका हातात आणि पुढे स्वतःच्या तोंडात धरलेले आहे. एका हातात नाग आहे, पाठीमागच्या हातात घुबड ध्वज धरलेला असून, एका हातात मुंडके धरलेले आहे. केस म्हणजे नाग असून, गळ्यात नरमुंड माळा घातलेली आहे. डोळे उग्र असून, जबड्यातून बाहेर आलेले सुळेपण दिसतात. खाली असणारे कोल्हे आणि गिधाडे प्रेताचे लचके तोडत आहेत. हे शिल्पं बघितल्यावर समोर उभी राहते ती साक्षात भीती. शिल्पांनी अतिशय कौशल्याने घडवलेले हे शिल्पं आहे.

महिषासुरमर्दिनी-देवीचे अप्रतिम शिल्पं संग्रहालयात आहे. एक पाय असुरांच्या कापलेल्या मुंडयावर ठेवलेला असून, हातामध्ये त्रिशूल, वज्र, खड्ग, तलवार, ढाल अशी आयुधे घेतलेली आहे. एका हातात महिषाच्या रूपात असलेला असुर खेचून बाहेर काढत आहे, त्यासाठी तिथे त्याचे केस पकडले आहेत. देवीच्या सिंहाने मागून असुराला पकडले आहे. दुर्दैवाने देवीच्या बरोबर चेहर्यावर आघात झाल्याने, तिच्या भावना कशा असतील त्या समजत नाहीत.

या मंदिराच्या आवारात फिरताना जाणवते ते स्वच्छता, शांतता आणि जागेच्या हवेत मुरलेल्या गतकाळच्या आठवणी. अतिशय मोठा परिसर, हिरवेगार गवत, व्यवस्थित निगा ठेवलेली झाडे आणि पुरातत्त्व खात्याचे व्यवस्थित बोलणारे अधिकारी ही जमेची बाजू. कुणाला मंदिराची अधिक माहिती हवी असेल, तर त्यासाठी तिथे क्यूआर कोडदेखील लावलेले आहेत. विस्मृतीत गेलेला हा ठेवा परत लोकांसमोर येतो आहे. आपला देदीप्यमान इतिहास लोकांसमोर घेऊन येण्यासाठी या जागा उत्सुक आहेत, फक्त गरज आहे आपण तिथे जाण्यासाठी. हा संपूर्ण भाग फिरण्यासाठी सुरक्षित असून, राहण्याच्या सोयीदेखील तिथे आहेत. भोवतीने संरक्षित जंगल असून, तिथेही आपल्याला जाता येऊ शकते.

या ऐतिहासिक स्थळांना भेट देणे म्हणजे, आपल्या पूर्वजांच्या कलाकुसरीचा आणि बौद्धिक उत्कर्षाचा अनुभव घेणे होय. परंतु, या अमूल्य वारशाला जपण्याची आणि त्याला योग्य ओळख मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. आपण या स्थळांना भेट देऊन, त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करून आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी आवाज उठवून, या अनमोल ऐतिहासिक संपत्तीला भावी पिढ्यांसाठी टिकवून ठेवू शकतो. सिरपूरसारखी ठिकाणे आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात; त्यांना प्रकाशात आणण्याचे काम आपल्याच हातात आहे.

इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४