‘समिधा’ ग्रंथानिमित्ताने...

20 Sep 2025 11:35:34

येत्या विजयादशमीपासून रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने संघाच्या मागील १०० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत हजारो स्वयंसेवकांनी, प्रचारकांनी संघयज्ञात ‘समिधा’ अपर्ण केली. तेव्हा अशा संघसमर्पित स्वयंसेवकांचा आजच्या पिढीला परिचय व्हावा आणि त्यांच्या संघकार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी सा. ‘विवेक’च्या १०१ संघ प्रचारकांची लघुचरित्रे मांडणाऱ्या ‘समिधा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने ग्रंथाची परिचयपर प्रस्तावना...


नुकत्याच दि. १५ ऑगस्ट रोजी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचा उल्लेख केला. "शेकडो कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून संघ शताब्दी करत आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचे वर्ष आहे. आम्हाला संघाची शताब्दी करायची नाही असे जरी आद्य सरसंघचालकांनी म्हटले असले, तरी हिंदू समाज संघटित करण्यासाठी संघ सातत्याने १०० वर्षे काम करत आहे. जगाच्या पाठीवर संघ ही अशी अभेद्य संघटना आहे की, अनेक आघात सहन करूनही संघाचा क्षय झाला नाही, तर संघविस्तारच होत गेला. पू. डॉ. हेडगेवारांनी सांगितलेला संघमंत्र केंद्रस्थानी ठेवून, संघ काम करत आहे.

पू. डॉ. हेडगेवारांनी संघविस्तार करण्यासाठी विविध प्रांतांत स्वयंसेवकांना पाठवले. डॉ. हेडगेवारांची आज्ञा शिरसावंद्य मानून, अनेक स्वयंसेवकांनी अन्य प्रांतांत जाऊन संघकाम सुरू केले. १९४२ सालानंतर श्रीगुरुजींनी ‘प्रचारक योजना’ सुरू केली, तेव्हापासून आजपर्यंत हजारो स्वयंसेवक ‘प्रचारक’ म्हणून काम करत आहेत. ‘श्वेत वस्त्रातील साधू’ म्हणून ज्यांचे वर्णन करायला हवे, असे प्रचारक हे संघकामातील महत्त्वाचे घटक आहेत.

आत्मविलोप आणि स्वअस्तित्वविलय करून आपल्या आयुष्यातील काही कालखंड संघासाठी देणार्या या प्रचारकांचे जीवन, अनेक अनुभवांनी संपन्न असते. ते अनेकांना प्रेरणादायक असते. ‘संघ सांगेल ते आणि संघ सांगेल तिथे’ या सूत्रात प्रचारक जीवन व्यतीत होते. या प्रचारक जीवनाची तुलनाच करायची, तर आपल्या ऋषिपरंपरेशी करता येऊ शकते. ऋषिमुनींनी केवळ ज्ञानसाधना केली नाही, तर अर्जित केलेल्या ज्ञानाला कृतीची जोड देऊन ज्ञान, तत्त्वज्ञान जगणारा आदर्श उभा केला. आर्युवेद, कृषी, खगोलशास्त्र, जलव्यवस्थापन ही आपल्या ऋषिमुनींची देणगी आहे. याच परंपरेचे पाईक असणारे प्रचारक आधुनिक काळात आपले ज्ञान, कौशल्य, क्षमता यांचा समर्पित भावनेने उपयोग करून, समाजशिल्पे विकसित करत आहेत. गेल्या १०० वर्षांत सेवेची, संस्कारांची स्नेहगंगा विकसित झाली. ही स्नेहगंगा विकसित करणारे व विविध मार्गांनी ती प्रवाहित करणारे भगीरथ म्हणजे संघाचे प्रचारक.

१०० वर्षांच्या कालखंडात हजारो स्वयंसेवक प्रचारक म्हणून काम करत राहिले आणि डॉ. हेडगेवारांना अपेक्षित हिंदू समाजाचे संघटन करू लागले. या सर्वांचा परिचय हिंदू समाजाला असतोच असे नाही. प्रचारक जीवनास प्रारंभ केला आणि कोणीतरी झारखंडमधील कोळसा खाण परिसरात गेला. तिथे कामगार संघटना उभी करून, आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत तेथेच राहिला. कोणी केरळमधून प्रचारक म्हणून आसाममध्ये गेला आणि हिंदुत्वाची रुजवात करता करता, फुटीरतावादी संघटनेच्या गोळीचा शिकार झाला. वनवासी क्षेत्रात होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कुणी पुढाकार घेतला आणि तेच काम शेवटच्या क्षणापर्यंत केले, हेही सर्व प्रसिद्धीपासून दूर राहून. खरे तर त्यांना प्रसिद्धी, मान, सन्मान यांची अपेक्षा नव्हती. त्यांनी केलेले काम केवळ एका संघमंत्राचा प्रभाव होता. तो संघमंत्र आहे, ‘आपण सारे हिंदू आहोत, म्हणून परस्परांचे बंधू आहोत.’ ‘बंधुभाव हाच धर्म’ जगण्याची प्रेरणा संघमंत्राने दिली आणि आपल्या जीवनातून प्रचारकांनी त्याचे प्रकटीकरण केले.

तर अशा हजारो प्रचारकांपैकी केवळ १०१ प्रचारकांची लघुचरित्रे संपादित करून, सा. ‘विवेक’ने संघाच्या प्रचारक परंपरेला मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘विवेक प्रकाशन’ राष्ट्रीय विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी काम करीत आहे. स्वाभाविकच संघ शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला, १०१ प्रचारकांच्या लघुचरित्रांचा ग्रंथ ‘समिधा’ आम्ही प्रकाशित करीत आहोत. या ग्रंथात १०१च समाविष्ट का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. एकूणच संघाच्या प्रचारक परंपरेविषयी आम्हाला अनन्यसाधारण श्रद्धाभाव आहे. मात्र, आमच्या मर्यादित क्षमता आणि सीमित कालावधी यांमुळे निवडक १०१ प्रचारकांची लघुचरित्रे या ग्रंथात समाविष्ट केली आहेत. असे असले, तरी या १०१ प्रचारकांची माहिती जमा करताना काही निकष निश्चित केले होते आणि त्या निकषांच्या आधारे ग्रंथाचे विभागही केले आहेत. मर्यादित शब्दसंख्या आणि उपलब्ध माहितीच्या आधारे ही चरित्रे लिहिली गेली.

संघ शताब्दीनिमित्त संघ इतिहास शब्दांकित करण्याचे काम करण्याचा मानस होता. इतिहास दोन प्रकारे सांगता येतो. पहिला प्रकार घटना, प्रसंग यांच्या माध्यमातून इतिहास सांगता येतो. दुसरा प्रकार हा व्यक्तीच्या चरित्रातून इतिहास सांगता येतो. संघकाम हे व्यक्तिकेंद्री नाही, विचारकेंद्री आहे. असे असले, तरी विचाराचा प्रसार करणार्या, विचार जगून आपल्या जीवनव्यवहारातून आदर्श उभ्या करणार्या व्यक्तीच असतात, हे लक्षात घेऊनच ही लघुचरित्रे लिहिली आहेत. या प्रयत्नातून १०० वर्षांचा संघ इतिहास साकार झाला आहे. कारण, संघ वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी आव्हाने होती, वेगवेगळ्या समस्या होत्या. त्यातून मार्ग काढत झालेला हा शुभंकर प्रवास समजून घेण्यासाठी, त्या त्या काळातील व्यक्तीचे चरित्र उपयुक्त ठरते, हे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला आणि आज तो सुफल सफल होत आहे. खरे तर याआधी अशा प्रकारचे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या ‘ज्योती पुंज’ व पुण्याचे वैद्य खडीवाले यांनी केलेला ‘संघ हीच जीवन गाथा’ या दोन ग्रंथांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. संघ शताब्दीनिमित्त अशाच प्रकारचे प्रेरणादायक ग्रंथ देशभर विविध भाषांत प्रकाशित होतील.

या ग्रंथाच्या निर्मितीमागे आणखी एक उद्देश होता, तो म्हणजे आमचे पूर्वज कोण? आमचा वैचारिक वारसा कोणी विकसित केला? याचा आपल्या पातळीवर शोध घ्यावा आणि त्याला श्रद्धाभावाने नमन करत, तो वारसा नव्या पिढीला ठळकपणे दाखवून द्यावा. आज संघाच्या कामामुळे, विचारामुळे अनेकजण संघाशी जोडले जात आहेत. त्यांना आपल्या मुळाचा आणि केशवकुळाचा परिचय करून द्यावा, हा सूक्ष्म उद्देश आहे.

ग्रंथाची मूळ किंमत - ५००/- रु.
४००/- रु. सवलतीत उपलब्ध.
नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८



रवींद्र गोळे
(लेखक विवेक पुस्तक विभागाचे संपादक आहेत.)

Powered By Sangraha 9.0