
साहित्य, व्याकरण, दर्शन, वेद, उपनिषद इत्यादी सर्व प्रकारचे पुरातन भारतीय ग्रंथ जतन करण्यासाठी त्यांचे डिजिटायझेशन करणाऱ्या तेजेन्द्र आचार्य याच्याविषयी...नालंदा आणि तक्षशीलेसारख्या जागतिक विद्यापीठांचा नाश होऊन शेकडो वर्षे लोटली, तरी ते नुकसान अजून भरून निघालेले नाही. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणूनच की काय, आता ‘नेपाळ राष्ट्रीय पुस्तकालया’लादेखील आंदोलनादरम्यान अग्नीत भस्मसात समर्पित केले गेले. अशा घटनांमुळेच पुरातन भारतीय साहित्याचा अमूल्य ठेवा नष्ट होऊ नये, यासाठी त्याच्या डिजिटायझेशनचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. हाच संकल्प घेऊन मध्यप्रदेश स्थित तेजेन्द्र आचार्य हा युवक मागील चार वर्षे झटत आहे.
भारतीय संस्कृती आणि संस्कृतचे बाळकडू तेजेन्द्रला त्याच्या घरातूनच मिळाले. त्याचे आजोबा संस्कृत पंडित आणि वडील संस्कृतचे अध्यापक होते. त्यांनी तेजेन्द्रला लहानपणीच संस्कृतची ओळख करून दिली. कालांतराने गीतासुद्धा सार्थ शिकवली. त्यातून तेजेन्द्रच्या मनात संस्कृत साहित्य जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली.
अकरावीत गेल्यावर तेजेन्द्रचा शैक्षणिक संस्कृतशी प्रथम संबंध आला. सध्या तो भोपाळच्या ‘केन्द्रीय संस्कृत विश्वविद्यालया’त, ‘ज्योतिष’ विषयातील पदवीच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. यासोबतच त्याने संस्कृत व्याकरण, नाटके, साहित्य, दर्शन इत्यादि गोष्टींचेही स्वयंअध्ययन केले आहे.
हेच ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने, बारावीत असताना म्हणजे तीन वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘संस्कृत-बाय-तेजेन्द्र’ नामक इन्स्टाग्राम खाते सुरू केले. त्यावेळी संस्कृतमधील ‘रील’ आणि ‘मिम’ हे तसे दुर्लक्षितच क्षेत्र. पण, त्याने हे आव्हान स्वीकारले. प्रेक्षकांना आनंदाबरोबरच थोडे-फार ज्ञानही मिळावे, म्हणून तो व्याकरण, ज्योतिष इत्यादी गोष्टी सोप्या करून सांगू लागला. संस्कृत ही ‘नैव लिष्टा न च कठिना’ आहे, हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला.
‘शास्त्र’ हा शब्द फक्त ऐकूनच धास्तावणारे देखील आता तेजेन्द्रच्या युट्यूब, टेलिग्राम चॅनेलवरून संस्कृतचे धडे घेत आहेत. केवळ भारतीयच नाही, तर नेपाळ, सौदी अरब, इंग्लंड, अमेरिका इत्यादी देशांतील २ हजार, २०० पेक्षा अधिक प्रेक्षक आज ‘संस्कृत-बाय-तेजेन्द्र’ चॅनेलशी जोडले गेले आहेत.
तेजेन्द्रने मालिकांमध्ये दाखवल्या जाणार्या काही चुकीच्या गोष्टींना पुराण, रामायण आदींमधील संदर्भ देत विरोध दर्शवला. ‘महाभारत’ घरात ठेवल्याने तंटे होतात किंवा काही विशिष्ट ग्रह दोषी असतात, अशा चुकीच्या समजुती त्याने चर्चा करत सप्रमाण खोडून काढल्या.
प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनचर्येत संस्कृतचा कुठे ना कुठेतरी सहभाग असावा, असे तेजेन्द्रला मनापासून वाटते. पण, काळाच्या ओघात बदलत जाणारी संस्कृत, तांत्रिक युगात आणि पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने आलेल्या प्रत्येक शब्दाला सांगितला जाणारा पर्यायी संस्कृत शब्द ऐकून मात्र त्याचे मन हेलावते. "भाषा ही प्रवाही असावी हे जरी मान्य केले, तरी त्याची शुद्धता आणि भाषेची मुळे जपणे अतिशय आवश्यक आहे,” असे तेजेन्द्र सांगतो. संस्कृतचे मूळ स्वरूप नष्ट होऊ नये, त्याचबरोबर भविष्यात संस्कृतचा वापर आणि परिणामी प्रसार कसा करता येईल, यासाठी जीवनभर कार्य करण्याचा त्याने ध्यास घेतला आहे.
भविष्यात दैनंदिन पातळीवर संस्कृतचा जगभरात वापर व्हावा, आपल्यापैकी प्रत्येकाला किमान ५० वाये तरी संस्कृतमध्ये बोलता यावी, अशी तेजेन्द्रची इच्छा आहे.
आज अनेकजण संस्कृत संभाषणासाठी प्रयत्नशील आहेत; पण आपले पुरातन साहित्य कुठेतरी मागे पडत आहे. त्यामुळे ते आजच्या युवा पिढीसमोर आणण्यासाठी, तेजेन्द्र धडपडत आहे. तो तरुणांना संस्कृतचे महत्त्व, महात्म्य सांगतो. कालिदासाव्यतिरिक्त बाण, भास, भवभूति आदि कवींचेदेखील साहित्य वाचण्यास त्याने अनेकांना प्रवृत्त केले.
हे सगळे साहित्यग्रंथ मोफत उपलब्ध करून देण्यासाठी तेजेन्द्रने पुढाकार घेत, त्याच्या घरी पिढीजात असलेले सर्व प्रकारचे पुरातन ग्रंथ स्कॅन केले. नंतर मित्रांकडे असलेले सर्व ग्रंथ आणि मग आसपासच्या सर्व ग्रंथालयांची परवानगी घेऊन, त्या ग्रंथांचेदेखील डिजिटायझेशन त्याने केले. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेले साहित्य जतन करण्याचा तो प्रयत्न करत आहे. आजपर्यंत एक हजारांपेक्षा अधिक ग्रंथांची पीडीएफ फाईल तयार करून त्याने, संस्कृत अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिली.
कलियुगामध्ये कशा प्रकारे वर्तन करावे, हे सांगणाऱ्या ‘कलिविडम्बनम्’ नामक ग्रंथासारखे असंख्य काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेले ग्रंथ, आज तेजेन्द्रच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसमोर येत आहेत. पूर्वीच डिजिटायझेशन झालेले ग्रंथदेखील, संबंधित व्यक्तींच्या परवानगीने एकत्र आणत तो आपले असे एक अॅप बनवू इच्छितो, ज्यात पुरातन आर्य संस्कृतीतील सर्व साहित्य एकत्र आणि निःशुल्क उपलब्ध होईल. लोकसाहित्य, व्याकरण, दर्शन, वेद, उपनिषद, आधुनिक संस्कृत असा कोणताही विषय, कोणतेही पुस्तक वाचू इच्छितात ते त्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, हे तेजेन्द्रचे स्वप्न आहे.
अजूनपर्यंत हे अॅप तयार झाले नसल्यामुळे, तेजेन्द्र हवे असलेले पुस्तक पीडीएफ स्वरूपात टेलिग्रामवर उपलब्ध करून देतो. परंतु, लवकरच तेजेन्द्रचे ते अॅप तयार होवो आणि सर्व प्रकारचे पुरातन भारतीय साहित्य अभ्यासकांना एकाच छताखाली निःशुल्क उपलब्ध होवो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून तेजेन्द्रला शुभेच्छा!
ओवी लेले
९८६९३४५७५३