
कोकणातल्या मुलांची रखडलेली लग्न’ या समस्येने अलीकडच्या काळात अत्यंत गंभीर स्वरुप धारण केलेले दिसते. पण, फक्त कोकणच नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलांच्या रखडलेल्या लग्नाचा एकंदरीत विचार केला, तर हा विषय खरंच संवेदनशील. याच गंभीर विषयाला ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटात स्पर्श करण्यात आला आहे. नेहमीच्या धाटणीतील प्रेमकहाणीत या चित्रपटाला न अडकवता, वेगळ्या रितीने ही कथा दिग्दर्शकाने मांडली आहे.
चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचं तर, चित्रपटाची गोष्ट नावाप्रमाणेच कोकणातल्या वेंगुर्ल्यात सुरू होते. नयनरम्य निसर्ग, शांत पहुडलेले समुद्रकिनारे आणि तेथील फणसासारखी बाहेरून काटेरी, पण मनाने गोड अशा कोकणी माणसाचे दर्शन या चित्रपटातही घडते. सारंग, जोशी, तारी आणि तांबट अशा तीन कुटुंबाभोवती चित्रपटाची कथा फिरते.
सारंग कुटुंबातल्या आनंदचं (अभिनेता प्रल्हाद कुडतरकर) आठ महिन्यांपूर्वीच लग्न होतं. गौरी (अभिनेत्री वीणा जामकर) त्याची बायको. आनंद मुंबईतला ‘चाकरमानी’ म्हणजेच नवीन शब्दावलीनुसार ‘कोकणवासी!’ पण, ही विवाहगाठ म्हणजे फक्त लग्न जमवण्यासाठी केलेली एक तडजोड. आनंदचं मन काही शहरात रमत नाही आणि हवी तशी नोकरीही त्याला मिळालेली नाही. भाड्याने दहा बाय दहाच्या खोलीतच त्याचं खुराड्यासारखं जीवन; पण केवळ कोकणातून मुंबईसारख्या महानगरात स्थायिक होण्याच्या उद्देशाने लग्न केलेल्या गौरीला मात्र लग्नाच्या आठ महिन्यांनंतरही मुंबई दर्शन काही होत नाहीच. मुंबईला कधी जाता येईल, या एकाच आशेवर ती दिवस पुढे ढकलत असते.पण, एके दिवशी तिच्या या स्वप्नांचाही चुराडाहोतो, जेव्हा आनंदची मुंबईतील तात्पुरती नोकरीही हातची जाते आणि तो कायमची गावाची वाट धरतो. यानंतर चित्रपटात खर्या ‘ट्विस्ट’ला सुरुवात होते.
दुसरीकडे आनंदची लहान बहीण शर्मिला आता लग्नाच्या वयात आलेली. तिच्यासाठी स्थळसंशोधनही सुरु आहे. पण, मुलाच्या नोकरीचा पत्ता नसताना सारंग कुटुंबीयांना मात्र जावई शहरातला खासकरून मुंबईतला, स्वतःचं घर, चांगली नोकरी असणारा हवा आहे, तर आनंदचा मित्र आणि गावकरी परिमल जोशी (साईंकित कामत) हादेखील शहरातून त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून गावात नुकतेच परतलेला. उच्च शिक्षणानंतरही परिमलला मात्र नोकरीत अजिबात स्वारस्य नाही. गावातच स्वतःचा व्यवसाय सुरु करुन उदरनिर्वाह करायचा, अशी खुणगाठ त्याने मनोमन बांधलेली. त्यामुळे हे कथानकही पुढे कसे वळण घेते, ते चित्रपट बघितल्यावरच प्रेक्षकांच्या लक्षात येईल. मध्यंतरानंतर अस्मिता धोपेश्वरकर (स्वानंदी टिकेकर) या पात्राचा कथेत प्रवेश होतो आणि पुढे कथेला आणखी निरनिराळी वळणं लागून, कथानक शेवटाकडे सरकते.
दिग्दर्शक विजय कलमकर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद हे अमरजित आमले यांनी लिहिलेले. कोकणी माणसाच्या भाषेची विशेष ढब आणि अभूतपूर्व निसर्गसौंदर्य कोणत्याही ‘सिनेमॅटिक इफेट’शिवाय अतिशय सुंदररित्या मोठ्या पडद्यावर उतरवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. पण, असं असलं तरीही बर्याच ठिकाणी चित्रपट काहीसा रेंगाळतो. एकाचवेळी तीन वेगवेगळ्या कथा जोडताना लेखकाची तसेच दिग्दर्शकाची काहीशी तारांबळ उडालेली दिसते. त्यामुळे चित्रपट संपताना तो बर्याच ठिकाणी अपुरा वाटतो. सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका चोखपणे वठवल्या आहेत.
दिग्दर्शन : विजय कलमकर
कथा, पटकथा, संवाद : अमरजित आमले
कलाकार : प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत, कविता अमरजित, अमेय परब, शेखर बेटकर, अनघा राणे
अपर्णा कड