वाड्यात भटक्या कुत्र्यांची वाढली दहशत,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    20-Sep-2025
Total Views |

वाडा,  वाडा तालुक्यातील वाडा, कुडूस, खानिवली, शिरीषफाटा या मुख्य बाजारपेठ व गावपाड्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सकाळी आणि संध्याकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांपर्यंत सर्वसामान्य नागरिक या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत.

गावातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे काही नागरिकांना सरकारी रुग्णालयात तर काहींना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तनुजा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात डॉग बाईटचे तब्बल ७४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते.

या कुत्र्यांच्या झुंडी मुख्य बाजारपेठ, गावांच्या वेशी आणि सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध यांना या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा हे कुत्रे दुचाकीस्वारांचा पाठलाग करत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

या भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी अन्न दिले जात असल्याने ते त्या परिसरात स्थायिक होत असून, चायनीज टपऱ्या, मांस-मच्छी विक्रेते, भूजिंग सेंटर याठिकाणांवर या कुत्र्यांना भरपूर अन्न मिळत आहे. त्यामुळे त्यांचा वावर अधिक आक्रमक होत चालल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार केली असून, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. नागरिकांनी भटक्या कुत्र्यांना अन्न न देण्याचे आवाहनही केले जात आहे.