प्लॅस्टिकयुक्त कचऱ्यामुळे मोकाट जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

20 Sep 2025 15:11:23

खानिवडे, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण वसई तालुक्यातील अनेक भागांत भटक्या जनावरांसाठी प्लॅस्टिकयुक्त कचरा आरोग्यावर घातक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावाशेजारील पडीक जागा, सार्वजनिक रस्ते, कचराकुंड्या या ठिकाणी फेकल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकमिश्रित कचऱ्यातून अन्न शोधताना जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्याने त्यांना पोटफुगीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

गायी, कुत्रे, वासरे अशा भटक्या प्राण्यांना भूक लागल्यावर ते कचऱ्यातील उरलेले अन्न शोधून खातात. मात्र, हे अन्न प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून टाकले गेलेले असल्याने, अन्नासोबत प्लॅस्टिकही त्यांच्या पोटात जाते. प्लॅस्टिक न पचल्यामुळे ते आतड्यांमध्ये अडकते, पोटात साचते आणि त्यामुळे पोटफुगी होऊन प्राण्यांना असह्य वेदना होतात. काही प्रकरणांमध्ये या त्रासामुळे जनावरांचा मृत्यू देखील झाल्याचे प्राणीमित्र सांगतात.

राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वसई-विरार महापालिकेनेही वेळोवेळी कारवाया केल्या असून, अलीकडेच मध्यरात्रीच्या धडक कारवाईत ३५०० किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले होते. तरीही शहरात आणि ग्रामीण भागात प्लॅस्टिकचा वापर व फेकण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने समस्येचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

प्राणीमित्र आणि सामाजिक कार्यकर्ते याबाबत चिंता व्यक्त करत असून, प्लॅस्टिकयुक्त कचरा उघड्यावर टाकणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, जनतेमध्ये जनजागृती घडवून आणून कचरा व्यवस्थापनाबाबत शिस्तीचे पालन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Powered By Sangraha 9.0