मुंबई : संघ प्रचारकांच्या जीवनावर आधारित 'समिधा' हा ग्रंथ मातृभक्तीच्या जाणिवेचा मनाला चटका लावणारा एकाअर्थी ग्रंथराज आहे, असे प्रतिपादन श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांनी केले. साप्ताहिक विवेक प्रकाशित 'समिधा' या १०१ संघ प्रचारकांच्या जीवनगाथा असलेला ग्रंथ शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
स्वामी श्री प्रेमपुरीजी आश्रम ट्रस्ट, प्रेमपुरी अध्यात्म विद्याभवन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी, ज्येष्ठ प्रचारक प्रा. रवींद्र भुसारी, हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रंथाचे संपादक रवींद्र गोळे, ज्यांच्या संकल्पनेतून ग्रंथ उदयास आला असे अमेरिका येथील स्वयंसेवक विनोद बापट, साप्ताहिक विवेकचे कार्यकारी प्रमुख राहुल पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत गोविंददेव गिरिजी महाराज पुढे म्हणाले, समिधा ग्रंथ म्हणजे प्रचारकांचे संपूर्ण जीवन चरित्र नाही तर त्यांची केवळ ओळख आहे. या ग्रंथाकडे आणि प्रचारकांच्या समर्पण भावनेकडे पाहिल्यास, 'असू आम्ही सुखाने पत्थर पायातील' हे पद्य आठवते. भारतमातेप्रती गौरवाच्या उभारणीत अशा अनेक प्रचारकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज समाज टिकून आहे.
पुढे ते म्हणाले, हे आमच्यासारखे सन्यासी नसले तरी प्रत्येक प्रचारकाचे कार्य संन्याश्याच्याही पलीकडचे आहे. त्यांनी आपले जीवन भारतमातेच्या सेवेप्रती समर्पित केले. त्यांच्या जीवनातील त्याग, तपस्या, समर्पण आजच्या तरुणांसमोर येणे महत्वाचे आहे. समाजातील प्रत्येकाचे जीवन तेजोमय करणारा असा हा ग्रंथ आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथाचे संपादक रवींद्र गोळे यांनी केले. ते म्हणाले संघ शताब्दीच्या पूर्वसंध्येला ग्रंथ प्रकाशित होतो आहे ही आनंदाची गोष्ट आहे. संघ कार्यात पडद्याआड असलेले प्रचारकाचे जीवन, त्यांची भूमिका, त्यांच्या कार्याचे स्मरण या ग्रंथातून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आपल्या वैचारिक पूर्वजांचे स्मरण आजच्या तरुण प्रचारकांना व्हावे याकरिता खास पितृपक्षात ग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले, साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून अनेक लेख, ग्रंथ, पुस्तके लिहिण्यात आली. त्या सर्वांपैकी समिधा हे या सर्वांच्या मस्तकावरील मुकुटसमान ग्रंथ आहे. जो वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील.