मनोरंजनाचे भव्य वर्तुळ

20 Sep 2025 11:55:57

कल्पना करा, तुम्ही एका अशा कॉन्सर्टला गेला आहात, जिथे मंचावर फक्त कलाकारच नाही, तर संपूर्ण सभागृह तुमच्याभोवती एक जादुई विश्व साकारलं जात आहे. अगदी डोक्यापासून पायापर्यंत एखाद्या कल्पनाविश्वात नेणारं दृश्य तुमच्यासमोर उलगडतं. हा अनुभव वास्तवात उतरला आहे ते लास वेगासमधील भव्य ‘द स्पिअर’मुळे!


अमेरिकेच्या नेवाडातील ‘लास वेगास स्पिअर’ हे मनोरंजनविश्वातील एक अत्याधुनिक ठिकाण आहे. जगातील सर्वांत मोठ्या गोलाकार रचनेत आणि सर्वांत उच्च-रिझोल्यूशन असलेल्या स्क्रीनसह, हे स्थळ प्रेक्षकांना वेगळ्या अनुभवाने समृद्ध करते. या भव्य गोलाकार रचनेच्या आतील भागात, १६ हजार रिझोल्यूशन असलेले एलईडी स्क्रीन तब्बल १५ हजार चौरस मीटर क्षेत्र व्यापते. आतील भागात ८ हजार, ६०० आसनांची क्षमता आहे, तर रचनेच्या बाह्य आवरणावर हे प्रदर्शन अधिकच भव्य होणारे आहे. ५४ हजार चौरस मीटर एलईडी स्क्रीन असलेले बाह्य आवरण, लास वेगासच्या अनेक भागांतून दिसते. या गोलाकारात एकूण नऊ मजले आहे, ज्यात एक बेसमेंटही आहे. याशिवाय, व्हीआयपी प्रेक्षकांसाठी खास लब आणि २३ आलिशान सुट्सची सोयही करण्यात आली आहे. यामुळेच हे ठिकाण तंत्रज्ञान, वास्तुकला आणि कलाप्रदर्शन यांचा अद्वितीय संगम आहे.

परंपरागत कॉन्सर्टच्या चौकटी मोडत, ‘द स्पिअर’ने मनोरंजनाला एक नवा आयाम दिला आहे. कलाकाराच्या मागे किंवा बाजूला बसवलेल्या प्रचंड स्क्रीनऐवजी, इथे संपूर्ण आतील भागच एक विशाल डिजिटल कॅनव्हास बनतो. या अद्वितीय अनुभवाची सुरुवात प्रसिद्ध रॉक बॅण्ड ’यु२’च्या कॉन्सर्ट मालिकेसह झाली.

या अद्भुत प्रकल्पामागे दोन दिग्गज संस्थांची भागीदारी होती, ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन कंपनी’ आणि ‘लास वेगास सॅण्ड्स कॉर्पोरेशन.’ २०१८ साली या प्रकल्पाची अधिकृत घोषणा होऊन, ‘द स्पिअर’च्या प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीला याला ‘एमएसजी स्पिअर ’ या नावाने ओळखले जात होते. तब्बल १८ एकरांच्या जागेवर हे भव्य गोलाकार बांधकाम असून, ही जागा लास वेगास सॅण्ड्सने उपलब्ध करून दिली होती. योगायोग असा की, हाच समूह व्हेनेशियन रिसॉर्टच्याही उभारणीत अग्रेसर होता. मात्र, २०२२ साली एक मोठा बदल घडला, तो म्हणजे व्हेनेशियन रिसॉर्टचा मालकी हक्क ’अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट’कडे आला आणि ‘लास वेगास सॅण्ड्स कॉर्पोरेशन’ची जागा या नव्या संस्थेने घेतली. पण, या बदलांमुळे ‘द स्पिअर’च्या भव्यतेवर किंवा त्याच्या वेगळेपणावर कोणताही परिणाम झाला नाही.

‘द स्पिअर’ची रचना पॉप्युलस या जागतिक ख्यातीच्या डिझाईन फर्मने केली. २०१८ साली जेव्हा या प्रकल्पाची सुरुवात झाली, तेव्हा त्याचा अंदाजे खर्च १.२ अब्ज डॉलर्स इतका होता. मात्र, पुढील काही वर्षांत डिझाईनमधील बदल, पुरवठा साखळीतील अडचणी आणि महागाई यांमुळे हा खर्च झपाट्याने वाढत गेला. अखेर ‘द स्पिअर’च्या उभारणीला तब्बल २.३ अब्ज डॉलर्स इतका खर्च झाला. सुविधांच्या बाबतीतही ‘द स्पिअर’ कुठेही कमी पडत नाही. परिसरात ३०४ पार्किंग स्पेस, प्रेक्षकांसाठी ३०० मीटर लांबीचा पादचारी पूल आणि भविष्यात व्हेनेशियन रिसॉर्टला थेट जोडणारे नवे मोनोरेल मार्ग उभारण्याची योजना यात आहे. म्हणजेच आधुनिक शहराच्या गतिमान जीवनाशी जुळून घेणारे एक संपूर्ण केंद्र म्हणून, त्याची रचना करण्यात आली आहे.

या इमारतीच्या समाज माध्यमांवर प्रसिद्ध झलेल्या फोटोंमध्ये, कधी प्रेक्षकांच्या वरून उडणारे डिजिटल पक्षी दिसतात, तर कधी एखाद्या काँक्रीटच्या भिंतीसारखे वाटणारे आवरण अचानक उघडून नव्या जगाची झलक दाखवते. फक्त संगीतप्रेमींसाठीच नव्हे, तर वास्तुकला, तंत्रज्ञान आणि कला यांचे संमेलन अनुभवू इच्छिणार्या प्रत्येकासाठी ‘द स्पिअर’ म्हणजे एक अविस्मरणीय ठिकाण आहे. तथापि, कंपनीच्या या यशस्वी कामगिरीच्या तुलनेत तिचा शेअर बाजारातला सहभाग उत्साहवर्धक नाही. मात्र, तरीही लास वेगास अरेनातून कंपनीला मिळणारी मजबूत कमाई आणि आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या योजनांमुळे गुंतवणुकदार आकर्षित होतात. कंपनी अबू धाबीमध्ये दुसरा अरेना उभारण्याची तयारी करत आहे आणि भविष्यात जगभर इतर स्पिअर अरेनांच्या शयताही आहेत. या सर्व संधींमुळे कंपनीच्या वाढीच्या क्षितिजावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते.
Powered By Sangraha 9.0