मुंबई, मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील समुद्राखालील बोगदा उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण उपलब्धी प्राप्त करण्यात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला यश आले आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात घणसोली आणि शिळफाटा दरम्यान ५ किमी बोगदा पूर्ण झाला असून या प्रकल्पाचा ब्रेक थ्रू केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते घणसोली येथे पार पडला. यावेळी वैष्णव यांनी सर्व अभियंते व कर्मचारी, कारागीर यांचे अभिनंदन केले.
यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले,"मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात काम झपाट्याने सुरू असून, तब्बल ३२० किलोमीटर वायाडक्ट (ब्रिज पोर्शन) जवळपास पूर्णत्वास आले आहे. सर्व स्थानकांवरही जलदगतीने काम सुरू असून, नदीवरील पूलांच्या बांधकामालाही वेग आला आहे. या प्रकल्पातील प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध आणि वेगाने काम होत आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे हा देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील महत्वाचा टप्पा असून, पूर्ण झाल्यानंतर तो प्रवासाचा अनुभव बदलून टाकेल".
हा एनएटीएम (न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धत) बोगदा सुमारे ५ किमी (४.८८१ किमी) लांबीचा असून बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान २१ किमीच्या समुद्राखालील बोगद्याचा भाग आहे, ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली ७ किमीचा मार्ग समाविष्ट आहे. या विभागासाठी एनएटीएमद्वारे बोगद्याचे काम मे २०२४ मध्ये तीन ओपनिंगद्वारे सुरू झाले. सलग बोगद्याच्या पहिल्या २.७ किमी भागाचे पहिले ब्रेकथ्रू ९ जुलै २०२५ रोजी अॅडिशनली ड्रिव्हन इंटरमीडिएट टनल आणि सावली शाफ्ट दरम्यान पूर्ण झाले. या ब्रेकथ्रूसह, सावली शाफ्टपासून शिळफाटा येथील बोगद्याच्या पोर्टलपर्यंतचा ४.८८१ किमी लांबीचा सतत बोगदा विभाग पूर्ण झाला आहे. हा बोगदा शिळफाटा येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या व्हायाडक्ट भागाशी जोडला जाईल. या एनएटीएम बोगद्याची अंतर्गत खोदकाम रुंदी १२.६ मीटर आहे.
बोगद्याचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकामअतिशय क्लिष्ट भौगोलिक परिस्थितींमध्ये हे खोदकामाचे काम पूर्ण करण्यात आले. यामध्ये ड्रिलिंग व ब्लास्टिंग, सर्वेक्षण कार्य, समर्थन प्रणाली यांसह अभियांत्रिकी कामांच्या यशस्वी अंमलबजावणीचीही खात्री झाली आहे. आता हा बोगदा अंतिम टप्प्यात प्रवेश करतो आहे. जसे की, वॉटरप्रूफिंग, लाइनिंग, फिनिशिंग आणि उपकरणांची स्थापना केली जाईल. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी, अॅडिशनली ड्रिव्हन इंटरमीडिएट टनल (अदित) तयार करण्यात आला, ज्यामुळे घणसोली आणि शिलफाटा दोन्ही बाजूने एकाच वेळी खोदकाम करणे शक्य झाले. उरलेली १६ किमी बोगदा खोदकाम टनल बोअरिंग मशिन्स (टीबीएमएस) वापरून पूर्ण केली जाईल. हा बोगदा एकल ट्यूब प्रकारचा असेल, ज्याचा व्यास १३.१ मीटर असेल. यात अप आणि डाउन मार्गिकांसाठी ट्विन ट्रॅक बसविण्यात येतील.
भारतात वेग आणि प्रगतीच्या नव्या पर्वाची नांदी
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत मुंबई-ठाणे दरम्यान समुद्राखालील तब्बल ४.८ किमी लांबीच्या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. ही उपलब्धी केवळ अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक नाही, तर भारताच्या वेग आणि प्रगतीच्या नव्या पर्वाची नांदी आहे. या प्रकल्पामुळे येत्या काळात महाराष्ट्र व गुजरातमधील प्रमुख शहरांच्या अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व गती मिळणार आहे. या अद्वितीय यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्या मार्गदर्शनाला मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन!
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
जागतिक स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात भारत आणि जपान यांच्यात घनिष्ठ समन्वयाने काम सुरू आहे. या प्रकल्पात ज्या नाविन्यपूर्ण पद्धती अवलंबल्या जात आहेत, त्यात दोन्ही मार्ग (ट्रॅक) एकाच बोगद्यात असतील. जपानमधील बोगद्यांच्या तुलनेत हा बोगदा अधिक मोठा असणार आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि आधुनिक डिझाइन वापरून या प्रकल्पातील बोगद्याचे बांधकाम हे जागतिक स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.
- अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्री