मुंबई : मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर उबाठा गटाचे उरलेसुरले अस्तित्व संपणार असून उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असा पलटवार भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवार, २० सप्टेंबर रोजी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार असा दावा राऊतांनी केला. परंतू, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर उबाठा गटाचे उरलेसुरले अस्तित्व संपणार असून उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत राहुल गांधींच्या संपर्कात आहेत. त्यांनी बाळासाहेबांचे शिष्यत्व सोडले असून आता राहुल गांधी त्यांचे गुरु झाले आहेत. राहुल गांधी दिल्लीमध्ये बसून नक्षली अजेंडा पुढे नेतात, तसाच अजेंडा राऊत महाराष्ट्रात रेटत आहेत. राहुल गांधी अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात. तसेच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत चिखलफेक करण्याचे काम राऊत करतात."
राऊतांच्या चित्रपट 'माझा भोंगा, माझी बांग'"संजय राऊत यांनी टीका करण्याऐवजी आत्मपरिक्षण केले पाहिजे. आनंद दिघे यांच्यावरील चित्रपटात दाखवलेले सर्व खोटे आहे, असे ते म्हणाले. पण राऊत यांना चित्रपटातील किती कळते? त्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढायचा ठरवल्यास त्याला ‘माझा भोंगा, माझी बांग’ असे नाव द्यावे लागेल. कारण त्यांनी संपूर्ण आयुष्यात सकाळी उठून फक्त भोंगा वाजवणे आणि बांग देण्यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी उगीच मोदी-शहा-फडणवीस-शिंदे- पवार यांच्यावर टीका करत बसू नये," असेही ते म्हणाले.
गरब्यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या सूचनेवरून राऊतांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, “गरबा हा हिंदूंचा पवित्र सण आहे. देवीच्या आराधनेत दुसऱ्या धर्मीयांनी घुसण्याचे राऊत समर्थन करत असतील, तर ते सरळ हिंदूविरोधी कारस्थान आहे. फक्त काही हिरव्या मतांसाठी हिंदूंच्या परंपरेवर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही. हिंदू समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.”
सर्व विकास प्रकल्पांना राऊतांचा विरोध "बुलेट ट्रेन ही जनतेच्या हितासाठी आहे. पण संजय राऊत सातत्याने विकास प्रकल्पांना विरोध करतात. महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग सुरू करताना त्यांनी विरोध केला, कोस्टल रोडच्या कामाला आडवे आले, आता बुलेट ट्रेनलाही विरोध करत आहेत. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरला. कोस्टल रोड मुंबईकरांच्या वाहतुकीचे समाधान ठरला आहे. आता तुम्ही बुलेट ट्रेनला विरोध करत आहात.
वडेट्टीवारांनी दोन समाजात दरी निर्माण करण्याची भाषा करू नये“मराठ्यांचे आरक्षण रद्द करण्याचे पाप काँग्रेसचे तर, ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारचे आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी जीआर रद्द करण्याची भाषा करून दोन समाजात दुरी निर्माण करण्याचे काम करू नये. देवेंद्र फडणवीस सातत्याने सर्व समाजांना सोबत घेऊन जात आहेत. वडेट्टीवारांनी जीआर रद्द करा, दोन समाजात दरी निर्माण करा, असे सल्ले देऊ नयेत. हे स्थगितीचे सरकार नाही, तर सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सरकार आहे,” असेही नवनाथ बन म्हणाले.