पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त भव्य बीच क्लिनिंग उपक्रम

    20-Sep-2025
Total Views |

पालघर:  आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनाऱ्यावर भव्य बीच क्लिनिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

या मोहिमेचा उद्देश समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक आणि इतर घनकचरा साफ करून पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्ती आणि स्थानिक पर्यटनाला चालना देणे हा आहे.

या उपक्रमात जिल्हा प्रशासन, शालेय विद्यार्थी, एनसीसी आणि एनएसएस स्वयंसेवक, महिला बचत गट, सामाजिक संस्था, व्यापारी, उद्योजक, स्थानिक नागरिक तसेच विविध शासकीय विभागीय कार्यालयांचा सक्रीय सहभाग राहिले.

सप्टेंबर महिन्यातील तिसरा शनिवार आंतर राष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस म्हणून दरवर्षी मनवण्यात येत असतो.शनिवार २० सप्टेंबर सकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसेच अन्य विभाग प्रमुख उपस्थित राहिले. 

स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांना प्लास्टिक विरहित साहित्य जसे की ज्यूट पिशव्या, हातमोजे, स्टील झाडू, कचरा गोळा करण्याची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गोळा झालेला कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करून सुरक्षित विल्हेवाट लावण्यात येणार आहे. मोहिमेचे संपूर्ण दस्तऐवजीकरण करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड केले जाणार आहे.

या उपक्रमामुळे फक्त स्वच्छता नव्हे, तर समुद्रकिनाऱ्यांविषयी जनजागृती, पर्यावरणीय समतोल राखणे, मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन आणि पर्यटनवाढीस चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने सर्व नागरिक, संस्था, विद्यार्थी आणि स्थानिक घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.